आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वराज यांचा खुलासा (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललित मोदी प्रकरणात सुमारे अडीच महिन्यांनंतर सुषमा स्वराज यांनी लोकसभेत खुलासा केला. लोकसभेत विरोधी पक्षांनी सभात्याग केल्यानंतर स्वराज यांना आपले म्हणणे व्यवस्थित मांडता आले. या खुलाशात नवी माहिती काहीही नाही. गुरुवारपर्यंत वृत्तपत्रांतून जे प्रसिद्ध झाले होते व चित्रवाहिन्यांवर ज्यावर तावातावाने चर्चा झाली होती तीच माहिती आज लोकसभेसमोर आली. स्वत: सुषमा स्वराज यांनी ती मांडली इतकाच काय तो फरक. लोकसभेतील स्वराज यांचे भाषण प्रभावी होते. त्याला भावनेची धार होती. एका कॅन्सरपीडित महिलेला मदत करणे हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे व त्यासाठी मिळेल ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे, असे नाटकी उद््गार स्वराज यांनी काढले. भारतातील राजकारणाचा एकूण बाजच भावनाशील असल्याने स्वराज यांच्याबद्दल तक्रार करता येणार नाही. तथापि, परराष्ट्रमंत्रिपदाला शोभेल असा भारदस्त युक्तिवाद त्यांनी केला असता तर बरे झाले असते.

गुरुवारपर्यंतचा युक्तिवाद व स्वराज यांनी आज केलेला खुलासा यामध्ये एक छोटासा फरक आहे व तो लक्षात घेतला पाहिजे. मी ललित मोदींना मदत केलेली नाही, तर ललित मोदींच्या कॅन्सरग्रस्त पत्नीला मदत केली आहे, असे स्वराज म्हणाल्या. याबाबतचा निर्णयही ब्रिटिश सरकारने घेतला. मोदींना मदत करण्याचा निर्णय घ्या, असा आग्रह वा शिफारस मी केलेली नाही, असेही स्वराज यांनी म्हटले. त्यासंबंधी काही कागदपत्रेही त्यांनी सभागृहात सादर केली. ललित मोदींना मदत कराल तर आपले संबंध बिघडतील, असा इशारा मनमोहनसिंग सरकारने ब्रिटनला दिला होता. तसे संबंध बिघडणार नाहीत, असे आश्वासन स्वराज यांनी दिले. ते ललित मोदींसाठी नव्हे, तर पत्नीसाठी दिले, असा स्वराज यांचा दावा आहे. शस्त्रक्रिया कदाचित जिवावर बेतणारी असल्यामुळे पत्नीसोबत ललितने राहणे आवश्यक होते, असे प्रमुख डॉक्टरांनी सांगितले व ब्रिटन सरकारकडे ललितच्या पत्नीनेही अशीच विनंती केली होती, असे स्वराज म्हणाल्या. शस्त्रक्रियेच्या वेळी पती जवळ असावा, असे विवाहितेला वाटणे स्वाभाविक असल्याने मी तशी मदत केली, असा स्वराज यांचा दावा होता. आधी उल्लेख केल्याप्रमाणे पूर्णत: भावनेवर आधारित हा खुलासा आहे. तो पटण्यासारखा आहे यात शंका नाही. ललित मोदींच्या पत्नीवर कोणताही गुन्हा नाही वा त्यांच्यावर कसला संशयही नाही. गुन्हेगार ललित मोदी आहेत. एखाद्या आत्यंतिक घटनेसाठी गुन्हेगाराला मदत करण्याचा प्रघात जगात सर्वत्र आहे. त्यातही स्वराज यांनी दाखवून दिल्याप्रमाणे त्यांनी निर्णय ब्रिटिश सरकारवर सोडून दिला होता. तेव्हा ललित मोदींच्या पत्नीचा संदर्भ पाहता हा खुलासा पटण्यासारखा आहे. स्वराज यांनी कोणताही मोठा गुन्हा केलेला नाही हेही यातून कळून येते.मात्र, यामुळे त्या पूर्णपणे निर्दोष ठरत नाहीत. मानवतेच्या दृष्टीतून त्यांनी ललित मोदी यांच्या पत्नीला मदत केली असली तरी त्याची माहिती परराष्ट्रमंत्री म्हणून पंतप्रधानांना देणे आवश्यक होते. तशी ती दिली होती, असे दिसत नाही. स्वराज यांचा खुलासा काँग्रेसला पटणार नाही. स्वराज यांच्या खुलाशातील त्रुटी लक्षात घेऊन लोकसभेत काँग्रेस सत्ताधाऱ्यांची कोंडी करू शकतात. पण असे करण्यापेक्षा काँग्रेसला ही भावनेचे राजकारण करायचे आहे व मुख्य म्हणजे सरकारची आर्थिक कोंडी करायची आहे. यामुळे आता नागा बंडखोरांशी झालेल्या कराराचा मुद्दा काढून सोनिया गांधी तावातावाने बोलू लागल्या आहेत. हे फक्त अडवणुकीचे राजकारण आहे. अर्थात, सोनिया व राहुलकडून वेगळ्या राजकारणाची अपेक्षाही नाही.

तथापि, ललित मोदी यांच्याबद्दल सरकारची भूमिका वा मत काय? हा मुद्दा स्वराज यांच्या खुलाशातून निसटला आहे व ती बाबही महत्त्वाची ठरते. ललित मोदींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बुधवारी सरकारने जारी केले आहे. तेव्हा सरकार ललित मोदींना िनदान आरोपी समजत आहे असे म्हणता येईल. माजी गृहमंत्री चिदंबरम सध्या बरेच प्रश्न करीत असले व ब्रिटिश सरकारला लिहिलेल्या पत्राचा वारंवार उल्लेख करीत असले तरी ललित मोदींविरोधात वॉरंट काढण्याची हिंमत त्यांना झाली नव्हती हे विसरता कामा नये. आता ते पाऊल उचलले गेले आहे. ललित मोदींना पकडून भारतात आणले गेले तर ते बऱ्याच गोष्टी बोलू लागतील व त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षांतील बडे नेते अडचणीत येतील असे बोलले जाते. प्रकरण त्या थरापर्यंत जाईल याची खात्री देता येत नाही. कारण आयपीएलमध्ये सर्वांचेच हात अडकले आहेत. ललित मोदींना मी मदत केलेली नाही, त्यांच्या पत्नीला केली आहे, असे म्हणून स्वराज यांनी ललित मोदींना वेगळे काढले आणि त्याच वेळी सरकारने वॉरंटही काढले. या दोन्ही बाबी जोडल्या तर सरकारच्या दिशेची कल्पना येते. मात्र, ललित मोदींनी भारतात यावे, येथे त्यांना पूर्ण संरक्षण दिले जाईल व येथील न्यायव्यवस्थेसमोर त्यांनी निर्दोषत्व सिद्ध करावे, असे आवाहन करण्याची संधी स्वराज यांना परराष्ट्रमंत्री म्हणून होती. तसे त्यांनी न केल्याने त्यांचा खुलासा भावनेच्या पातळीवर पटणारा असला तरी संशयालाही जागा ठेवतो.
बातम्या आणखी आहेत...