मान्सूनची दमदार साथ मिळाल्यास देशाचा विकास दर आठ टक्क्यांवर पोहोचेल, अशा उत्साही आरोळ्या आतापासून ठोकल्या जात आहेत. चांगलेच आहे. पण या जर-तरच्या गोष्टी. सर्वसामान्य माणूस गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाळ्यासोबतच महागाईचे चटके सोसतो आहे. याबाबत सरकार किती गंभीर आहे, याची आम्हाला जास्त चिंता वाटते. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा संबंध आंतरराष्ट्रीय बाजाराशी असल्याचे लोकांनी आता मान्यच करून घेतले आहे. त्यामुळे इंधन दरवाढीनंतर लोक पूर्वीइतके भडकत नाहीत. रोजच्या भाजी-भाकरीलाही महागाईची झळ बसायला लागली की ती सहन करणे मात्र अवघड होऊन जाते. अंडी, दूध, मासे, मांसाच्या किमती ते १४ टक्क्यांनी वाढल्याने लोकांच्या पौष्टिक आहारावर टाच आली. भाजीपाला सरासरी दहा टक्क्यांनी महागला. गरिबांचे सोडाच पण नरेंद्र मोदींच्या प्रेमात पडलेल्या मध्यमवर्गालाही आताची महागाई सहन करणे जड जात आहे. गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळी स्थितीमुळे धरणे आधीच रिकामी. यात भर म्हणून मान्सूनचे आगमन लांबलेले. साहजिकच उन्हाळ्यातल्या भाजीपाला उत्पादनाला फटका बसला. अल्पावधीत येणारी टोमॅटो, भाजीपाला पिके महागली. अवर्षणाने लादलेला हा परिणाम तात्कालिक आहे. टोमॅटो जीवनावश्यक फळपीक नसल्याने त्याच्या दरवाढीची निष्फळ पांढरपेशी चर्चाही निरर्थक मानावी लागते. पण भाजीपाल्याला पर्याय असणाऱ्या डाळींचे काय? डाळी ३० टक्क्यांपेक्षा अधिक किमतीने महागाव्यात ही वस्तुस्थिती कोणत्याच अर्थांने मान्य होण्यासारखी नाही. अन्नपदार्थांचा महागाई निर्देंशाक ७.५५ टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर दिल्ली-मुंबईच्या सरकारला या महागाईचे समर्थन करण्याची मुभाच नाही. उलटपक्षी उसळता महागाई निर्देशांक म्हणजे जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचे प्रतीक मानावे लागते. डाळींची भाववाढ आठवड्यापूर्वीची किंवा महिनाभरातली नाही. गेल्या दिवाळीतच डाळी गायब झाल्या आणि डाळींच्या किमती गगनाला भिडल्या. त्या वेळची डाळींची दरवाढ सरकारच्या निष्काळजीपणातूनच जनतेवर लादली गेली होती. अन्नधान्यांच्या किमती स्थिर ठेवू शकणाऱ्या पंतप्रधानांचा कथित प्रामाणिकपणा आणि कष्टाळू स्वभाव सर्वसामान्यांसाठी बिनकामाचा आहे, हे त्यांनी जरूर लक्षात घ्यावे.
खरे म्हणजे डाळींच्या उत्पादनात भारत कधीच स्वयंपूर्ण नव्हता. सरकार या वास्तवापासून अजिबातच अनभिज्ञ नाही. सततच्या अवर्षणामुळे देशांतर्गत डाळ उत्पादनात लक्षणीय घट झाल्याच्या बातम्या गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने येत आहेत. डाळींचा पुरवठा आणि मागणी यातली तफावत रुंदावत चालल्याचे वास्तव सरकारी यंत्रणांच्या नजरेत नव्हते, असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. त्यामुळेच जर वस्तुस्थितीची यथोचित जाणीव असूनही योग्य पावले तातडीने पडली नसतील तर मग सरकार, प्रशासन आणि व्यापाऱ्यांची दुष्ट साखळी कार्यरत असल्याचा संशय निर्माण होतो. भारतात नसली तरी जगाच्या बाजारात आज हवी तितकी डाळ उपलब्ध आहे. पुढच्या दोन वर्षांच्या गरजेचा आणि देशांतर्गत उत्पादनाचा अदमास घेऊन डाळींची नियोजनबद्ध आयात वर्षापूर्वीच सुरू करणे शक्य होते. केंद्रातले रामविलास पासवान आणि राज्यातले गिरीश बापट यांना या विषयातले फारसे कळत नसेल तर मग मोदी-फडणवीसांनी जातीने यात लक्ष घालायला हवे होते. तहान लागल्यावर विहीर खोदू पाहाल तर त्याला निव्वळ निष्काळजीपणा म्हणून सोडून देता येणार नाही. विशिष्ट व्यापारी-दलाल वर्गाचे हित साधण्यासाठी जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष हाच आरोप तुम्हाला चिकटणार. डाळींच्या उत्पादनवाढीसाठी फडणवीस सरकारने आणलेली प्रोत्साहन योजना स्वागतार्ह असली तरी तो तातडीचा उपाय नव्हे. महागाई रोखण्याला मोदी सरकारचे प्राधान्य हवे. पोट भरले तरच ‘देश बदल रहा है'च्या जाहिरातींचा भडिमार सहन करण्याची ताकद जनतेत निर्माण होईल अन्यथा उत्तर प्रदेशचा "बिहार' व्हायला वेळ लागणार नाही. किरकोळ बाजारातली महागाईसुद्धा एव्हाना साडेपाच टक्क्यांच्यापुढे गेली आहे. ग्रामीण भागातला व्यापार-उदीम सुधारला नाही तर आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठताना मोदी सरकारची दमछाक होईल. न्यूक्लीअर सप्लायर ग्रुप (एनएसजी)मधल्या समावेशासाठी मोदींनी जितका आटापिटा चालवला आहे, त्यापेक्षा अधिक आटापिटा त्यांनी महागाई रोखण्यासाठी करावा. कारण आजही सव्वाशे कोटींच्या देशातल्या बहुसंख्य जनतेचा मूलभूत आहार ‘डाल-रोटी’ किंवा ‘डाळ-भात’ हाच आहे. पेक्षा महागाईचे चटके मुक्याने सोसत आनंदी राहण्याचे एखादे ‘आसन’ तरी येत्या योग दिनाच्या मुहूर्तावर देशाला शिकवावे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)