आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसच्या पाडावासाठी (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सद्दाम हुसेनचा अंत घडवून आणणारी अमेरिका इराकमध्ये लोकशाही व्यवस्था निर्माण करू शकली नाही. परिणामी हुकूमशाहीत दबून राहिलेला इराक सद्दामच्या पाडावानंतर अंदाधुंद झाला. याच अस्वस्थ आणि निर्नायकी इराकमधून जगाचे रूपांतर इस्लामी राजवटीत करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा उफाळून आली. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ ऊर्फ इसिस हे त्याचे दृश्य स्वरूप. लादेनचा खात्मा झाल्यापासून आखाती देशांमधल्या दहशतवादाला चेहरा मिळालेला नव्हता. या लादेनची जागा इसिसने, अबु बकर अल बगदादीने घेतली. अल्पावधीतच इसिसच्या दहशतीच्या छाया आखाताबाहेर पडल्या. मध्ययुगीन काळातल्या रक्तबंबाळ क्रौर्याची पुनरावृत्ती करत इसिसने जगाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडले. इराकमधल्या अमेरिकी तुरुंगात पोसलेल्या इसिसच्या म्होरक्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान दुर्मिळ नाही. तेलसमृद्ध विहिरींवरच्या मालकीमुळे डॉलर्सचा ओघ अखंड आहे. त्यामुळे इसिसचे अस्तित्व आता आखातापुरते उरलेले नाही. भयमिश्रित कुतूहल, जगावर सत्ता गाजवण्याची इच्छा, पराक्रमाचा अभिनिवेश, अन्यायाविरुद्धची भडकाऊ सूडभावना या चुकीच्या मार्गांनी केवळ इराक, सिरियातल्याच नव्हे, तर अगदी युरोप-ऑस्ट्रेलियातल्या तरुणाईलाही इसिसने भुरळ घातली आहे. शेजारच्या पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये इसिस प्रभाव दाखवू लागली आहे. आग्नेयेकडच्या इंडोनेशिया, थायलंडमध्ये इसिसच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. अगदी कालपर्यंत देशाबाहेर, उंबरठ्यावर असलेला इसिसचा वणवा आता अंगणात, घरात शिरू पाहतो आहे. इसिसची विषारी हवा काश्मीर खोऱ्यापासून ते थेट आपल्या मुंबई-मराठवाड्यातल्या निष्पाप मुलांनाही कवेत घेऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांशी संबंधित असल्याच्या संशयावरून गेल्या दोन दिवसांत काही जणांना अटक केली आहे, त्यामध्ये इसिसशी संबंधित सहा जणांचाही समावेश आहे. इसिसच्या दहशतवादी कृत्यांना पाठबळ देण्यासाठी पैसे गोळा केले जात आहेत. देशाच्या पंतप्रधानांना, तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना इसिसच्या नावे धमक्यांचे ई-मेल पाठवले जात आहेत. ही लक्षणे भारतात इसिसने मूळ धरल्याची आहेत. काश्मीरमध्ये इसिसच्या समर्थनाचे फलक पहिल्यांदा झळकले तेव्हा इसिसचे अस्तित्वच नाकारण्यात आले होते. आता इसिसचे निखारे देशात असल्याचे वास्तव मान्य करावे लागणार आहे. ठिणग्या असल्याचे मान्य केल्यानंतरच त्या विझवण्याचे मार्ग शोधता येतात.
इसिसच्या भडक प्रचाराला मुस्लिम तरुण का बळी पडताहेत, याचा विचार सरकार, समाज आणि मुस्लिमधर्मीयांना करावा लागणार आहे. भारतात अल्पसंख्य असलेले मुस्लिमधर्मीय येथील अल्पसंख्याकांमधले बहुसंख्य आहेत. एवढेच नाही, तर जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या भारतातच आहे. धर्माच्या नावावर तुटून बाजूला झालेल्या दोन शेजारी देशांच्या इतिहासाचे लोढणेसुद्धा याच समाजाच्या गळ्यात आहे. या लोढण्यामुळे देशप्रेमाची आणि राष्ट्रनिष्ठेची साक्ष पटवून देण्याची जबाबदारी प्रत्येक वेळी मुस्लिमधर्मीयांवर टाकली जाते. तथाकथित हिंदुत्ववादी यात अग्रेसर असतात. समाजातल्या बहुसंख्य वर्गाच्या या दोषयुक्त वर्तनामुळे मुस्लिमधर्मीयांमध्ये अलगतेची भावना निर्माण होत असेल तर हे वर्तन सुधारावे लागेल. इसिससारख्या ‘कुराण'विरोधी दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी संघटनांकडे पडणारे पाऊल अलग भावनेचा परिपाक असतो. आठशे वर्षे देशावर मुसलमानांनी राज्य केल्याचे सांगत धर्मश्रेष्ठत्वाचा अहंकार गोंजारता येतो. अलगतेच्या आगीत तेल ओतण्याचे काम ‘अखंड हिंदुराष्ट्रा’ची दिवास्वप्ने दाखवणारे नित्यनेमाने करत असतात. त्यामुळे या दोन्ही धर्मांतील अतिरेक्यांपासून दूर राहणे ही भारतीय समाजाची गरज आहे. सुधारणा, शिक्षण आणि प्रतिष्ठा यांच्या अभावी माणूस जनावर होतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. म्हणूनच वाट चुकलेल्या धुळ्यातल्या आपल्याच सहा मुस्लिम मुलांच्या मनात विश्वास पेरत त्यांची ‘घरवापसी’ करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन करायला हवे. धर्मनिष्ठा व देशप्रेमाची गल्लत करता येणार नाही, असे सांगत मशिदी-मदरशांमधून राष्ट्रनिष्ठेचे धडे देण्यासाठी आज पुढे येत असलेल्या मुल्ला-मौलवींचे स्वागत केले पाहिजे. धुळ्यात दाखवलेली समयसूचकता ‘अपघात’ ठरणार नाही, याची खबरदारी खाकी वर्दी आणि सरकारने घ्यावी. सूड आणि द्वेषाच्या मार्गाने मनामनात घुसू पाहणारी इसिस केवळ शस्त्रांनी मारता येणार नाही. सर्वधर्मीयांना समान प्रतिष्ठेने वागवत एकोपा, सलोखा जपला तरच इसिसचा पाडाव करणे सोपे जाईल.