आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमारांचे घोडे (संपादकीय)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपला रोखण्यासाठी बिगर-भाजप पक्षांची आघाडी उभी करण्याचे आवाहन नितीशकुमार यांनी केले आहे. संघमुक्त भारत, असे ध्येयही त्यांनी या आघाडीसमोर ठेवले. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर काही दिवसांतच नितीशकुमार यांनी हे आवाहन केले. पुढील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी नितीशकुमार यांनी सुरू केली आहे. नितीशकुमार हे अतिशय धूर्त राजकारणी आहेत. काळाबरोबर कोणती झूल अंगावर पांघरायची याची जाण त्यांना असते. लोहिया गटातून ते अलगद भाजपकडे गेले. तेथे मंत्रिपद मिळविले व पुढे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदही भूषविले. लालूप्रसाद यादव यांना रोखण्याची ताकद त्या वेळी नितीशकुमार यांच्याकडे नव्हती. ती त्यांनी भाजपकडून मिळविली. त्यानंतरही एनडीएकडून त्यांना नेतृत्व बहाल केले गेले असते तर नितीशकुमार भाजपच्याच तंबूत राहिले असते. तथापि, त्या वेळी संघाने सूत्रे हाती घेतली व मोदींनी व्यवस्थित डाव टाकले. नितीशना अर्थातच ते पसंत पडले नाहीत. संघाबरोबर त्यांचे जुळणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांना अचानक भाजप व संघाच्या धर्मद्वेषाचा साक्षात्कार झाला व त्यांनी एनडीएबरोबर संबंध तोडले. मात्र, राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचे धाडस त्यांनी दाखविले नाही. कारण मोदींची लाट त्यांच्या लक्षात आली होती व हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची त्यांची तयारी नव्हती. लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात आत्यंतिक जहरी टीका नितीशकुमार यांनी केली होती, पण त्याच लालूंबरोबर सोयरिक जमविण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. माध्यमांशी त्यांचे संबंध उत्तम असल्यामुळे अनेक ठिकाणी पाट लावले तरी त्यांच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल कुणी शंका घेत नाही. गेल्या दोन वर्षांत मोदींचा राजकीय कारभारही असा झाला की नितीशकुमार यांना आपोआप स्थान मिळत गेले. मोदी-शहा यांच्या वाह्यात आत्मविश्वासाने बिहारमध्ये भाजपची धूळधाण उडाली. त्याचाही फायदा नितीशकुमार यांना झाला.
याला आणखीही एक पैलू आहे. गेल्या सहा महिन्यांत बिहारमध्ये नितीशकुमार यांनी चमकदार कामगिरी केलेली नाही. उलट लालूप्रसाद यादव यांची मुजोरी पुन्हा सुरू झाली आहे आणि तेथे यादवांचे राज्य सुरू झाल्याचे संकेत अनेक घटनांतून िमळत आहेत. भाजपबरोबर असताना नितीशकुमार यांनी चांगला कारभार केला होता व त्यामुळेच बिहारी जनतेने बिहारसाठी नितीश व देशासाठी मोदी असा क्रम ठेवून मतदान केले होते. मात्र, आता बिहारमध्ये नितीश यांना पूर्वीचा कित्ता गिरविता येण्याचा संभव कमी दिसतो. हे अपयश झाकण्याची तयारी त्यांनी आत्तापासून सुरू केली आहे. उद्या खरोखरच ते राष्ट्रीय नेते म्हणून पुढे आले तर बिहारमध्येही त्यांचे वजन वाढेल व लालूंना ताब्यात ठेवता येईल. बिहार निवडणूक होताच लालूंनीही त्यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीर केली होती. त्याबद्दल ते अधिक काही हालचाली करण्यापूर्वीच नितीशकुमार यांनी स्वत:चे घोडे दामटले आहे. घोडे दामटण्यासाठी ही वेळही योग्य आहे. मोदी यांनी चार वर्षे आधीपासून पंतप्रधानपदाची तयारी सुरू केली होती. (ती फक्त निवडणूक जिंकण्यापुरती राहिली, कारभाराची तयारी केली नव्हती हे आता लक्षात येत आहे.) राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उभी करण्यासाठी दोन-अडीच वर्षांचा कालावधी लागतोच. पुढील वर्षी पाच महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये भाजपचा रथ खाली येणार हे नक्की. आजपासून प्रचाराला सुरुवात केली तर भाजपच्या पीछेहाटीचे श्रेय नितीशकुमार यांना मिळू शकेल. त्यामुळे पंतप्रधानपदासाठीच्या त्यांच्या उमेदवारीला बळ मिळेल. मोदींची लोकप्रियता आज झपाट्याने कमी होत असली तरी विरोधी पक्षांतून जोमदार नेता उभा राहिलेला नाही. ती पोकळी नितीशकुमार यांच्यासाठी सोयिस्कर आहे. मात्र, दोन आव्हाने त्यांंना पेलावी लागतील. बिगरभाजप आघाडी दिसण्यास सोपी दिसली तरी वस्तुत: तशी नाही. नेत्यांचे रागलोभ बरेच आहेत आणि हितसंबंधही आड येणारे आहे. ही मोट बांधण्याची कुशलता नितीशकुमार यांच्याकडे आहे असे वाटत नाही. ते बोलण्यात हुशार असले तरी मोदींइतकेच आत्मकेंद्री आहेत. सोनिया गांधी, नरेंद्र मोदी वा नितीशकुमार यांतील कोणाचाही स्वभाव आघाडीच्या राजकारणासाठी योग्य नाही. आघाडी चालविण्याची कुशलता असणारी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे वाजपेयी. केवळ प्रसार माध्यमांच्या भरवशांवर आघाडी उभी करता येत नाही. दुसरी बाब म्हणजे त्यांनी संघाला उघड विरोध केला आहे. संघावर टीका करणे सोपे असते. पण संघाचे नेटवर्क अनेकांना घाम फोडते. आजपर्यंत तीन वेळा बिगरकाँग्रेसी सरकार सत्तेवर आले. त्या तिन्ही वेळा संघाचा सहभाग महत्त्वाचा होता. पुढील निवडणूक संघविरोधात अन्य अशी झाली तर संघही इरेला पेटून काम करू शकतो व त्याचा सामना करण्याची ताकद नितीशकुमार यांच्याकडे आहे का याची शंका आहे. यात फरपट होणार ती राहुल गांधी यांची. पण त्याला इलाज नाही.