आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी जागे झाले (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच टाऊन हॉल कार्यक्रमात जनतेशी संवाद साधतानागोरक्षकांची चांगली हजेरी घेतली. गुजरातमधील उना येथे गोरक्षकांनी दलितांना अमानुष मारहाण केली. त्याला राजकीय रंग चढला. नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर दलितांना भाजपच्या बाजूने वळविण्याचा, सत्तेत सहभागी करण्याचा, जाणीवपूर्वक प्रयत्न चालविला आहे. दलित, आदिवासी मते भाजपकडे वळली तर सरकार अधिक काळ सत्तेत राहील. या शक्यतेमुळे काँग्रेस, अन्य पक्ष डावी आघाडी धास्तावली. मोदींना ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद होता. लोकसभेतील ही जमा आणि अधिक मते जोडण्यासाठी सत्ता आल्यानंतर चालविलेले प्रयत्न याविरोधात आघाडी उघडणे विरोधी पक्षांना आवश्यक होते. सर्वसमावेशक ही काँग्रेसची प्रतिमा भाजपकडे जाणे विरोधकांना परवडण्याजोगे नव्हते. भाजप सर्वसमावेशक नाही हे दाखविण्यासाठी प्रथम ‘सूट-बूट की सरकार’ असा प्रचार करीत शेतकऱ्यांच्या मनात चलबिचल करण्यात आली. राहुल गांधी यांची ही व्यूहरचना यशस्वी ठरली. त्यानंतर रोहित वेमुला, जेएनयू प्रकरणे आली. त्यात उनासारख्या निर्दयी, कोणाही भारतीयाला शरम वाटावी अशा घटनेची भर पडली. दादरी, उना येथील घटना त्याबद्दल मोदींनी स्वीकारलेले मौन याचा परिणाम जनमानसावर होऊ लागला. भाषा विकासाची असली तरी मोदी हे मुळात सांप्रदायिक शक्तींना प्रोत्साहन देत आहेत प्रतिगामी चौकट इथे प्रस्थापित करीत आहेत, अशी शंका मोदी समर्थकांनाही येऊ लागली. सोनिया गांधी यांच्या रॅलीला उत्तर प्रदेशात मिळालेल्या प्रतिसादामुळेही मोदी अस्वस्थ झाले असतील. उनामधील घटनेबद्दल भाजप खासदारांनीही उद्वेग व्यक्त केला होता. मोदींच्या मूळ राजकीय मतपेढीला गळती लागण्याचा धोका निर्माण झाला. याचे आर्थिक परिणामही झाले. देशात सामाजिक सद््भाव नाही, शांततेचे वातावरण नाही, मोदी सरकार हे सतत संघर्ष करीत राहणारे प्रतिगामी सरकार आहे, अशी प्रतिमा ठळक होत गेल्याने गुंतवणूकदार साशंक झाले. प्रतिगामी हिंदुत्ववादी शक्तींची संगत ही सर्व बाजूंनी मारक ठरत आहे हे लक्षात आल्यावर मोदी जागे झाले.

शनिवारच्या टाऊन हॉल कार्यक्रमातील त्यांचा संवाद हा वेगळ्या प्रकारचा होता. भारताला समृद्ध करण्यासाठी कोणत्या साध्यासुध्या मार्गांनी प्रयत्न करता येईल यावर त्यांचा ऊहापोह चालला होता. गव्हर्नन्सशी संबंधित असे विषय होते. ते विषय अतिशय महत्त्वाचे असले तरी भारतीय मीडियाला अशा विषयांवर चर्चा करण्याची सवय नाही. दलितांवरील अत्याचारांसारख्या विषयांवर मोदी गप्प का, असा गदारोळ सुरू होणार याची कल्पना मोदींना होती. या सर्वांना मोदींनी प्रत्युत्तर दिले. मात्र त्यामुळे खरोखरच परिस्थिती बदलली तर या बोलण्याचा फायदा होईल. गोरखधंदा करणाऱ्या गोरक्षकांची चौकशी करा, असा फक्त आदेश देऊन भागणारे नाही. या आदेशाचा पाठपुरावा करण्याची सक्ती निदान भाजप मुख्यमंत्र्यांवर केली पाहिजे. संघ परिवाराची त्यामध्ये आडकाठी येणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागेल. मोदी सरकार हे परिवारातील प्रतिगामी गटांशी बांधलेले आहे ही प्रतिमा पुसून टाकणे सोपे नाही. कारण अत्याचाराच्या लहानसहान घटना घडत राहणार. असे अत्याचार हे भारताचे सामाजिक वास्तव आहे समाजमन शहाणे झाल्याशिवाय ते थांबणारे नाही. अमेरिकेसारख्या देशातही अद्याप कृष्णवर्णीयांना समान वागणूक मिळविण्यात असंख्य अडचणी येतात. आर्थिक समृद्धी, विज्ञानातील प्रगती यामुळे सामाजिक मनोगंड बदलत नाही, असे जगभरात दिसून येते. मात्र सामाजिक वास्तवातून घडणाऱ्या लहानसहान घटनेमागेही प्रेरक शक्ती मोदींचे सरकार हीच आहे असा प्रचार करण्यात मोदींचे विरोधक यशस्वी ठरतात. ही मोदींसमोरची समस्या आहे. भाजपमधील नेत्यांची मुक्ताफळे त्यामध्ये भर घालतात. संघ परिवारापासून नव्हे पण परिवाराचा आशीर्वाद असलेल्या प्रतिगामी गटांपासून सरकारला दूर राेखणे हे आव्हान मोदींसमोर आहे. मोदींसमोर जो आर्थिक अजेंडा आहे त्याच्याशी या सांप्रदायिक गटांना काहीही देणेघेणे नाही. पुराणातील कल्पनांत ते अडकलेले आहेत त्यातून त्यांना आर्थिक फायदाही होतो आहे. त्यांचे उपद्व्याप सुरूच राहणार. ते आपल्याला चिकटणार नाहीत ही दक्षता मोदींना घ्यावी लागेल. हिंदुत्वाबद्दल आस्था असणारा मात्र आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार करणारा वर्ग ही मोदींची मुख्य मतपेढी आहे. टाऊन हॉलमध्ये मोदींनी जेव्हा गोरक्षकांना फटकारले तेव्हा टाळ्यांचा गजर झाला. आजच्या भारताला काय हवे आहे हे यावरून कळून यावे. या आधुनिक भारताचा जोम वाढवायचा असेल तर वाह्यात गोरक्षकांना ( प्रामाणिक नव्हे) गोठ्यात बांधणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. जीएसटीपाठोपाठ मोदींचे हे दुसरे पाऊल स्वागतार्ह आहे. मोदी जागे झाले आहेत. ही जाग किती टिकते ते पाहायचे.
बातम्या आणखी आहेत...