आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकमधील यादवी उफाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांमधील इराकची परिस्थिती पाहता हा देश आता सुन्नी इस्लामी दहशतवादी गटांच्या अधिपत्याखाली येण्याची शक्यता निर्माण झाली असून तो शिया-सुन्नी संघर्षात पुन्हा होरपळला जाऊ शकतो. सुन्नी दहशतवाद्यांनी मंगळवारी शियाबहुल मोसूल आणि बुधवारी उत्तरेकडील तिक्रीत शहर ताब्यात घेतल्याने परिस्थिती चिघळली आहे. ही दोन्ही शहरे ताब्यात आल्यानंतर दहशतवादी गटांनी इराकची राजधानी बगदादच्या दिशेने कूच केले आहे. अमेरिकेच्या इराकवरील कारवाईत सद्दाम हुसेन यांच्या बाथ पक्षाचे व अल-कायदा या संघटनेचे बरेच मोठे कंबरडे मोडले होते; पण या संघटनांमधील अनेक सदस्यांनी अमेरिकी सैन्य माघारी गेल्यानंतर स्वतंत्र गट बांधले होते. त्यात इराकमधील लोकनियुक्त सरकारमध्ये शियांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या विरोधात सर्व सुन्नी गटांनी आघाडी उघडली आहे. त्यामुळे मोसूल आणि तिक्रीत शहर सुन्नी दहशतवाद्यांच्या ताब्यात जाणे याचा अर्थ इतकाच की दहशतवादी गट केवळ एक एक प्रदेश जिंकत नसून ते आता तेलाच्या राजकारणावरही कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण तिक्रीतनजीकच्या प्रदेशातील बाइजी ही तेल रिफायनरी उत्तर इराकमधील महत्त्वाची रिफायनरी आहे. हा प्रदेश तेलसंपन्न आहे. तिक्रीतचा पाडाव हा लष्करातील काही सुन्नी गटांचे कारस्थान असू शकते, असे वृत्त आहे. कारण तिक्रीत सुन्नी दहशतवाद्यांच्या हातात जात असताना इराकच्या लष्कराने फारसा प्रतिकार केला नव्हता. या पार्श्वभूमीवर सुन्नी दहशतवाद्यांची बगदादकडे आगेकूच पाहता इराकच्या लष्करातील सुमारे चार ते पाच हजार प्रशिक्षित सैनिकांच्या चार ब्रिगेड त्यांना रोखण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तिक्रीतचा पाडाव झाल्यामुळे शेजारील तुर्कस्तानही संघर्षाच्या पवित्र्यात उभा राहिला आहे. कारण सुन्नी दहशतवाद्यांनी तिक्रीतमधील तुर्की वकिलातीवर हल्ला करून काही अधिकार्‍यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या सुटकेसाठी आता तुर्कस्तानने दहशतवादी गटांशी बोलणी सुरू केली आहे. सिरियाही या घटनेने हादरला आहे. कारण सुन्नी बंडखोर सिरियाच्या यादवीत कळीची भूमिका बजावत आहे. इराक पुन्हा अराजकाकडे निघाला आहे.