आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभमंगल सावधान… (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण जगभरात भारताविषयी ज्याचे अप्रूप असते अशा मोजक्या बाबींपैकी एक म्हणजे भारतीय विवाह संस्था. कुटुंबातील ज्येष्ठांच्या संमतीने रितसर स्थळ ‘पाहून’ ठरणारे विवाह हा आपल्या संस्कृतीचा एका विशेष. पण, कालौघात त्यामध्ये झपाट्याने बदल होत असून, अलिकडे परस्पर संमतीने होणारे प्रेमविवाह बऱ्याच अंशी समाजमान्य होऊ लागले असताना गुगलतर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘इयर इन सर्च’ अहवालात काही धक्कादायक म्हणाव्यात अशा बाबी समोर आल्या आहेत. त्यातून विवाहाचा ‘पॅटर्न’ बदलत असल्याचे तर दिसतेच, शिवाय ‘डेटिंग पार्टनर’चा शोध घेण्याचे प्रमाणदेखील भारतीयांमध्ये लक्षणीय वाढत असल्याचे स्पष्ट होते. सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचा अंदाज बांधण्यासाठी हे सारे साकल्याने जाणून घ्यायला हवे.

वर्षभरात विशिष्ट प्रदेशांत इंटरनेटवर कोणता ‘की वर्ड’ अधिक प्रमाणावर शोधला गेला त्याची माहिती गुगलच्या ‘इयर इन सर्च’ अहवालात असते. त्या त्या ठिकाणचा ‘ट्रेंड’ समजण्यासाठी हे एक महत्त्वाचे परिमाण समजले जाते. २०१६ च्या अहवालानुसार भारतात गुगलच्या सर्च इंजिनवर जो शब्द अथवा की वर्ड सर्वाधिक सर्च झाला तो ‘डेटिंग पार्टनर’ हा होता. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल ५० टक्क्यांहूनही अधिक आहे. तसेच या काळात ५३ टक्क्यांहून अधिक लोकांनी गुगल प्ले स्टोअरवरून डेटिंग अॅप्स डाऊनलोड केली आहेत. भारतीय विवाह संस्थेची प्रदीर्घ परंपरा आणि त्यावर बेतणारे नैतिकतेचे नियम, चालीरिती यांना या माध्यमातून एक मोठा तडा जात असल्याचे हे निदर्शक म्हणावे लागेल. इंटरनेटद्वारे चालणारे देशाचे ‘ऑनलाइन मॅट्रिमोनी मार्केट’ तीन वर्षांत तब्बल १४० टक्क्यांनी विस्तारणार असल्याचेसुद्धा ही आकडेवारी सांगते. विवाहासाठी इंटरनेटद्वारे होणाऱ्या वधू-वरांच्या निवडीसोबतच विवाहासाठी होणारी खरेदी, सोहळ्याची सजावट, पूर्वतयारी, मेकअप्, भेटवस्तू आदी बाबी या ‘मेट्रिमोनी मार्केट’मध्ये मोडतात.

सध्या ४९२ कोटींची असलेली ही बाजारपेठ येत्या तीन वर्षांत तब्बल १,१९७ कोटींवर जाईल, अशी शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे. गुगल आणि तत्सम बहुराष्ट्रीय कंपन्या या सगळ्यांकडे केवळ ‘मार्केट’ म्हणून पाहात असल्या तरी आपण त्याकडे बाजारपेठीय दृष्टिकोनापेक्षा सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाने अधिक पाहायला हवे. भारतीय कुटुंबसंस्थेचा पाया येथील विवाहसंस्थेवर बेतलेला आहे. हे लक्षात घेतले तर भविष्यात अशा बदलत्या मानसिकतेतून सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर मोठ्या उलथापालथींना सामोरे जावे लागेल, याचे भान आपण बाळगले पाहिजे. युवा पिढीने परस्पर संमतीने आपले विवाह ठरवणे अथवा विवाहासाठी इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या बहुपर्यायांचा विचार करणे कालसुसंगत असले, तरी त्यातील धोकेही वेळीच लक्षात घ्यायला हवेत. 

जसे ऑनलाइन मॅट्रिमोनी साईट‌्सद्वारे होणारे विवाह वाढत आहेत तसे विवाहेच्छुंची, त्यातही महिलांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असल्याचे मध्यंतरी एका पाहणी अहवालात आढळले होते. अशा साइटवर बनावट अकाउंंट उघडणे वा तेथे अर्धवट स्वरूपाची माहिती नमूद करून फसवणुकीचे फंडे मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याची अनेक उदाहरणे आजूबाजूला पाहावयास मिळतात. आपल्या पारंपरिक विवाह पद्धतीत स्थळाविषयी नातेवाइक, परिवार, मित्रमंडळींशी सल्लामसलत, चर्चा होत असल्याने दोन्ही बाजूकडील बहुतेक माहिती समोर येते. 

स्थळ घटस्फोटित आहे अथवा संबंधिताच्या शिक्षण, नोकरी, व्यवसाय याविषयी चार ठिकाणांहून खातरजमा करून घेता येते. पण, ‘ऑनलाइन’ साइटवर हे दडवणे तुलनेने सोपे जाते. हे लक्षात घेता मध्यंतरी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पाठपुराव्यानंतर माहिती-तंत्रज्ञान विभागाने अशा सर्व संकेतस्थळांसाठी काही नियम अनिवार्य केले आहेत. त्यानुसार संबंधितांनी नोंदवलेली माहिती ही त्यांच्या सांगण्यानुसार असून येथील माहितीच्या देवघेवीची जबाबदारी आपणावर नसल्याचा सावधानतेचा इशारा बहुतेक संकेतस्थळांनी द्यायला सुरुवात केली आहे. परंतु, माहितीबाबत काही तक्रार असल्यास अथवा फसवले गेल्यास अमूक इथे संपर्क साधा यासारख्या तरतुदींची अद्याप म्हणावी तशी अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भातील नियम व कायदे अधिकाधिक स्पष्ट आणि काटेकोर व्हायला हवेत. 

आपल्याकडची सामाजिक परिस्थिती पाश्चिमात्त्यांहून खूपच भिन्न आहे. त्यामुळे फसगत झाल्याचे विवाहानंतर लक्षात आले तर त्याचे व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरचे परिणाम तुलनेत कैकपटीने गहिरे असतात. तेव्हा काळाप्रमाणे बदलताना, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेताना त्यातील संभाव्य धोके ओळखणे आणि त्याविषयी सजग राहणेही तेवढेच गरजेचे बनते. म्हणूनच बदलती विवाह पद्धती किंवा डेटिंगचा ट्रेंड आपलासा करताना सजगतेचे भान करून देणारा पारंपरिक विवाह सोहळ्यातला शुभमंगल सावधान… हा गजर नव्या पिढीने किमान स्वहितासाठी तरी लक्षात ठेवावा.
बातम्या आणखी आहेत...