आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Karachi Terrorist Attack, Pakistan, Divya Marathi

शांतता प्रयत्नांना तालिबानची खीळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सकाळी इस्लामी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला मुंबई हल्ल्याची आठवण करून देणारा होता. मुंबई हल्ल्यादरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये दोन दरवाजांमधून दहशतवादी रेल्वे स्थानकात घुसले होते व त्यांनी प्रवाशांवर बेछूट गोळीबार केला, त्याच पद्धतीने कराची विमानतळामध्ये दोन दरवाजांमधून दहशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करत निष्पाप प्रवाशांचे बळी घेतले. दहशतवाद्यांना विमानतळावरील सर्व विमाने पेटवून द्यायची होती; पण सुरक्षा रक्षकांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. या हल्ल्यानंतर भारतातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट देण्यात आला. पण या घटनेमुळे हे स्पष्ट दिसून आले की, केवळ भारतच नव्हे तर पाकिस्तानही इस्लामी दहशतवाद्यांच्या कारवायांचा बळी ठरत असून दहशतवाद ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे आणि तिचा सामना करण्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये शांततेचे वातावरण असणे अत्यावश्यक आहे. वास्तविक कराची गेली काही वर्षे मूूळ पंजाबी व स्थलांतरित मोहाजीर यांच्यातील संघर्षामुळे होरपळून गेले आहे. या दोन्ही गटांच्या संघर्षात आजपर्यंत शेकडो मरण पावले आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या हत्येनंतर या शहरात विविध तालिबान दहशतवाद्यांचे गट, अमली पदार्थांचे तस्कर आणि आयएसआयचे गुप्तहेर यांच्यातील संघर्ष इतका पेटला आहे की शहराची कायदा-सुव्यवस्था हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्याच आठवड्यात मोहाजीर कौमी मुव्हमेंटचे अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांना लंडनमध्ये अटक झाल्यानंतर शहरात दंगल उसळली होती. तर मे महिन्यात तालिबान दहशतवाद्यांनी बलुचिस्तान प्रांतात 23 शियापंथीयांची हत्या केली होती. सोमवारचा हल्ला तेहरीक-ए-तालिबान या सुन्नी तालिबान दहशतवादी संघटनेने केल्याचे सांगितले जात आहे. कारण या संघटनेचा नवाझ शरीफ सरकारच्या शांतता धोरणांवर विश्वास नाही. शरीफ यांनी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून काही तालिबान गटांशी चर्चा सुरू केली आहे. या चर्चांमध्ये आडकाठी आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्याच्या निमित्ताने तालिबान संघटना सक्रिय झाल्या असून पाकिस्तानचे राजकारण पुन्हा ढवळून गेले आहे.