आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहन भागवतांचा अधर्म (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोहत्याबंदी हाच कसा धर्म आहे हे सांगत सत्तेतील आपल्या स्वयंसेवकांना त्यासाठी पुन्हा एकदा दक्ष केले आहे. ही बंदी अहिंसक प्रयत्नातूनच प्रत्यक्षात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. हेही एक चांगले लक्षण असले तरी त्यात विरोधाभासच अधिक आहे. अहिंसक मार्ग म्हणजे मन परिवर्तनाचा मार्ग. जर तोच मार्ग अवलंबायचा असेल तर त्यासाठी सत्तेची गरजच काय? सत्ता तर दंडेली आणि दडपशाहीसाठी हवी असते. 

मनपरिवर्तनाचा मार्ग भगवान महावीरांसारख्या विभुती सर्वसत्तापरित्याग करून पत्करतात हा इतिहास आहे. त्याच भगवान महावीरांच्या जयंतीचे निमित्त असल्याने भागवतांना गोहत्याबंदीचा संबंध अहिंसेशी जोडावा लागला असण्याची शक्यता आहे. पण त्या निमित्ताने का असेना भागवताना कथित गोरक्षकांच्या हिंसक आंदोलनावरही बोलावे लागले आणि असल्या हिंसक कारवायांना आपला पाठिंबा नाही हे सांगावे लागले, हे बरे झाले. त्यांच्या या बोलण्याचा काय परिणाम होतो हे लक्षात यायला आणि त्यातून त्याचा अर्थ स्पष्ट व्हायला थोडा काळ वाट पाहावी लागेल. 

सरसंघचालकांचे गोहत्येला अधर्म ठरवणे यात नवे काहीच नाही. संघाच्या विचारधारेचाच तो भाग आहे. प्रश्न आहे तो तथाकथित गोरक्षांकडून केल्या जाणाऱ्या हिंसक आंदोलनांचा. जे भागवत गायीच्या हत्येला अधर्म संबोधतात तेच भागवत गोरक्षकांच्या हिंसक कृत्याला मात्र अधर्म संबोधताना दिसत नाहीत. गोरक्षकांच्या आंदोलनामुळे गोरक्षणाचा उद्देश बदनाम होतो याची त्यांना चिंता आहे. ही चिंता आताच का वाटायला लागली, असाही प्रश्न भागवताना विचारायला हवा. 

ज्या ज्या वेळी हिंसक कृत्ये करण्याचा चेव कथित गोरक्षकांना येतो त्या वेळी सरसंघचालकांनी अशी विधाने केल्याचे कधी ऐकिवात नाही. उलट हिंदुत्वाची लाट आणायची असेल तर अशी ‘लहरी’ कृत्ये त्याला उत्तेजनाच देतील या हेतूने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम संघाने आणि भाजपच्या नेत्यांनीही सातत्याने केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्यासाठी प्रोत्साहन देण्यामागे संघाचा जो हेतू होता तोच गोहत्यारक्षकांकडे दुर्लक्ष करण्यामागेही होता आणि आजही आहे हे उघड आहे. ही बाब लक्षात घेऊनच मोहन भागवत यांच्या विधानांकडे पाहायला हवे. 

गायीचे शास्त्रीय महत्त्व आणि उपयोगिता लक्षात घेऊन तिच्या संगोपनाचे महत्त्व सांगणे वेगळे आणि तिला देवत्वाचे रूप देऊन भोळ्या भाबड्या जनतेच्या भावनांशी गोरक्षण जोडणे वेगळे. दुसरा प्रकार हा फसवणुकीपेक्षा कमी नाही. त्यातले ढोंग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उत्तमरीत्या अधोरेखित केले आहे. पण सावरकरांनाही सोयीपुरतेच वापरायचे हा संघाचा स्थायीभाव आहे. आज ज्या पद्धतीने संघाचे सत्तेतले लहान मोठे स्वयंसेवक महात्मा गांधींच्या नावाचा आणि प्रतिमांचा उपयोग करून घेत आहेत तसाच उपयोग गेली अनेक दशके सावरकरांचाही केला गेला आहे. 

संघाला या महान व्यक्तींच्या विचारांना लांब ठेवून त्यांच्या प्रतिमांचा तेवढा वापर करायचा आहे. म्हणूनच भगवान महावीरांच्या जयंतीदिनी कार्यक्रमात उपस्थित राहून सरसंघचालकांनी त्यांच्याही प्रतिमेचाच उपयोग करून घेतला आहे. ज्यांना या देशात हिंदू धर्म संस्थापना करायची आहे, हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून उदयास आणायचे आहे त्यांना अन्य कोणत्याही धर्माच्या प्रचारात आणि अनुकरणात काय रस असणार आहे? मग तो जैन धर्म असो वा अन्य कोणताही धर्म असो.  म्हणूनच तर भागवतांनी भगवान महावीरांच्या अहिंसा तत्त्वाच्या गप्पा मारत गोरक्षणाचा म्हणजे एका अर्थाने हिंदू धर्म पाळायचे आदेश आपल्या सत्ताधारी स्वयंसेवकांना दिले आहेत हा अर्थ समजून घेतला पाहिजे. 

देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि हळू हळू देशभरातील सर्व राज्यांमध्ये ते छत्र पसरते आहे असा विश्वास या पक्षाच्या नेत्यांना वाटतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर या पक्षाची जननी आहे. त्यामुळे या वाटचालीत खंड पडू नये असे सरसंघचालकांना वाटत असणे स्वाभाविक आहे. असा खंड पडू द्यायचा नसेल तर सोयीची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसतो. मोहन भागवत यांचे विधानही अशाच सोयीचे आहे. म्हणूनच त्यांनी गोहत्येला अधर्म संबोधताना गोरक्षकांच्या हिंसेसाठी तो शब्द वापरणे टाळले आहे. 

गोरक्षणासाठी कायदे करा हे सांगताना हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई करणारे कायदे करा हे सांगायला ते विसरले आहेत. गोरक्षकांच्या हिंसक कारवायांमुळे जीव गमावणाऱ्यांबद्दल चिंता व्यक्त करण्याऐवजी त्यांनी गोरक्षणाच्या उद्देशाच्या बदनामीची चिंता व्यक्त केली आहे. हे सारे सत्ता आहे म्हणून आलेले सावधपण आहे. सत्ता गेल्यानंतरही ते राहिले तरच त्याला शहाणपण म्हणायचे. अन्यथा हाही एक अधर्मच आहे. 
बातम्या आणखी आहेत...