आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About On Dr. Meharu Bengali, Divya Marathi

चिंतनशील शिक्षणतज्ज्ञ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्या शिक्षणक्षेत्राचे प्रबुद्ध नेतृत्व करण्याचे कार्य मुंबई विद्यापीठाने गेली अनेक दशके पार पाडले आहे. काही डागाळलेल्या कुलगुरूंचा अपवाद सोडला तर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे महाराष्ट्र व देशाच्या समाजजीवनातील आदरणीय व्यक्ती म्हणून पाहिले जाते. 1857 मध्ये स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक लौकिक कायम उंचावत नेणार्‍या कुलगुरूंमध्ये डॉ. मेहरू बेंगाली यांचे नाव अग्रस्थानी होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्या 84 वर्षे वयाच्या होत्या. डॉ. मेहरू बेंगाली या मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू होत्या. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात मुंबईतील सेंट झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेत शिक्षिका म्हणून केली. तेथे 1984 पर्यंत त्या कार्यरत होत्या. त्यानंतर 1984 ते 1986 या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलो. पारशी समाजातील असलेल्या डॉ. मेहरू बेंगाली यांनी शिक्षणतज्ज्ञ या नात्याने देशातील शैक्षणिक घडामोडींचे वेळोवेळी निर्भीडपणे विश्लेषण केलेले होते. त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादित केली होती. शिक्षणशास्त्र या विषयात एम. ए. व मानसशास्त्र या विषयात पीएच.डी. केलेली होती. विद्वत्ता व पारदर्शी कारभार या दोन गुणांच्या बळावर डॉ. मेहरू बेंगाली यांची 1986 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली. या पदावर त्या 1992पर्यंत कार्यरत होत्या. शिक्षण हे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी नेमक्या काय उपाय योजले पाहिजेत याचे सखोल चिंतन त्यांच्या लेखन व भाषणांतून पाहायला मिळत असे. बेंगाली यांनी लिहिलेले ‘गाइडन्स इन कौन्सिलिंग’ हे तसेच त्यांची अन्य पुस्तके विद्यार्थी व वाचकांसाठी कायम पथदर्शक ठरत आलेली आहेत. शिक्षणक्षेत्राबरोबरच समाजकार्यातही डॉ. बेंगाली यांना तितकाच रस होता. मुंबई पारसी पंचायतच्या त्या माजी विश्वस्त होत्या. अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. डॉ. मेहरू बेंगाली यांच्या निधनाने आपण एका चिंतनशील शिक्षणतज्ज्ञाला कायमचे मुकलो आहोत.