आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Military Chief Dalbir Singh Suhag, Divya Marathi

वादावर पडदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाचे नवे लष्करप्रमुख कोण याबाबतचा वाद पेटण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षण खात्याचा कारभार सांभाळणार्‍या अरुण जेटली यांनी बुधवारी लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग हेच देशाचे पुढील नवे लष्करप्रमुख असतील, अशी घोषणा करून सरकारची तात्पुरती का असेना सुटका केली. जेटली यांनी देशाच्या लष्कराला राजकारणापासून दूर ठेवायला हवे, असेही प्रतिपादन केले.

जेटली यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांना उपरती झाली, असे म्हणावयास पाहिजे. कारण दोन महिन्यांपूर्वी यूपीए सरकारने दलबीरसिंग सुहाग यांचे नाव नवे लष्करप्रमुख म्हणून संमत केल्यानंतर भाजपने थयथयाट केला होता व निवडणुकांच्या काळात अशा नेमणुका करणे गैर असल्याचे आरोप केले होते. पण त्या वेळी सरकारने सरकारी नियुक्त्या किंवा पदोन्नती हा सरकारी कामकाजाचा भाग असल्याची भूमिका घेतली होती. आता सत्तेत आल्यानंतर भाजपने यूपीए सरकारचा निर्णय योग्य होता अशी कोलांटउडी घेतली. शिवाय दलबीरसिंग यांच्या विरोधातील याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील राज्यमंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांना हे पसंत नव्हते. कारण त्यांनीच लष्करप्रमुखपदी असताना दलबीरसिंग सुहाग यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत त्यांची पदोन्नती रोखण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतरचे लष्करप्रमुख विक्रमसिंह यांनी हे आरोप मागे घेत दलबीरसिंग यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला. त्यामुळेच व्ही. के. सिंह अस्वस्थ झाले होते. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर त्यांनी दलबीरसिंग सुहाग यांच्या नियुक्तीला पुन्हा विरोध केला. त्यांच्या या व्यक्तिगत पातळीवरील आकसाला, राजकारणाला आवर घालणे गरजेचे होते. कारण याच व्ही. के. सिंह यांनी आपले वय लपवून सरकारशी वाद ओढवून घेतला होता व लष्करप्रमुखपदी असतानाही त्यांनी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी नौदलप्रमुखांच्या नेमणुकीलाही आक्षेप घेतला होता. अशा व्ही. के. सिंह यांची ही वादग्रस्त पार्श्वभूमी पाहता जेटली यांनी वादावर पडदा टाकणे गरजेचे होते. त्यामुळे लष्कराची शान वाढली.