आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दालमिया गेले! (अग्रलेख )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्रजांनी भारतीयांना ज्या अनेक बऱ्या-वाईट गोष्टी दिल्या यात क्रिकेटचा उल्लेख आवर्जून करावा लागतो. इंग्रजांचे युनियन जॅक हे निशाण जगात जिथे-जिथे फडकले ते सगळे देश क्रिकेट खेळतात. एकाने चेंडू फेकायचा, दुसऱ्याने फळीने तो तडकवायचा आणि तिसऱ्याने तो अडवायचा. एका वेळी फार तर तिघांची हालचाल. उष्ण कटिबंधातल्या भारतीयांना हा निवांत खेळ भलताच आवडला. इतका की आता इतर कोणत्या मुद्द्यावर भारत एक होईल न होईल; परंतु भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी जणू राष्ट्रीय एकात्मतेची लहरच देशभर वाहते. १९३२ मध्ये भारत कसोटी क्रिकेटचा पहिला सामना खेळला. त्यानंतर कित्येक भारतीय क्रिकेटवीरांनी जगाला स्तिमित करणारी वैयक्तिक कामगिरी केली. परंतु जागतिक क्रिकेट विश्वाने भारतीय क्रिकेटची खऱ्या अर्थाने पहिल्यांदा दखल घेतली ती १९७०-७१ मध्ये. कर्णधार अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली भारताने कॅरेबियन बेटांवर जाऊन वेस्ट इंडीजला कसोटी मालिकेत धूळ चारली. लगोलग वाडेकरांच्याच संघाने इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रजांनाही कसोटी मालिकेत पाणी पाजले. भारतीय क्रिकेटचा तिसऱ्यांदा डंका वाजला १९८३च्या एकदिवसीय विश्वविजेतेपदामुळे. भारतीय क्रिकेटची लोकप्रियता टिपेवर असतानाच्या या दशकात भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) जगमोहन दालमिया या प्रशासकाचा प्रवेश झाला होता. स्वतः क्रिकेट खेळलेल्या दालमियांना खेळाची जाण होती; शिवाय रक्तातच मुरलेले अर्थकारण आणि व्यापारी वृत्ती हे अधिकचे गुणही त्यांच्याकडे होते. तेव्हाच्या ८५ कोटी लोकसंख्येच्या भारतात क्रिकेट केवळ चेंडूफळीचा खेळ म्हणून भविष्यात उरणार नाही, तर क्रिकेटवीरांचे रूपांतर ‘कमोडिटी’त आणि क्रिकेटचे रुपडे ‘इंडस्ट्री’त पालटणार असल्याचे जगमोहन दालमियांनी अचूक ताडले होते.
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष होण्याआधी दालमियांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) बस्तान बसवले. जागतिक क्रिकेटचा केंद्रबिंदू लंडनच्या ‘होम ऑफ क्रिकेट लॉर्ड््स’वरून उखडून मुंबईच्या ‘वानखेडे स्टेडियम’वर दालमियांनी आणला तेव्हा परंपराप्रिय ब्रिटिश किती जळफळले असतील याची कल्पनाच केलेली बरी. तोवर ‘आयसीसी’त फक्त गोऱ्यांची एकाधिकारशाही चाले. दक्षिण अाफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आदींना सोबत घेत दालमियांनी त्याला सुरुंग लावला. तिसऱ्या जगातून ‘आयसीसी’चे अध्यक्षपद मिळवणारे दालमिया पहिले. नव्वदीनंतर भारताने मुक्त अर्थव्यवस्था जवळ केली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही बदलाचे वारे वाहत होते. क्रिकेटची लोकप्रियता या बदलांशी जोडण्याचे काम दालमियांनी साधले. १९९६च्या विश्वचषकाचे यजमानपद भारत-पाकिस्तान-श्रीलंकेकडे खेचून आणतानाच या स्पर्धेचे प्रसारण हक्क चक्क १ कोटी डॉलर्सना त्यांनी विकले. या स्पर्धेचे प्रायोजकत्व बहाल करतानाही त्यांनी १.२० कोटी डॉलर्स मोजून घेतले. गगनचुंबी षटकार पाहायची सवय असलेल्या क्रिकेटला आभाळाला भिडणारे अर्थव्यवहार दालमियांमुळे पहिल्यांदाच पाहता आले. आतबट्ट्यात चालणारी ‘बीसीसीआय’ प्रचंड नफ्यात आली. क्रिकेट खेळणारे सगळे देश एकीकडे आणि ‘बीसीसीआय’ दुसरीकडे, तरी जगाचे पारडे हलके, ही किमया दालमियांची. एवढे कर्तृत्व गाजवल्यानंतर ‘आयसीसी’चे अध्यक्षपद मिळवले. तेव्हा ‘आयसीसी’कडे १६ हजार पाउंडांची शिल्लक होती. दालमियांनी पद सोडले तेव्हा हा आकडा १५ दशलक्ष डॉलर्सवर गेला. स्वाभाविकपणे क्रिकेट विश्व दालमियांना ‘डॉलरमिया’ म्हणून ओळखते. प्रचंड पैसा आणि अमाप लोकप्रियता पाहून राजकारण्यांचे पाय क्रिकेटकडे वळले नसते तर आश्चर्य होते. शरद पवार यापैकीच एक. दालमिया त्यांनाही पुरून उरले. ‘बीसीसीआय’च्या निवडणुकीत पराभव पाहण्याची नामुष्की पवारांवर आली. बिथरलेल्या पवारांनी सर्व ताकद पणाला लावून याचा वचपा काढला. भारतीय क्रिकेट बदनाम करणारे ललित मोदी, एन. श्रीनिवासन दालमियांच्या काळात डोके वर काढू शकले नव्हते. त्यांना आपल्या कळपात ओढून पवारांनी दालमियांची गच्छंती घडवून आणली. हेच पवार खो-खो, कबड्डी, कुस्तीच्या संघटनांवरही अनेक वर्षे पदाधिकारी होते. त्या वेळी पवारांमधला प्रशासक या देशी खेळांना श्रीमंत करू शकला नाही. दालमियांनी आणलेल्या श्रीमंतीमुळे प्रादेशिक क्रिकेटमधल्या पैशांचा ओघ वाढला. ‘बीसीसीआय’च्या श्रीमंतीमुळेच रांचीतला महेंद्रसिंग धोनी किंवा कानपूरचा सुरेश रैना क्रिकेटमध्ये करिअर करण्यास धजावले. भारतीय क्रिकेटपटू जगात सर्वाधिक श्रीमंत असतात, ‘आयपीएल’मध्ये खेळण्यासाठी जगभरचे क्रिकेटपटू जीव टाकतात, यातली प्रशासक दालमियांची भूमिका नाकारता येणार नाही. गैरव्यवहाराच्या आरोपातून कोर्टाने निर्दोष ठरवल्यानंतर दालमियांनी यंदा पुन्हा ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद पटकावले होते. जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेला ते आणखी कुठे घेऊन जाणार होते, हे कळण्याआधीच त्यांचा दुसरा डाव संपला.