आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About NCP Leader Sharad Pawar And Marathawada Three Days Tour

शेतकऱ्यांनो, जाब विचाराच! (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपल्या तीन दिवसांच्या मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्याची सुरुवात माेर्चाने केली आणि सांगताही जाहीर सभेने. १९८० मध्ये त्यांनी जळगाव ते नागपूर असा मोर्चा काढला होता आणि तो त्यांचा शेवटचा माेर्चा ठरला होता. अर्थात, त्या वेळी ते आजच्यासारखे ‘जाणते’ वगैरे नव्हते. गेली काही वर्षे त्यांना त्यांचे कार्यकर्ते ती उपाधी लावू लागले आहेत. हे जाणतेपण त्यांना गेली ३० वर्षे सत्तेत घालवल्यामुळे आले असावे, असे मानायला हरकत नाही. दौऱ्याची सुरुवात करताना त्यांनी जी काही विधाने केली ती मात्र या जाणतेपणाचे विस्मरण झाल्यासारखी आहेत. हे विस्मरण सत्तेपासून दूर असल्यामुळे त्यांना झाले असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी जाहीर आवाहन केले. ज्यांनी तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणली त्यांना जाब विचारा, असे त्यांनी शेतकऱ्यांना ठणकावून सांगितले. त्यांचा रोख राज्यातल्या देवेंद्र आणि केंद्रातल्या नरेंद्र सरकारकडे होता, हे वेगळे सांगायला नको. वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या सरकारांनी शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली, असा आरोप करीत ३५ वर्षांनंतर पुन्हा रस्त्यावर उतरावे लागावे, ही खरं तर या जाणत्या नेत्याच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका म्हणायला हवी. राज्यात आणि केंद्रातही भाजपप्रणीत सरकारांचा साडेचार वर्षांचा सत्ताकाळ सोडला तर गेल्या ३५ वर्षांतील सर्व काळ पवार आणि त्यांची आजी-माजी काँग्रेस हेच सत्तेत होते. विकास ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ती दोन-चार वर्षांत प्रभाव दाखवू शकत नाही, हे खरे आहे. पण तब्बल पाव शतकाहून अधिक काळ सत्तेत राहूनही शेतकऱ्यांना आत्महत्याच कराव्या लागत असतील तर शेतकऱ्यांवर ही वेळ कुणी आणली, याचे आत्मचिंतन पवारांनीच करायला हवे. त्या संदर्भात जाब शेतकऱ्यांनी त्यांनाच विचारायला हवा. अर्थात, ते बळदेखील शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्यात स्वातंत्र्योत्तर सत्ताधारी यशस्वी झालेले नाहीत. म्हणूनच हतबल समाजाच्या आत्महत्यांचे राजकारण करणे त्यांना आजही फावते आहे.

शरद पवार यांनी दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊनच मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यांचा दौरा केला असे सांगितले जाते आहे. वास्तविक, राज्यातले नऊ जिल्हे असे आहेत जिथे ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. किंबहुना, केवळ १० जिल्हे असे आहेत जिथे बरा म्हणावा असा पाऊस झाला आहे. इतरत्र परिस्थिती वाईटच आहे. असे असतानाही या जाणत्या राजाने हेच तीन जिल्हे निवडावेत, याला काही कारणे आहेत. पवारांसारख्या नेत्याने प्रश्न हाती घ्यायचा आणि रस्त्यावर उतरायचे तर त्यांच्यामागे काही शेतकरी दिसायला तर हवेत ना! ती शक्यता केवळ मराठवाड्यातल्या या पट्ट्यातच होती. राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत जे काही थोडेफार आमदार मिळाले त्यात मराठवाड्याचा हातभार मोठा आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वासाठी ज्या काही बोटावर मोजण्याइतक्या तरुण नेत्यांकडे पवार पाहत असतील, त्यात मराठवाड्यातील संख्याच अधिक भरत असावी, अशीही शक्यता आहे. सध्या विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ज्या पद्धतीने सभागृह गाजवताहेत ते पाहता मुंडेंना सांभाळणे पवारांसाठी महत्त्वाचे झाले आहे. तरीही मुंडेंच्या बीड जिल्ह्यात त्यांनी दौरा केला नाही. कारण विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला एकतर्फी नाकारले आहे. पुन्हा नाचक्की नको, ही काळजी घेतली गेली असावी. जाहीर सभेत राज्यात जेलभरो आंदोलन करण्याची हाकाटी देणाऱ्या पवारांनी नंतर ते आंदोलन मराठवाड्यातल्या तीनच जिल्ह्यांपुरते मर्यादित असल्याची दुरुस्ती पत्रकार परिषदेत केली त्यामागेही हेच ‘जाणतेपण’ असावे. मोर्चाच्या वेळी शरद पवारांनी केलेल्या विधानांवर मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली. ती देताना पवारांना त्यांनी थेट ढोंगी ठरवले. पवार कसे आहेत हे सारा महाराष्ट्रच काय, देश जाणतो. त्यामुळे ते कसे आहेत हे समजून घेण्यासाठी फडणवीसांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. पण या निमित्ताने त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे जाणतेपणही शरद पवारांनी दाखवायला हवे. मोर्चा काढला म्हणून मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादचा उल्लेख केला असला तरी ते राज्याच्या बाबतीत लागू पडणारे प्रश्न आहेत. राज्यातल्या जिल्हा बँका, राज्य सहकारी बँक, दूध संघ, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या यांची आजची अवस्था कोणी केली? रसातळाला गेलेल्या या संस्था एकेकाळी शेतकऱ्याचा खरा आधार होता. तो आधारच मोडण्याचे पाप ज्यांनी केले ते सारेच शरद पवार यांचे कार्यकर्ते असावेत हा निव्वळ योगायोग आहे का, याचे उत्तरही शरद पवार यांनी द्यायला हवे. अन्यथा राजकारणात नवख्या आणि सत्ताधारी असलेल्या पंकजा मुंडे यांचा दुष्काळ पाहणी दौरा आणि जाणत्या राजाचा तसाच दौरा यात शेतकरी फरक करणार नाहीत.