आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्जीचा मालिक! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या भूकंपाचे धक्के दोन वर्षांपासून बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासनाला बसत आहेत. तीन दिवसांपूर्वीच क्रिकेट मैदानावर धोनीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीच्या भूकंपाचा धक्का या विश्वाला बसला. शांत, धीरगंभीर, सदा हसतमुख असणार्‍या या यशस्वी कप्तानाच्या आणि जाहिरातदारांच्या ‘ब्रँड’च्या अंतरंगातील स्पंदने मात्र वेगळीच आहेत. वरवर शांत दिसणार्‍या त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे बाह्य स्वरूप एखाद्या सागरासारखे आहे. आत मात्र प्रचंड उत्पात, उलथापालथ आहे. तो स्वत:च्या मनाचा मालक आहे. अमिताभ बच्चनचे फोनही तो घेत नाही. स्वत:च्या लग्नाला त्याने सचिन तेंडुलकरसह कुणाही क्रिकेटपटूला निमंत्रित केले नाही. पद्मश्री घेण्यासाठी भारताच्या राजधानीत - दिल्लीत राष्ट्रपती भवनापर्यंत जाण्याचे कष्ट घेतले नाहीत. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेत असतानाही आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी एक रात्र थांबण्याचे सौजन्य त्याने दाखवले नाही. पण तो तसाच आहे.

२०१२ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात त्याने घोषणा केली होती की, २०१५ पूर्वी क्रिकेटच्या कोणत्या तरी एका प्रकारातून आपण निवृत्त होऊ. त्याने आपला शब्द पाळला. कदाचित तो २०१५ च्या विश्वचषक क्रिकेटनंतर क्रिकेटपासून कायमचा दूर होण्याची शक्यता आहे. कारण क्रिकेट हे त्याच्या आयुष्यापुढचे एकमेव ध्येय नाही. लष्करात जाऊन देशाची सेवा करण्याचे त्याचे वेड बालपणापासूनचे आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती हा कदाचित छोटा धक्का असू शकेल. विश्वचषकानंतर त्यापेक्षा मोठा धक्का तो देऊ शकेल. त्याचे रांचीसारख्या छोट्या शहरातून येऊन सर्वाधिक यशस्वी क्रिकेटपटू होणे हेच मुळी धक्कादायक आहे. यष्टिरक्षक होण्याची नैसर्गिक गुणवत्ता नसतानाही तो यष्टींपाठी यशस्वी ठरला. यष्टिरक्षक कप्तान फारसे झाले नाहीत. त्याने मात्र एका दशकात भारताला कसोटी, एकदिवसीय क्रिकेट आणि ट्वेंटी-२० क्रिकेटच्या अत्युच्च स्थानावर नेऊन ठेवले. त्याची फलंदाजी कोणत्याही तंत्रशुद्धतेच्या मोजमापात मोजता यायची नाही. मात्र त्याच फलंदाजीने भारताला दिलेले यश अमाप आहे. त्याचे फटके नावीन्याची झलक दाखवतात. मेहनत-मजुरी करणार्‍या मजुराच्या रांगड्या शैलीत त्याने मारलेल्या फटक्यांचे ‘हेलिकॉप्टर शॉट’ असे नामकरण करून त्याचे मार्केटिंग केले गेले. मात्र याच रांगड्या शैलीच्या बॅटने भारताला विजयाच्या निर्णायक क्षणापर्यंत नेण्याची क्षमता दाखवली.

फलंदाजी, यष्टिरक्षण आणि नेतृत्व या आघाड्यांवर भारतीय क्रिकेटमध्ये एक दशकभर राज्य करणारा तो इतरांपेक्षा म्हणूनच वेगळा ठरला. त्याला सामन्यातील कलाटणीचे क्षण अचूक कळतात. त्यामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठीची योजनाही त्याच्याकडे तयार असते. तो म्हणूनच नेहमी शांत दिसतो. क्रिकेटच्या बाबतीत कामचुकारपणाही आवडत नाही. त्याचा निवृत्तीच्या क्षणी असणारा फिटनेस आजच्या तरुण क्रिकेटपटूंनाही लाजवणारा आहे. निवृत्तीच्या कसोटीतही २२ यार्डांवरची धाव इतरांपेक्षाही चपळ, वेगवान आहे. मुद्गल समितीच्या चौकशीमध्ये त्याचे नाव असण्याची शक्यता असल्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारली, हा समजच चुकीचा आहे. रवी शास्त्रीबरोबर खटके उडाल्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारली, असाही गैरसमज पसरला आहे. प्रत्यक्षात तो स्वत:च्या मर्जीचा मालिक आहे. तो कधी, कुठे आणि काय करेल, हे फक्त तोच सांगू शकतो. प्रसिद्धिमाध्यमांनाही चार हात दूर ठेवण्याची कला अवगत असलेल्या या भारताच्या यशस्वी कप्तानाची निवृत्ती म्हणूनच लक्षात राहणारी ठरेल. तरीही एक गोष्ट खटकतेच. निवृत्तीचा निर्णय त्याने स्वत:च्या स्वभावधर्मानुसार घेतला असला तरीही आपल्या कृतीमुळे भारतीय क्रिकेटची झालेली कुचंबणा लक्षात घ्यायला हवी होती. निवृत्तीचा निर्णय त्याने स्वत:पुरता बराच आधी घेतला असावा, मात्र त्याने ती गोष्ट निवड समिती सदस्यांना सांगितली नव्हती. बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकार्‍याकडे तो याबाबत काहीही बोलला नव्हता.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर तो उशिरा पोहोचला. मात्र अ‍ॅडिलेड कसोटीआधी तो फिट होता. अ‍ॅडिलेड कसोटीत तो खेळू शकला असता. त्याने ते मुद्दामच टाळले. ब्रिस्बेन व मेलबर्न कसोटीत त्याने नेतृत्व केले आणि त्याच (मेलबर्न) कसोटीत निवृत्ती जाहीर करून टाकली. बेसावध निवड समिती आणि टीम इंडिया यांची त्यामुळे धावपळ झाली. हा गोंधळ धोनीला टाळता आला असता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपूर्वीच निवड समितीला विश्वासात घेऊन आपल्या संभाव्य निवृत्तीबाबत संकेत दिले असते तर निवड समिती आणि नवनिर्वाचित कप्तान कोहली यालाही वेळ मिळाला असता. निवड समितीला धोनीच्या निवृत्तीमुळे यष्टिरक्षक, कप्तान आणि फलंदाज अशा तीन गोष्टींचा शोध घ्यावा लागणार आहे. कोहलीला कप्तानपदाच्या बोहल्यावर चढवण्यात आले. साहाकडे यष्टिरक्षणाचे ग्लोव्हज सोपवण्यात आले. मात्र संघाला आधार देणारा एक विश्वस्त क्रिकेटपटू अजून मिळाला नाही.