आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयाचा मोदी अर्थ (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकीचे विविध अर्थ राजकीय विश्लेषक काढीत असतात. तथापि, विजयी नेता निवडणुकीचा काय अर्थ लावतो याला अधिक महत्त्व असते. कारण तो अर्थ समोर ठेवून विजयी नेत्याची पुढील वाटचाल होणार असते. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने उत्तम कामगिरी केली. विशेषतः उत्तर प्रदेशात विलक्षण मोठे यश मिळविले. या यशाचा मोदींनी काढलेला अर्थ रविवारच्या त्यांनी भाजप मुख्यालयात केलेल्या भाषणातून उलगडला गेला. भाजपच्या राजकारणाची पुढची दिशा त्यातून लक्षात येते. ही दिशा, निदान सध्यातरी धास्ती निर्माण करणारी नाही हे शुभलक्षण आहे. 

उत्तर प्रदेशातील विजयानंतर मोदींची गुर्मी वाढेल आणि हुकूमशाही पद्धतीचा कारभार सुरू होईल अशी धास्ती काही वर्तुळातून व्यक्त होऊ लागली. तशी ती गेली तीन वर्षे होत आहे. वस्तुस्थिती तशी नसली तरी तशी ती आहे असे भासविणारे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. या प्रयत्नांना बळ मिळेल असे कोणतेही वक्तव्य मोदींनी केले नाही. उलट त्यांनी सामंजस्य व नम्रतेची भूमिका घेतली. फळे आल्यावर वृक्ष झुकतो, तसेच भाजपने केले पाहिजे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. उत्तर प्रदेशात भाजपने एकाही मुस्लिम नेत्याला उमेदवारी दिली नव्हती. यावरून बरीच टीका सुरू आहे. उमेदवारी न देण्यामागचे राजकारण वेगळे होते व त्याचा फायदा भाजपला झाला. 

मात्र मुस्लिमांना उमेदवारी न देताही प्रचंड विजय मिळविता येतो हा संदेश त्यातून गेल्याने मुस्लिमांमध्ये धास्ती निर्माण होण्याची शंका होती. ही शंका चेतविण्याचे प्रयत्नही मोदी-विरोधकांकडून सुरू झाले असते. हे लक्षात घेऊन मोदींनी, बहुमत पक्षाचे असले तरी सरकार सर्वांचे असते असे सांगितले व आम्हाला मते न देणाऱ्यांचेही हे सरकार आहे असे पुन्हा पुन्हा म्हटले. असे म्हणणे आवश्यक होते. मात्र या वक्तव्याचे महत्त्व मोदींनी आपल्याच काही शागिर्दांना आधी समजून सांगायला हवे. अन्यथा लहानसहान उद्गारावरूनही वातावरण पेटविण्याची संधी साधणारे टपलेले आहेत आणि पराजयामुळे ते अधिक खवळले आहेत. नेत्याने विजय नम्रतेने स्वीकारला तरी विजयामुळे विरोधकांची मने जिंकता येत नाहीत. आपल्या कोषात अडकून पडलेल्यांची तर अजिबात जिंकता येत नाहीत हे शिवसेनेच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येईल. तेव्हा विरोधकांना संधी मिळणार नाही असे बोलणे-चालणे ठेवण्याचे बंधन भाजप नेत्यांवर अमित शहा व मोदी यांनी घातले पाहिजे.
 
तथापि विजयी भाषणात मोदी व शहा यांनी विजयाचे मुख्य कारण गरीबांसाठी केलेले काम असे सांगितले व गरिबांच्या हितासाठीच हे सरकार कटीबद्ध आहे असे पुन्हा पुन्हा म्हटले. मोदी सरकारने गरीबांसाठी काही योजना प्रयत्नपूर्वक राबविल्या. त्याचा उल्लेख निवडणूक वार्तापत्रांतून क्वचित झाला असला तरी त्याचा प्रभावी परिणाम निकालानंतरच अनेकांच्या लक्षात येऊ लागला. भारतावर भाजपचा प्रभाव ठेवायचा असेल तर गरिबांना आपल्याबरोबर घेतले पाहिजे, त्यांच्याबरोबर पक्षाचे संबंध दृढ केले पाहिजेत याकडे मोदी-शहा बारकाईने लक्ष देत आहेत. देशातील गरिब हा मोदी-शहांनी आपला मतदारसंघ केला आहे व गरिबांच्या हिताकडे लक्ष दिले तर जात-धर्म-पंथ तोडता येतात हे लक्षात घेतले आहे. निवडणुकीसाठी जातीची समीकरणे जोडायची, मात्र सरकारचा कारभार गरिबांना थेट मदत देण्यावर केंद्रीत करायचा अशी ही व्यूहनीती आहे. मात्र मुस्लीमांकडे ज्याप्रमाणे हक्काची मतपेढी म्हणून पाहिले गेले व त्यांच्या अवास्तव मागण्याही मान्य करण्याची अहमहमिका राजकीय पक्षांमध्ये लागली तसे गरीबांबद्दल न करता गरिबांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर मोदींनी भर दिला. 

इंदिरा गांधीची गरिबी हटाव व त्यानंतर आजपर्यंत चालत आलेली काँग्रेसची राजनीती व मोदींनी आज मांडलेले धोरण यात हा महत्वाचा फरक आहे. अवसर दे दो, मेहनत मैं करूंगा असे आजचा गरीब म्हणतो असे मोदी म्हणाले. सरकारचे धोरण याच दिशेने चालले तर भाजपचा पाया विस्तारण्यास वेळ लागणार नाही. गरीबांवर लक्ष केंद्रीत करीत असतानाच भाजपची मूळ मतपेढी असलेल्या मध्यमवर्गाचा मोदींनी विशेष उल्लेख केला. देशाचा जास्तीत जास्त बोजा मध्यमवर्ग उचलतो आणि गरिबांना अधिक संधी मिळत गेली तर मध्यमवर्गावरील बोझा कमी होईल आणि मध्यमवर्ग अधिक कार्यक्षम होईल असे गणित त्यांनी मांडले. 

सामान्य जनतेला सहज पटेल असे हे गणित आहे. गरिब व मध्यमवर्ग यांची जोड घालून नव्या भारताचा पाया रचण्याची घोषणा त्यांनी केली. मध्यमवर्गाचा स्पष्ट उल्लेख व गरीबांवर उपकार करण्यापेक्षा त्यांना संधी देण्यावर अधिक भर हे मोदींच्या घोषणेचे वैशिष्ट्य. मध्यमवर्ग व गरिबांचा विजय असा मोदींनी निवडणूक निकालांचा अर्थ लावला आहे. विरोधकांनी तो समजून घेतला पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...