आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेकुरे उदंड जाहली..(अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेकुरे उदंड जाहली।
तो ते लक्ष्मी निघून गेली।।
बापुडे भिकेला लागली।
काही खाया मिळेना।।

अशा शब्दांत तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी संतती नियमनाचा पुरस्कार केला आहे. तथापि, रूढी-परंपरांचे सतत गोडवे गाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अद्याप त्याचा मथितार्थ उमजला नसावा. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुले जन्माला घालण्याबद्दल नुकतेच केलेले वक्तव्य पाहता तसे दिसते. आग्रा येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘हिंदूंनी आपली लोकसंख्या वाढवू नये असे कुठला कायदा सांगतो?’ असा प्रश्न भागवत यांनी केला. एवढेच नव्हे तर ‘हिंदूंची लोकसंख्या वाढण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही. इतर धर्मांत एवढी मुले जन्माला घातली जात असतील तर हिंदूंना कुणी रोखले आहे?’ अशी पुस्ती जोडून त्यांनी एक प्रकारे अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहनच हिंदूंना केले. त्यावरून सामाजिक आणि राजकीय पटलावर वादाचे तरंग न उठते तर नवलच होते. अशा विधानाचे काय पडसाद उमटतील हे भागवत जाणून असणार. किंबहुना तसे ते उमटावेत असाही अंतस्थ हेतू असू शकतो. अर्थातच त्यामागचे कारण आहे ते उंबरठ्यावर येऊन ठेपलेली उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक. उत्तर प्रदेश हे देशातील राजकीयदृष्ट्या सर्वात कळीचे आणि संवेदनशील असे राज्य आहे. तेव्हा ते आपल्या अधिपत्याखाली येणे संघ परिवाराला आवश्यक वाटत असणार. तसे वाटण्यात काही गैर नाही. मात्र, ज्या पद्धतीने भागवत यांनी त्याचा पुकारा सुरू केला आहे ते पाहता ही नव्या राजकीय आणि सामाजिक कोलाहलाची नांदी ठरणार हे नक्की. शिवाय त्यातून विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाबाबत अशाच प्रकारे वादग्रस्त विधान करून भागवत यांनी भाजपला अडचणीत आणले होते. आताचे त्यांचे विधानदेखील उत्तर प्रदेश निवडणुकीची रणनीती आखत असलेल्या भाजप धुरिणांना बचावाच्या पवित्र्यात लोटणारेच ठरावे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन एकीकडे विरोधक गोरक्षा आणि तत्सम मुद्द्यांवरून मोदी सरकारला अडचणीत आणू पाहत असताना टाऊन हॉल कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी खोट्या गोरक्षकांवर कडक टीका करत विरोधकांना चोख उत्तर दिले होते. म्हणजे एकीकडे मोदी युवकांना आपलेसे करण्यावर अधिकाधिक भर देत आहेत. मेक इन इंडिया, भांडवल वृद्धी, रोजगार वाढ अशा युवकांना आकर्षित करणाऱ्या कार्यक्रम-उपक्रमांची आखणी करत आहेत. पण दुसरीकडे मोदी जरा काही चांगले करताहेत म्हटल्यावर नको ते वाद उकरून वा वावदूकपणा करून संघ परिवारातील काही मंडळी वातावरण कलुषित करण्याचे उद्योग करताना दिसतात. मोदी आधुनिकीकरणाची आणि तंत्रज्ञानाची जी भाषा करतात ती युवकांसह बहुतांशी मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीयांना रुचते. कारण मोदींच्या विकासाच्या आणि ‘अच्छे दिन’च्या वाद्याला लोकांनी मते दिली आहेत. मोदींच्या या विकास अजेंड्यावरच भाजप केंद्रात सत्तेत बसला आहे. मात्र संघ परिवारातील पुराणमतवाद्यांना त्याचे कोणतेही भान राहिलेले दिसत नाही. उलट मोदी सरकार केवळ आपल्यामुळेच सत्तारूढ झाल्याचा ग्रह या मंडळींनी करून घेतल्यानेच की काय आता ते आपला सामाजिक आणि सांस्कृतिक दुराग्रह सगळ्यांवर लादू पाहत आहेत. साहजिकच सर्वसामान्यांसमोर परस्परविरोधी चित्र रंगवले जात आहे. तेव्हा या टप्प्यावर तरी आधुनिकतेची कास धरायची की प्रतिगामी विचारांना चिकटून राहायचे हे संघ परिवार आणि भाजपने स्पष्टपणे ठरवायला हवे. हिंदूंनी जास्त मुले जन्माला घालण्याचे भागवतांचे विधान सुज्ञ जनांना पटणारे नाही. कारण प्राथमिक स्वरूपाचे जे प्रश्न आजही आपल्या इथे ‘आ’ वासून उभे आहेत त्यातील अनेकांचे मूळ वाढत्या लोकसंख्येतच आहे. आजच्या बदलत्या ‘लाइफस्टाइल’मध्ये एक मूल चांगल्या पद्धतीने वाढवायला, त्याचे योग्य ते पालनपोषण करायला येणारा खर्चदेखील पूर्वीच्या तुलनेत खूपच वाढला आहे. त्यातूनच ‘लेकुरे उदंड म्हणजे पालकाला दंड’ असा नवा वाक्प्रचार अलीकडे रूढ झाला आहे. येणारी पिढी आणि त्या माध्यमातून येथील एकूणच समाज सर्वार्थाने समृद्ध व्हायचा असेल तर त्यासाठी गुणात्मक वाढ गरजेची आहे. त्यामुळे सध्याच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीत किमान समर्थांचे बोल जरी भागवतांसारख्यांनी लक्षात ठेवले तरी ‘नको रे मना वाद हा खेदकारी’ अशा अवस्थेला मोदी सरकारला वारंवार सामोरे जावे लागणार नाही.
बातम्या आणखी आहेत...