आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About NCP President Sharad Pawar, Maharashtra, Politics

पवारांचा फॉर्म्युला (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचा नुकताच झालेला 15वा वर्धापन दिन हे या पक्षाच्या यशाचे ठळक पर्व म्हटले पाहिजे. पण भविष्यात पक्षाला मिळालेले हे यश कितपत टिकेल, याविषयी सर्वच जण साशंक आहेत. यशाचे पर्व यासाठी म्हणायचे की, स्थापना झालेला कोणताही राजकीय पक्ष सत्तेचा लगेचच लाभार्थी होऊन दीर्घकाळ राज्यावर राहतो, अशी फारशी उदाहरणे भारताच्या राजकारणात आढळत नाहीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन झाल्यापासून सुमारे साडेचौदा वर्षे राज्यात व दहा वर्षे केंद्रात सत्तेत आहे. 1999मध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा हाती घेऊन स्वत:चा वेगळा राजकीय सुभा स्थापन केला होता. त्या वेळी केंद्रात एनडीएचे सरकार होते व त्या वेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पवारांची राजकारणातील ज्येष्ठता व त्यांचा अनुभव ओळखून त्यांच्याकडे ‘राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापना’चे अध्यक्षपद दिले होते. या अध्यक्षपदाचा दर्जा कॅबिनेट मंत्रिपदाचा होता. पण पवारांचे मन भाजपच्या विचारसरणीशी कधी जुळले नाही. पुढे काही दिवसांनी त्यांनी काँग्रेसश्रेष्ठींशी असलेला वाद बाजूला ठेवत महाराष्ट्रात काँग्रेसशी युती केली व यूपीए सरकारच्या दोन्ही कालावधीत त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद भूषवले. आता मात्र केंद्रात भाजपच्या हातात एकहाती सत्ता आल्याने देशातील व राज्यातील राजकारणाचे समीकरण बदलून गेले आहे आणि देशात ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्षांची धूळधाण उडाली आहे, ती पाहता राष्ट्रवादीचा यापुढचा प्रवास यशाचा नव्हे तर खाचखळग्यांचा नक्कीच असू शकतो, याचे भान पवारांना आले आहे. पवार हे भविष्यवेत्ते नसले तरी त्यांचे राजकीय आडाखे सहसा चुकलेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांना, नेत्यांना वेळोवेळी सुनवायची वेळ येते, तेव्हा ते स्वस्थ बसत नाहीत. अजित पवारांच्या तथाकथित बंडाची हवा त्यांनी वेळीच जोखली होती आणि ती चतुराईने संपवली होती. आता पंधराव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने, ‘सोळावं वरीस धोक्याचं असतं, त्यामुळे सांभाळून वागा,’ असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेले सूचक विधान हे त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे केवळ गुणविशेष नाही तर तो एकापरीने पक्षाच्या अस्तित्वाबद्दल दिलेला धोक्याचा इशारा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आजपर्यंत पवारांच्याच एकहाती नेतृत्वावर चाललेला हा पक्ष नरेंद्र मोदी यांच्या झंझावातापुढे निष्प्रभ ठरेल, याचा अंदाज कदाचित पवारांना आला नसेल. त्यांनी कार्यकर्त्यांपुढे बोलताना देशात जसा सत्ताबदल झाला तसा राज्यात होण्याची शक्यता नाही, असे म्हटले असले तरी पुण्यात सोशल मीडियाच्या वादातून निष्पाप मुस्लिम तरुणाची झालेली हत्या व मोदींचे पंतप्रधान होणे असा संबंध लावून महाराष्ट्रातही ध्रुवीकरण होऊ शकते, अशी भीती त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. त्यामुळेच या संभाव्य ध्रुवीकरणाचा व मोदी लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेसशी असलेली मैत्री तोडून स्वत:च्या बळावर विधानसभा निवडणुका लढवाव्यात, हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतप्रवाह त्यांनी फारसा मनावर घेतलेला नाही. कारण लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी केवळ काँग्रेसला नव्हे तर राष्ट्रवादीलाही झिडकारले आहे, हे वास्तव त्यांनी मान्य केले आहे. केंद्रातील काँग्रेसच्या कारभारावर जसा महाराष्ट्रातील मतदारांचा राग होता, तसा राग त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातही आहे. कारण राज्यातले सर्वाधिक गैरव्यवहार व आर्थिक घोटाळ्यांचे धागेदोरे राष्ट्रवादीच्या नेत्यांपाशी येतात. त्यातच अजित पवार यांच्या उद्दाम वर्तनाने याअगोदर मतदारांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे. ही नाराजी नाहीशी करणे हे पक्षापुढील आव्हान आहे. मराठा-मुस्लिम आरक्षण, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, भारनियमन मुक्ती, एलबीटी या मुद्द्यांवर राष्ट्रवादी अधिक आग्रही भूमिका मांडत असला तरी त्याचा राजकीय फायदा आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मिळेल, असा आत्मविश्वास एकाही नेत्याला वाटत नाही. कारण हे विषय लोकांनाही तेवढे जिव्हाळ्याचे वाटत नाहीत. त्यातच अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, भुजबळ असे दुसर्‍या फळीतले नेते संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे वाटत नाहीत. या नेत्यांकडे असे नेतृत्वगुणही नाहीत की जे पक्षाला एकसंघ ठेवू शकतात. प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा पक्षाच्या विस्तारात आडवी येते. त्यामुळे पवारांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या पक्षाचा पूर्ण लेखाजोखा मांडला नाही; पण राज्यातील विधानसभा निवडणूक सामूहिक नेतृत्वाच्या बळावर लढवली जाईल, असे स्पष्ट करून संभाव्य पराभवाचे श्रेय सर्वांच्या माथी जाईल, अशी सोय करून ठेवली आहे. जेव्हा पक्षाचा तळागाळाशी संपर्क तुटतो, पक्षाला काळाचे भान लक्षात येत नाही, अशा परिस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्याच्या हातात सर्व सूत्रे द्यायची, हा फॉर्म्युला भाजपपासून काँग्रेस-आप-मनसे असा झिरपत आला होता. हा फॉर्म्युला पवारांनी वापरला असता तर ते पवार कसले?