आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाकडे चला (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पृथ्वीतलावर निसर्गचक्राला आव्हान देणारी व त्याच्यापासून फारकत घेणारी एकमेव प्राणिजात ही मानवाची आहे. पृथ्वीवर कोट्यवधी वर्षांपासून सुरू असलेल्या उत्क्रांती प्रक्रियेत मानवासह हजारो प्रजातींच्या झाडे, पाने, फुले, पशुपक्ष्यांनी कालानुरूप निसर्गाशी तादात्म्य ठेवले होते. ज्या काही सजीवांना निसर्गाशी एकरूप होता आले नाही ते नामशेष झाले. जे काही सजीव टिकले त्यांना एक तर निसर्गाशी जुळवून घ्यावे लागले वा त्याच्याशी एकरूप व्हावे लागले. पण माणसाचे तसे नाही. औद्योगिक क्रांतीनंतर मानवाच्या निसर्गावर अंकुश ठेवण्याच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. नैसर्गिक नियमांचा अभ्यास करत त्याने शेकडो वैज्ञानिक शोध लावले. या शोधामुळे मानवी जीवनशैली बदलत गेली. ही जीवनशैली कालौघात नैसर्गिक प्रेरणांवर एवढी प्रभाव टाकू लागली की त्याचे जगणे घुसमटल्यासारखे होऊ लागले. औद्योगिकीकरण, नागरीकरण व माहितीचा प्रस्फोट यांच्या जाळ्यात सध्याची मानवजात इतकी अडकली आहे की तिच्यातील नैसर्गिक प्रेरणा झपाट्याने बदलत चालल्याचे विविध पातळ्यांवरचे संशोधन पाश्चात्त्य देशांत मांडले जात आहे. या संशोधनात एक महत्त्वाची माहिती बाहेर आली. ती म्हणजे, निसर्गाशी नाळ तुटल्यामुळे माणसांमध्ये विविध प्रकारच्या मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एक शास्त्रज्ञ ग्रेगरी ब्रॅटमॅन यांनी मानवी वर्तन व निसर्ग यांच्यातील संबंध दुरावल्यामुळे मानसिक आजार कसे बळावत चालले आहेत, यावर एक संशोधन मांडले आहे. त्यांचे संशोधन प्रोसेडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये प्रसिद्ध झाले आहे. ग्रेगरी ब्रॅटमॅन यांना आपल्या संशोधनात असे आढळून आले की, मानवी वस्त्या जेवढ्या गजबजलेल्या, कोंडवाड्यासारख्या असतात तेवढे तेथील लोकांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक असते.

प्रचंड नागरीकरण व सिमेंटच्या जंगलात राहणारी माणसे विशिष्ट दबावाखाली विचार करत असतात. त्यांच्यामध्ये कल्पनाशक्तीचे वैविध्य आढळून येत नाही. ते खिन्न असतात. त्याउलट जे निसर्गाच्या सान्निध्यात राहतात किंवा गजबजलेल्या शहरांत राहत असूनही सकाळी, संध्याकाळी चालण्याच्या किंवा व्यायामाच्या निमित्ताने शहरातील मोकळी क्रीडांगणे, बागबगिच्यांना भेटी देतात त्यांच्या वर्तनात फारशी खिन्नता व विमनस्कता आढळत नाही. ब्रॅटमॅन यांनी चाचणी म्हणून काही जणांना स्वतंत्रपणे त्यांच्या शारीरिक क्षमतांनुसार बागांमधून फक्त चालण्यास सांगितले. कानात गाणी ऐकवणारे हेडफोन नाहीत की जवळचा मित्र नाही, प्रत्येकाने एकट्याने सहजपणे सफर करायची, असे त्यांना सांगण्यात आले. दुसरीकडे काही व्यक्तींना दुतर्फा रस्त्यांवरून चालण्यास सांगितले. दोन्ही प्रकारच्या चाचण्या घेतल्यानंतर ब्रॅटमॅन यांना प्रत्येक व्यक्तीच्या खिन्न मन:स्थितीची, त्यांच्या मूडची निरीक्षणे मेंदूच्या चाचणीतून मिळाली. ज्या व्यक्ती बागांमधून चालतात त्यांचा मूड प्रसन्न होता. उलट वर्दळ व गजबजलेल्या भागात चालणाऱ्या व्यक्तींची मानसिक आंदोलने तीव्र होती.

ब्रॅटमॅन यांचे हे संशोधन आजच्या धकाधकीच्या जीवनात, स्मार्ट सिटीच्या युगात सरकार व समाजाने समजून घेण्याची गरज आहे. सुपर हायवे, वायफाय, गगनचुंबी इमारती, मोठमोठाले मॉल्स ही आधुनिकीकरणाची प्रतीके असली तरी किंवा लोकांचे व्यवहार त्यामुळे वेगवान होत असले तरी या नवप्रतीकांमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे, असे कोणी धाडसाने सांगू शकणार नाही. मुळात राजकीय पक्ष, सरकार व प्रशासन समाजाचे मानसिक आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी काय कार्यक्रम हाती घेतात हा कळीचा मुद्दा आहे. "दिव्य मराठी'ने औरंगाबाद, नाशिकमध्ये नागरिकांना मोकळी पटांगणे, बागा मिळाव्यात म्हणून जनजागृतीचे प्रयत्न हाती घेतले. या प्रयत्नांना यश आले असले तरी हे प्रश्न संपलेले नाहीत. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनी संपत चालल्या आहेत. एकीकडे गगनचुंबी इमारती व बाजूलाच झोपडपट्टी अशी शहरांची रचना झालेली आहे. आरक्षित भूखंडांवर बिल्डर लॉबीची, राजकीय नेत्यांची सतत दृष्टी असल्याने नागरिकांना मोकळा श्वास मिळणे दिवसेंदिवस कठीणप्राय होत चालले आहे. मोकळी पटांगणे, बागा, तलाव मिळणे हा माफक आनंदही आपण निर्माण करू शकलेलो नाही. उलट यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची परिस्थिती आली आहे. भविष्यात नागरीकरणामुळे गुदमरलेली शहरे मोकळ्या श्वासासाठी बंड करून उठतील, अशा वेळी आपल्या हातात काय असेल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. निसर्गाला मरणाचे भय नाही. पण माणसाला ते आहे. त्यामुळे पर्यावरण व माणूस यांच्यातले दुरावलेले संबंध परत जोडण्याची गरज आहे. निसर्ग टिकला तर मानवजात टिकेल. आपल्या आसपासचा परिसर जर चांगला असेल तर जगण्याला उमेद मिळेल; अन्यथा विनाश अटळ आहे.
बातम्या आणखी आहेत...