आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवाद ताणू नका (संपादकीय)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘भारतमाता की जय’ ही घोषणा देण्यास नकार दिल्याबद्दल एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरते विधानसभेतून निलंबित करण्यात आले. भावनेच्या भरातील राजकारण सध्या जोरात आहे. त्याला धरूनच हे झाले. गेले वर्षभर काँग्रेस, डावे पक्ष अशांनी भाजपची वैचारिक कोंडी केली आहे. हिंदुत्व, फॅसिझम अशा विशेषणांसह मोदी सरकारला रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहे. मोदी सरकारचा कारभारही अशा आरोपांना बळ मिळवून देतो. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी भाजपने राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन प्रतिहल्ला केला. आपली मतपेढी पक्की करण्यात आणि विरोधकांना संभ्रमित करण्यात भाजपला यात यश आले. भारतमातेवरून विधिमंडळात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची शरणागती भाजपची कुरघोडी सिद्ध करते. राष्ट्रवाद हे चलनी नाणे सध्या भाजपच्या हातात आले आहे व त्याचा जनसामान्यांना पटेल असा प्रतिवाद करण्यात विरोधी पक्षांना अपयश येत आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर पठाण यांच्या निलंबनाकडे पाहिले पाहिजे. सध्या भारतात भारतमाता की जय असे म्हणणे शिकवावे लागते, असा शेरा सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेएनयूच्या संदर्भात मारला होता. भारतातील बोलक्या समाजगटांबद्दल संघाच्या धारणेला अनुसरून तो शेरा होता; पण त्याचा राजकीय फायदा घेता येईल हे एमआयएमचे चाणाक्ष नेते ओवेसी यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्परतेने अशी घोषणा करण्यास विरोध दर्शविला आणि वादाला खाद्य मिळाले. समाजात स्पष्टपणे दोन गट पाडण्याच्या ओवेसी यांच्या राजकीय धोरणाला अनुसरूनच हा वाद होता. विधिमंडळात एमआयएमचे इम्तियाझ जलील यांनी राष्ट्रपुरुषांच्या स्मारकावर शेरेबाजी केली. तीही एमअायएमच्या धोरणाला जुळणारी आहे. स्मारकांना अग्रक्रम का, असा प्रश्न जलील यांनी केला. त्याबद्दल पुरोगामी प्रशंसा करतील, पण माणूस फक्त सोयी-सुविधांवर जगत नाही. त्याला सामाजिक भावना असतात. त्या मुद्दाम डिवचण्याची गरज नसते. अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या अनेक सवलतींबाबतही अग्रक्रमाचा मुद्दा कोणी उपस्थित केला, तर जलील यांची प्रतिक्रिया काय असेल? जलील यांच्या वक्तव्यामागे डिवचण्याचा उद्देश होता. तो पूर्ण झाला व भाजपच्या आमदारांनी भारतमातेच्या घोषणेचा मुद्दा काढला. सक्तीने घोषणा देणार नाही, असे वारिस पठाण यांनी म्हटले आणि वातावरण क्षुब्ध झाले व पठाण निलंबित झाले. राजकीय व्यूह म्हणून विचार करता यात भाजपचा विजय झाला. कारण राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्वच पक्षांना भाजपने आपल्यामागे फरपटत आणले. वैचारिक हातघाईत सध्या तरी भाजपने बाजी मारली.
तथापि, एकमेकांना डिवचण्याच्या या राजकारणातून जनतेच्या हिताचे काय साधले, याचा विचार करायला हवा. त्याचबरोबर बोलक्या राष्ट्रवादाच्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. घोषणा द्यायला लावून राष्ट्रप्रेम जन्माला घालता येत नाही आणि घोषणा दिल्या म्हणजे ते मनात असतेच असे नाही. समाजाबरोबर कायम फटकून वागणाऱ्यांकडून राष्ट्रभक्ती वदवून घेणे हेच राष्ट्रकर्तव्य असे संघ परिवार का मानतो हे कळत नाही. त्याचबरोबर समाजाला एकत्रित आणणाऱ्या राष्ट्रप्रेमासारख्या भावनांना िडवचण्यात डावे व एमआयएमसारखे पक्ष यांना काय पुरुषार्थ वाटतो तेही समजत नाही. राष्ट्रवाद ही भावना समाजात जोम आणते, समाजाला काम करण्यासाठी प्रवृत्त करते, बांधिलकी निर्माण करते. यामुळेच, स्वातंत्र्याचा थोडाफार संकोच झाला तरी, बहुसंख्य समाजाला ही भावना आवडते. मात्र खरा राष्ट्रवाद हा घोषणांतून, सक्तीतून येत नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, आर्थिक उलाढाली या क्षेत्रात केलेल्या पराक्रमांतून तो येतो. जर्मनी हे याचे उत्तम उदाहरण. राष्ट्रवादाच्या अतिरेकाचे दुष्परिणाम हिटलरच्या काळात जर्मनीने अनुभवले. त्यानंतर राष्ट्रवादाचा उन्माद समाजात उठणार नाही याची दक्षता काटेकोरपणे घेतली गेली. इतकी की फुटबॉल विश्वचषक जिंकल्यावरही त्याचा राष्ट्रवादी जल्लोष केला गेला नाही. मात्र, याच काळात तंत्रज्ञानापासून व्यापारापर्यंत अनेक क्षेत्रांंमध्ये बळकट काम केले गेले. आज हिटलरप्रमाणे कोणतेही राष्ट्र ताब्यात न घेता जर्मनीने युरोपवर कब्जा केला आहे. इतिहासकारांच्या मते, बिस्मार्कचे जर्मन साम्राज्याचे स्वप्न अँजेला मर्केल यांनी साध्य केले आहे. विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करून संंपन्नता मिळविलेल्या जर्मन नागरिकाचा राष्ट्रवाद, घोषणा न देता जगावर प्रभाव टाकतो. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम या फार ताकदवान सामाजिक शक्ती आहेत. एकमेकांना डिवचण्यासाठी त्याचा वापर झाला तर समाज कडवट होतो. अशा कडवट समाजात उन्मादी राष्ट्रवाद फोफावतो. अशा उन्मादी राष्ट्रवादाने काही राष्ट्रे दिवाळखोरीत निघाली हे विसरू नये.
बातम्या आणखी आहेत...