आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राज’कीय मुश्कील…

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बऱ्याच भवती भवतीनंतर अखेर करण जोहर यांच्या बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’चित्रपटाची मुश्कील दूर झाली असली तरी ज्या पद्धतीने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा तोडगा काढण्यात आला त्यावरून कुरघोडीचे राजकारण तापू लागले आहे. राजकारण, क्रिकेट आणि बॉलीवूड हे विषय तमाम भारतीयांच्या जिव्हाळ्याचे असल्याने अन्य कोणत्या बाबतीत स्वत:ची मते असोत वा नसोत, याबाबतीत मात्र प्रत्येकच जण आपापली मते हिरिरीने मांडत असल्याने चित्रपटावर बंदीची मनसेची मागणी देशपातळीवर चर्चेची बनली. प्रसार माध्यमांद्वारेसुद्धा त्याला सुरुवातीपासून हवा दिली गेली आणि आता तडजोडीवरूनदेखील त्याचा कुणाला कसा लाभ होईल याचे चित्र रंगवण्याची जणू अहमहमिकाच लागली आहे. वास्तवातली स्थिती मात्र बरीच भिन्न असल्याने या मुद्द्याचा मनसेला फार काही लाभ होईल अथवा अन्य कुणाला त्याचा फटका बसेल असे नाही.

पाकिस्तानी कलाकार फवाद खान याचा समावेश असलेला करण जोहर याचा ‘ऐ दिल..’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने त्याला कडाडून विरोध करत चित्रपट प्रदर्शित होऊ देण्याची भूमिका घेतली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास मल्टिप्लेक्समध्ये पुन्हा एकदा ‘खळ्ळ खट्याक’चा खेळ सुरू होईल, असे या पक्षाच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केली. पाठोपाठ मनसेच्या चित्रपट कामगार सेनेनेदेखील या चित्रपटाचे खेळ दाखवले गेल्यास संबंधित थिएटरमध्ये संप करण्याचा इशारा दिला. उरीच्या घटनेनंतर पाकिस्तानचे कुठलेही कलाकार अथवा खेळाडू यांना भारतात थारा देऊ नये या भूमिकेचा पुनरुच्चार करत पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी माध्यमांद्वारे चर्चेचा कल्लोळ उडवून दिला. वाद आणखी चिघळू नये या हेतूने मग मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत राज आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये बैठक घडवून आणली. त्यामध्ये चित्रपटाच्या सुरुवातीला शहिदांना आदरांजलीपर संदेश प्रसृत करणे, आर्मी वेल्फेअर फंडासाठी पाच कोटींचा निधी देणे तसेच भविष्यात पाक कलाकारांना काम देण्यावर पूर्ण बंदी घालणे या मुद्द्यांवर तडजोड घडून आली. परिणामी आता चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी ज्या पद्धतीने ही तडजोड झाली त्यावरून राजकीय धुरळा उठला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका संघटनेच्या दादागिरीपुढे झुकून मांडवली केल्याचा आक्षेप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला आहे. विरोधी पक्ष म्हणून या पक्षांनी अशी भूमिका घेणे समजण्यासारखे असले तरी वास्तवात मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार चुकीचा असल्याचे म्हणता येणार नाही. कारण अगोदरच विविध कारणांमुळे महाराष्ट्रात सामाजिक अस्वस्थता वाढीस लागली आहे. त्यात या नव्या वादामुळे ऐन सणासुदीच्या काळात आणखीन भरच पडली असती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच केलेला हस्तक्षेप उलट सामंजस्याची वाट प्रशस्त करणारा ठरला असे म्हणावे लागेल. या तडजोडीनंतर चर्चेत असणारा दुसरा मुद्दा आहे तो मनसे आणि भाजपची दिसून आलेली जवळीक. मुंबईसह आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज यांचे महत्त्व मुख्यमंत्र्यांनी या माध्यमातून जाणीवपूर्वक वाढवले आणि शिवसेनेलाही त्यातून एक प्रकारचा इशारा दिला, असा अन्वयार्थ त्यातून कुणी काढत आहेत, तर काही जणांना भाजप मनसे नजीकच्या भविष्यात एकत्र येण्याची ही चाहूल वाटते आहे. पण जरा खोलवर विचार केल्यास या चर्चांमधला फोलपणा लक्षात येतो. मुंबई वा आणखी एक-दोन महापालिकांसाठी भाजप थेट मनसेचा हात धरण्याची शक्यता नाही. कारण तसे केल्यास शिवसेना दुखावली जाऊन राज्यातील सरकारसमोरचे पेच जसे आणखीन वाढतील तसेच मुंबईतील जो अमराठी मतदार सध्या भाजपच्या सर्वाधिक जवळ आहे तो अकारण दुरावला जाईल. एवढेच नव्हे तर तोंडावर असलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विरोधकांना तो आयताच प्रचाराचा मुद्दा मिळेल. मनसेची यूपी-बिहारींबाबतची भूमिका सर्वश्रुत असल्याने आणि उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजपच्या राष्ट्रीय राजकारणासाठी अत्यंत कळीची असल्याने तूर्त तरी भाजप मनसेला जवळ करण्याची शक्यता नाही. मुळात आज राज्यात मनसे अस्तित्वासाठी धडपडत आहे. त्यामुळे मनसेची प्रत्यक्षातली ताकद किती, हाच प्रश्न आहे. हे पाहता शिवसेनेलाही या प्रकरणाचा तोटाबिटा होण्याचा संभव नाही. किंबहुना हे हेरूनच शिवसेनेने संयमी भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण तापले असले तरी त्याचा प्रत्यक्ष निवडणुकीत फार काही प्रभाव राहील असे नाही. या सगळ्यात पाकिस्तानी कलाकारांचा पुळका असणाऱ्या बॉलीवूडमधील विशिष्ट लॉबीला चांगलाच झटका बसला असून त्याचे श्रेय मात्र राज यांना द्यावे लागेल. अर्थात, तेवढ्यावरून सद्य:स्थितीतली मनसेची ‘राज’कीय मुश्कील दूर होईल असेही नाही.
बातम्या आणखी आहेत...