आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About New Project And Land Perform, Divya Marathi

शिवनीची शिकवण...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणताही नवा प्रकल्प किंवा योजना राबवायची म्हटली की आजकाल सर्वात अगोदर प्रश्न निर्माण होतो तो जमीन संपादण्याचा. त्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे यापूर्वी ज्या जमिनी संपादित केल्या गेल्या तेथील विस्थापितांचे धडपणे न झालेले पुनर्वसन वा संबंधितांना त्या जमिनीचा बाजारभावाच्या तुलनेत मिळालेला अत्यल्प मोबदला. दुसरे कारण म्हणजे महानगरांपासून अगदी खेड्यापाड्यापर्यंतच्या जमिनींना कालौघात प्राप्त झालेला सोन्याचा भाव. मात्र नाशिकलगत असलेल्या शिवनीच्या गावकर्‍यांनी या मानसिकतेला छेद देत परिसरातील तब्बल दीडशे एकर जमीन प्रोव्हायडिंग अर्बन अ‍ॅमिनिटीज इन रुरल एरिया (प्युरा) नामक प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. देशभरातील खेड्यांचा स्वयंपूर्ण विकास व्हावा या विचाराने प्युरा ही संकल्पना मांडण्यात आली. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची ही कल्पना. आपल्या ‘टार्गेट थ्री बिलियन पीपल’ या पुस्तकात त्यांनी त्याचा उल्लेख केला असून केंद्र शासनाच्या पातळीवरून ती उचलून धरण्यात आली आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी ती राबवायची आहे तिथे मंजुरीनंतर प्रथम शासनातर्फे रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मग स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने व्यापार-उदिमाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीद्वारे गाव स्वयंपूर्ण व्हावे अशी अपेक्षा आहे. योजना चांगली असली तरी ती प्रत्यक्षात येण्यासाठी सकारात्मकता आणि कार्यप्रवणतेची नितांत गरज आहे. कारण उदात्त हेतूने आखलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणीअभावी कशी वाट लागते अथवा वासलात लावली जाते त्याची असंख्य उदाहरणे आजूबाजूला पाहावयास मिळतात. त्या पार्श्वभूमीवर शिवनीच्या ग्रामसभेने दीडशे एकर जमीन प्रकल्पासाठी देण्याचा केलेला ठराव नक्कीच आशादायी आहे. इतर औपचारिकतांची पूर्तता केल्यानंतर आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने प्युराअंतर्गत प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. औषध कंपन्यांची हमी मिळवून या जागेवर आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळवून देणे व मिळणार्‍या उत्पन्नातून गावचा विकास साधणे हे उद्दिष्ट आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी अद्याप बराच अवकाश असला तरी तूर्त त्यासाठी संबंधितांना शुभेच्छा द्यायला हव्यात.