आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Lords Stadium, Sports, Cricket Divya Marathi

लॉर्ड्सवरील शुभसंकेत (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटमध्ये कोणतीही मैदाने गाजवली तरी लॉर्ड्सवरील विजयाचे मोल निराळेच. विम्बल्डनशिवाय ग्रँड स्लॅमला तेज नाही तसे लॉर्ड्सवरील विजयाशिवाय क्रिकेटला. ‘बिइंग लॉर्ड्स, येस इट इज व्हेरी स्पेशल!’ असे उद्‍गार महेंद्रसिंग धोनीने काढले ते लॉर्ड्सच्या या लौकिकामुळे. खरे तर लॉर्ड्सवरील विजयामध्ये हुरळून जावे असे काही नाही. भारताने विलक्षण कामगिरी करून दाखवली असेही नाही. तरीही हा विजय शेवटी लॉर्ड्सवरचा होता. तो 28 वर्षांनंतर मिळाला म्हणून त्याचे अप्रूप अधिक आहे असे नाही. तो दरवर्षी जरी मिळाला तरीही त्याचे अप्रूप तितकेच असते. धोनी हा विलक्षण नशीबवान खेळाडू म्हटला पाहिजे. क्रिकेटमधील प्रत्येक महत्त्वाची स्पर्धा त्याने जिंकली आहे. आणि आता लॉर्ड्सवरील विजयही त्याच्या खात्यात जमा झाला आहे.

लॉर्ड्सवरील विजय इतक्यापुरतेच या सामन्याचे महत्त्व नाही. भारतीय संघाच्या नव्या रूपाची सुखावणारी चाहूल या सामन्यातून लागली आहे. तीनच वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये भारताची धुलाई झाली होती. त्याची सुरुवात याच लॉर्ड्सवरील सामन्यापासून झाली होती. गेल्या 17 कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला नव्हता. धोनीची कल्पकता त्याला सोडून गेली काय, असा प्रश्न पडत होता. पण या सामन्यात कर्णधार म्हणून धोनी पुन्हा फॉर्ममध्ये आला. गेली पंचवीस वर्षे भारतीय कसोटी क्रिकेटवर सचिन, गांगुली, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे या पाच महानायकांचा प्रभाव होता. यापैकी कोणीही कालच्या सामन्यात नव्हते.

भारतीय राजकारणाप्रमाणे भारतीय क्रिकेटही व्यक्तिनिष्ठ आहे, तेथे एकच कुणीतरी हीरो असतो व त्याच्या जिवावर सामने खेळले जातात अशी टीका होते. ती काही अंशी खरीही आहे. या महानायकांच्या जिवावरच भारतीय क्रिकेटला ग्लॅमर आले होते. तथापि, लॉर्ड्स टेस्टमध्ये कुणी महानायक ठरला नाही तर टीम इंडिया खेळली. प्रत्येक दिवशी कुणीतरी एक चमकला आणि त्याने संघाला विजयाकडे नेले. पहिला दिवस अजिंक्य रहाणेचा, दुसरा भुवनेश्वरचा, तिसरा मुरली विजयचा, चौथा रवींद्र जाडेजाचा आणि पाचवा अर्थातच ईशांत शर्माचा. प्रत्येकाच्या खेळात वेगाने सुधारणा होत असल्याचे जाणकारांना दिसले. स्विंग खेळणे मुरली विजयला नीट जमत नसे, पण या वेळी तो स्विंग आरामात खेळत होता. रहाणेच्या फलंदाजीचे खुद्द धोनीने मोकळेपणे कौतुक केले. 154 चेंडूंत 103 धावा काढत तळपणारी रहाणेची बॅट हा भारतासाठी शुभशकुन आहे. दुसरा शुभशकुन आहे तो भुवनेश्वरचा. अष्टपैलू खेळाडूची उणीव धोनीला सातत्याने जाणवत होती. ही उणीव भरून काढणारा खेळ भुवनेश्वरने केला. दोन कसोटीत 209 धावा व 11 बळी ही आकडेवारी अष्टपैलुत्वाकडे नेणारी आहे, तर रवींद्र जडेजामधील खुमखुमी ही गांगुलीची आठवण करून देणारी आहे. ‘हिंमत’ या एका शब्दाभोवती त्याच्यातील राजपूत रक्त उसळत असते. त्याचे रांगडे वागणेबोलणे अनेकांना खटकत असेल; पण शिष्टपणाचा आव आणणारे ब्रिटिश काय लायकीचे असतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

भारतीय संघात हिंमत आणली ती कपिलने. त्याची पायाभरणी केली होती सुनीलने. कपिलच्या हिमतीला रांगड्या आक्रमकतेची जोड दिली ती गांगुलीने. हे सर्व गुण रिचवून शांतपणे नेतृत्व करण्याची कला साधली ती एमएस धोनीने. ‘आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग’बद्दल नेहमी बोलले जाते. धोनीचे सर्व नेतृत्व हे ‘आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग’ आहे. उसळी मारणारा आखूड टप्प्याचा मारा करण्याची कल्पकता त्याची. अशा मार्‍यामध्ये हिंमत, आक्रमकता, रांगडेपणा हे सर्वकाही येते. ईशांत शर्माला हे पटत नव्हते. पण 140 ते 150 किमी वेगाने येणारा आखूड टप्प्याचा चेंडू करामत करील ही खात्री धोनीला होती. त्याने क्षेत्ररक्षण असे लावले की ईशांतला तसाच मारा करावा लागला. खरे तर आखूड टप्प्यावर हूक हे फलंदाजाचे ठेवणीतील हत्यार. इंग्लिश फलंदाजांनी ते वापरलेही; पण धोनीने धूर्तपणे लावलेल्या क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यात ते अलगद फसले. आखूड टप्प्याची भेदक गोलंदाजी फक्त वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज करू शकतात ही समजूत ईशांतकरवी धोनीने खोटी ठरवली. बॉडीलाइन पद्धतीने येणारा तब्बल 32 चेंडूंचा त्याचा भेदक मारा इंग्लंडला सहन करता आला नाही. ‘वुई कॅन बाउन्स आऊट टीम’ हे
सौरव गांगुलीने समाधानाने काढलेले उद्‍गार भारताकडे आलेल्या नव्या अस्त्राचे महत्त्व सांगून जातात. वेग व उसळी याचा उत्तम मेळ घालत केलेला तिखट मारा हाच भारताला भविष्यात विजय मिळवून देऊ शकतो, फक्त फलंदाजीतील कर्तृत्व नव्हे. लॉर्ड्सवर असे काही शुभसंकेत मिळाले आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊन संघबांधणी केली तर पुढच्या वर्षी होणारा विश्वचषक राखणे कठीण जाणार नाही. मात्र, भारतीय क्रिकेट हे मान्सुन इतकेच बेभरवशाचे असल्याने शुभसंकेतामध्येही जपून पाहावे लागते.