आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हायकल स्पाँडिलायटिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक जीवनशैलीमध्ये काही आजार असे आहेत की जे दीर्घकाळ एकाच जागी बसल्याने जडतात. यात कंबर आणि मानेचे दुखणे एक प्रमुख कारण आहे. याचे मुख्य कारण "स्पाँडिलायटिस.' सर्व्हायकल स्पाँडिलायटिसमुळे मान आणि पाठीच्या कण्यातील सांध्यावर याचा जास्त परिणाम होतो. ही समस्या १० पैकी ७ लोकांमध्ये दिसून येते.

"स्पाँडिलायटिस' म्हणजे काय? हा पाठीच्या कण्याशी संबंधित असा रोग आहे. या रोगात पाठीच्या कण्यावर सूज येते. स्पाँडिलायटिस हा शब्द "स्पाँडिल' आणि "आयटिस' असे दोन युनानी शब्द मिळून तयार झाला आहे. स्पाँडिलचा अर्थ कशेरुका "व्हर्टेब्रा' तसेच "आयटिस'चा अर्थ सूज असा होतो. अर्थात, कशेरुका किंवा व्हर्टेब्रा (पाठीचा कणा) यात सूज आल्याच्या तक्रारीलाच स्पाँडिलायटिस असे म्हटले जाते. यात रुग्णास मानेच्या डाव्या आणि उजव्या बाजूस तसेच वर-खाली पाहताना खूप दुखू लागते. येथे सर्व्हायकल स्पाँडिलायटिसबद्दलच सांगण्यात येत आहे.

कारणे : या आजारात सर्वात मोठे कारण वाढते वय आणि वाईट जीवनशैली आहे. तासन््तास एकाच स्थितीत दीर्घकाळ काम केल्याने मानेवर किंवा कमरेवर परिणाम होतो. नियमितपणे व्यायाम न करण्यानेही हा आजार होऊ शकतो. यामुळे मानेच्या हाडावर दबाव वाढतो. परिणामी, संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणाऱ्या रक्तपेशी क्षतिग्रस्त होऊ शकतात. सांधेही खराब होतात. यामुळे स्पायनल कॉर्डवर (मेरुरज्जा) दबाव येतो. येथे हलका झटका जरी बसला, तरी लकवा होऊ शकतो. मान झुकवून काम करणारे या रोगाचे शिकार होऊ शकतात. ज्यांना कॉम्प्युटरवर टाइप करण्याचे काम आहे, त्यांना सर्व्हायकल स्पाँडिलायटिस होण्याची शक्यता आहे. जे अवजड ओझे वाहतात, त्यांनाही खांदे आणि कंबरेच्या स्पाँडिलायटिसची शक्यता असते.

लक्षणे : यामुळे रुग्णास पाठीच्या दुखण्याबरोबरच खांदे आणि मानेत वेदना, एखादे काम करताना दुखणे, एखादी वस्तू उचलताना दुखणे, हातापायात मुंग्या येणे, डोके जड वाटणे, चक्कर येणे, झोपल्यानंतर लगेच उठताना चक्कर येणे किंवा नशा चढल्यासारखे वाटणे आदी लक्षणे दिसून येतात. काही लोकांना डोके दुखणे, टोचणे किंवा सुन्न झाल्यासारखे वाटणे इत्यादी तक्रारी असू शकतात.

स्पाँडिलायटिसमुळे साधारणत: ३० ते ५० वर्षांच्या वयातील लोक ग्रस्त होतात. पाठीचा कणा आखडतो. याच्या उपचारात उशीर किंवा निष्काळजीपणा करून चालणार नाही. उपचारास उशीर आणि निष्काळजीपणा दाखवला, तर शरीरास हानी पोहोचते. हा रोग जुना झाल्यास अन्य दुसऱ्या मोठ्या सांध्यावरच परिणाम होतो.

प्रतिबंध : साधारणत: मान आणि कमरेचा स्पाँडिलायटिस सुरुवातीला व्यायाम, दुखणे थांबवणाऱ्या गोळ्या, बेल्ट इत्यादींपासून बरा करता येतो. आजार वाढल्यानंतर तपासणी करून घ्यावी. काहींना ऑपरेशनही करावे लागते. काहींना नसा आणि स्पायनल कॉर्डवर दबाव पडल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात; परंतु या आजाराने ग्रासलेल्या व्यक्ती सजग राहून या रोगापासून बचाव करू शकतात. चिकित्सकांच्या सल्ल्याने काही विशिष्ट प्रकारच्या व्यायामांद्वारे हा आजार नियंत्रणात ठेवता येतो.

जर आराम पडला नाही आणि स्पाँडिलायटिसमुळे आजूबाजूच्या नसा दुखण्यास सुरुवात झाली, तर स्पाइनतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पाइनतज्ज्ञ तपासणी केल्यानंतरच नसांमध्ये दुखणे किंवा सूज स्नायूरोगामुळे आहे की नाही, याचे निदान करून शकतो. मानेला आराम पडण्यासाठी सर्व्हायकल कॉलर वापरावी.

बचाव व उपचार : सर्व्हायकल स्पाँडिलायटिसमुळे प्रभावित जागेवर गरम पाण्याची पिशवी किंवा बर्फाच्या तुकड्यांनी शेक देणे हा उत्तम उपाय आहे. यामुळे त्वरित आराम मिळतो; परंतु ते रोज करणे आवश्यक आहे. सर्जरी करण्याचा सल्ला जर ही समस्या मेंदूच्या नसांपर्यंत जाते आणि प्राथमिक उपचाराने आराम पडत नाही, तरच दिला जातो. यात परिणाम झालेल्या डिस्कला रिमूव्ह करून आजूबाजूच्या हाडाचा छोटासा भाग काढून बोन ग्राफ्ट बसवला जातो. यात हिपच्या आजूबाजूने हाडाचा भाग काढून डिस्कच्या जागी बसवला जातो. ज्या लोकांच्या एकापेक्षा जास्त नसा दुखावलेल्या असतात, त्यांच्यात सर्व्हायकल लेमिनेक्टॉमीची प्रक्रिया सुरू केली जाते. अशा प्रकारच्या सर्जरीमध्ये ६० ते ८० हजार रुपये इतका खर्च येतो.
( लेखक, एलटीएम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, सायन, मुंबई येथे प्राध्यापक आणि हेड ऑफ आॅर्थोपेडिक्स आहेत.)