आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Medical Council Of India In India, Divya Marathi

आरोग्य व्यवस्थेचे विच्छेदन (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था भ्रष्ट व्यवहारांमुळे वरपासून खालपर्यंत पुरती बेहाल झाली असताना प्राथमिक आरोग्य केंद्रापासून दिल्लीतल्या आरोग्य मंत्रालयापर्यंत सारेच जण वस्तुस्थितीकडे कानाडोळा करत आले आहेत किंवा निर्लज्जपणे जे घडत आहे ते नाकारत तरी आले आहेत. अशा वेळी खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ ही भ्रष्टाचारी संस्था आहे असे म्हणत आरोग्य व्यवस्थेचे जाहीरपणे विच्छेदन करायला घ्यावे, या कृतीला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या या कृतीला राष्ट्रीय आरोग्यविषयक अहवालात नमूद चिंताजनक भविष्यवेधी आकडेवारीचा जसा ताजा संदर्भ आहे, तसेच ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये अलीकडेच प्रकाशित भारताच्या आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढणार्‍या लेखांचा आणि अमेरिकेत प्रयोगशाळेच्या शीतगृहात एकेकाळी गोळा केलेल्या देवी रोगाशी संबंधित विषाणूंचे नमुने सापडल्याच्या धक्कादायक बातमीचाही अप्रत्यक्ष संदर्भ आहे. ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ला शिंगावर घेतानाच डॉ. हर्षवर्धन यांनी ‘क्लिनिकल ट्रायल्स’वर नजर ठेवून असलेल्या ‘सेंट्रल ड्रग स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन’ या संस्थेला विषारी सापांच्या घराची उपमा दिली आहे. केंद्रीय आरोग्य योजना भ्रष्टाचार्‍यांचा अड्डा बनलेली असल्याने नाइलाजाने सामान्य रुग्ण खासगी आरोग्य सेवेच्या जाळ्यात अडकत असल्याच्या भीषण वास्तवाकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. वारसा म्हणून मला विषाचा पेला मिळाला असला, तरीही यापुढच्या काळात नैतिकता आणि पारदर्शकतेच्या बळावर आरोग्य क्षेत्रात क्रांती घडून येणार असल्याची ग्वाही त्यांनी वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित संस्था-संघटनांवर टीकास्त्र सोडताना दिली आहे. तशी ग्वाही देताना माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढे निविदा किंवा औषध खरेदीसंबंधित महत्त्वाच्या बैठकांचे व्हिडिओ शूटिंग करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. देशाच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या संबंधित घटकांचा केंद्रीय मंत्र्याने जाहीर पंचनामा करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. आज ज्या वाईट प्रथांचा आणि व्यवहारांचा हर्षवर्धन यांनी उल्लेख केला, तशी परिस्थिती खरे तर काही अपवाद वगळता बहुतेक भाजप-काँग्रेसशासित राज्यांमध्ये यापूर्वीही होती. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका लेखात डेव्हिड बर्जर यांनी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित त्याच भयावह परिस्थितीचे वर्णन केले आहे. विशेषत: ‘कट प्रॅक्टिस ’आणि ‘किक बॅक’ या घातक प्रथांचे दाखले देताना बर्जर यांनी भारतात डॉक्टरमंडळी कशा प्रकारे कमिशनचे रॅकेट चालवतात किंवा औषध कंपन्यांचे प्रतिनिधी डॉक्टर मंडळींना लाच स्वरूपात परदेश वार्‍या आणि सर्व तर्‍हेची सुखे मिळवून देतात, हे जगापुढे उघड केले आहे. किंबहुना म्हणूनही ‘पॉलिटिकली परफेक्ट’ भूमिका न घेता आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेण्यास डॉ. हर्षवर्धन यांनी प्रारंभ केला आहे. आरोग्य व्यवस्थेचे गांभीर्यपूर्वक ऑडिट यापूर्वीच व्हायला हवे होते, हे जरी खरे असले तरीही त्यासाठी आता इतकी योग्य वेळ नाही हेही खरे आहे. कारण डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय आरोग्यविषयक अहवालामध्ये 2020 पर्यंत भारतातल्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आताच्या तुलनेत 20 टक्क्यांहून अधिक वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात पुरुषांमध्ये 19 टक्के, तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण 23 टक्के इतके मोठे असणार आहे. मुखाचा कर्करोग होणार्‍यांचे प्रमाण तब्बल 51 टक्के असणार आहे. यात भरीस भर म्हणून एकेकाळी जागतिक आरोग्य संघटनेने जग ज्या आजारापासून मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिले होते, त्या देवी रोगाच्या विषाणूंचे एकेकाळी जमा केलेले तपासणी नमुने अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील शास्त्रज्ञांना अडगळीत सापडल्याने जागतिक आरोग्य विश्वात चिंतेचे काहूर माजले आहे. दुसरीकडे, भारताला पोलिओमुक्त प्रमाणपत्र मिळाले असले तरीही अनेक तज्ज्ञांचा या प्रमाणपत्रावर अजूनही विश्वास बसलेला नाही. चोहोबाजूंनी परिस्थिती ही अशी गंभीर असल्यामुळेच कदाचित आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍यांना यापुढे दयामाया नाही, असा संदेश आरोग्यमंत्री जाहीरपणे देऊ पाहत आहेत. मात्र, डेव्हिड बर्जर यांनी आपल्या लेखात म्हटल्याप्रमाणे, या घटकेला समर्पित भावनेने सेवा देणारे डॉक्टर आणि आरोग्यसेवकांचा आत्मविश्वास डळमळणार नाही, याची काळजी घेत आरोग्य क्षेत्रातल्या अनैतिक वर्तनाचे मूळ असलेल्या, गुणांपेक्षाही पैशांच्या बळावर विद्यार्थ्यांना प्रवेश देणार्‍या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर (पर्यायाने ते चालवणार्‍या तथाकथित शिक्षणसम्राटांवरही) सरकारचे नियंत्रण येणार नाही, तोवर सडलेली आरोग्य व्यवस्था स्वच्छ होण्याची सुतराम शक्यता नाही.