आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहियावादाची ऐशीतैशी (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
६० च्या दशकात भारतीय राजकारणात काँग्रेसला पर्याय हवा याच उद्देशाने राममनोहर लोहिया राजकारणात शड्डू ठोकून उभे राहिले. गांधीवादाबरोबर येणारी राजकारणातील साधनशुचिता समाजवाद यांचे मिश्रण लोहियांना भारतीय राजकारणात अपेक्षित होते. स्वत: लोहिया राजकारणात अत्यंत साधेपणाने काम करत राहिले. आपल्या राजकीय वाटचालीला संपत्तीचा स्पर्श होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली. घराणेशाही सत्तेचे केंद्रीकरण याबाबत त्यांची रोखठोक मते त्या काळच्या समाजाला मोठ्या प्रमाणात आकर्षून घेणारी होती. पण असे असूनही या लोहियावादाची उत्तरोत्तर शकले उडत गेली. ती का गेली हा वेगळा विषय आहे.

आता लोहियावादाचा उरलासुरला वारस असलेला उत्तर प्रदेशातील मुलायमसिंह यांचा समाजवादी पक्ष घराणेशाहीच्या विळख्यात आपले घर टिकवायचे की पक्ष? अशा पेचात सापडला आहे. घर टिकवले तर घरातली सुंदोपसुंदी कमी होईल याची खात्री नाही आणि पक्ष टिकवायचा तर भाजप-बसपचे आव्हान पेलेल इतकी ताकदही या पक्षात उरलेली नाही. गंमत अशी की पाच वर्षांपूर्वी अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाला मिळवून दिलेले यश हे लोहियावादाचे पुनरुज्जीवन मानले जात होते. अखिलेश यांचे सार्वजनिक जीवनात कॉम्प्युटर, इंग्रजीला महत्त्व मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचे ‘मॉडर्न आऊटलूक’ राजकारण हा वडील मुलायमसिंह यांच्या प्रतिगामी, बुरसटलेल्या राजकारणाला छेद होता. त्यात मायावती, भाजपला नेस्तनाबूत केल्याने उत्तर प्रदेश ‘उत्तम प्रदेश’ होऊ शकतो याची खात्री अनेक समाजवादी नेते देत होते. त्या वेळी अखिलेश यांची मुख्यमंत्रिपदी झालेली निवड घराणेशाहीचा भाग असला तरी पक्षाला एक तरुण चेहरा देण्याचे चतुर राजकारण मुलायमसिंह यांनी केले होते. अखिलेश सरकारची पहिली तीन-साडेतीन वर्षे गुंडगिरी, जातीय दंगली, महिला अत्याचार अशा आरोपांनी गाजली. तरीही या काळात अखिलेश यांची पक्षावरची पकड कमी झाली नव्हती किंवा त्यांची लोकप्रियता वेगानेही घसरलेली नव्हती. दुसरीकडे सत्ता घरातल्या माणसांमध्ये वाटून गेल्याने मुख्यमंत्रिपदाला धोका नव्हता. पण जसे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तसे घरातून एकेकाचे विरोधाचे सूर बाहेर येऊ लागले. शिवपाल यादव, रामगोपाल यादव, मुलायमसिंह, अमरसिंह, आझम खान अशा प्रभावशाली नेत्यांनी आपले स्वार्थाचे राजकारण सुरू केले आणि समाजवादी पक्षाचा पाया खिळखिळा होऊ लागला. आता पक्षावर कब्जा करण्यासाठी अखिलेश त्यांचे रामगोपाल यादव यांच्यासारखे समर्थक मुलायमसिंह-अमरसिंह-शिवपाल यादव असे दोन गट सरसावले आहेत.

सध्याच्या घडामोडी पाहता पक्षप्रमुख म्हणून मुलायमसिंह यांचे सुंदोपसुंदी रोखण्याचे प्रयत्न प्रत्यक्षात अखिलेशच्या राजकारणाला नापसंती दर्शवणारे आहेत. पण त्यांची गोची अशी की, अखिलेश यांच्या मागे असणारा पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना थेट नाकारता येत नाही. अखिलेश यांच्या मागे पक्षातला बडा असा नेता नाही. मुलायमसिंह यादव यांना अखिलेशला पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करताना घरातूनच विरोध झेलावा लागतोय. खुद्द मुलायमसिंह संधी मिळेल तसे अखिलेशच्या कारभारावर टोमणे मारत असतात. आणखी एक बाब म्हणजे अखिलेश यांनी पक्षामध्ये स्वत:चा गट जन्मास घातलेला नाही. समाजवादी पक्षात अन्य पक्षांसारखे प्रादेशिक प्रभावशाली नेते आहेत. प्रत्येक नेत्याने आपला प्रदेश वाटून घेतला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात रामगोपाल यादव, दुआब-मैनपुरी-इटावा भागात शिवपाल यादव, रोहिलाखंडमध्ये आझम खान यांचा दबदबा आहे. अमरसिंहसारखे पक्षात पुनर्वापसी केलेले नेते जोडाजोडीच्या राजकारणापेक्षा तोडातोडीचे राजकारण करण्यात माहीर आहेत. (आजच्या पक्षातल्या सुंदोपसुंदीमागे तेच कारणीभूत असल्याचा अखिलेश समर्थकांचा आरोप आहे) या प्रत्येक नेत्याने आपल्या जनाधाराच्या माध्यमातून राज्यात पक्ष विस्तारत नेला आहे. अखिलेश त्या तुलनेत नवखे आहेत. पण त्यांची लोकप्रियता तरुण वर्गात अधिक आहे. एकुणात समाजवादी पक्ष ज्या पद्धतीने वाटचाल करत आहे त्यात मूळ लोहियावादाची चिकित्सा मागे पडत चालली आहे. मुलायमसिंह पक्षावर पुन्हा मांड ठोकून लोहियावाद आजही जिवंत असल्याचे सांगत असले तरी उत्तर प्रदेशातील तरुण मतदाराला लोहियावाद या घडीला उलगडून सांगणे पक्षाच्या आवाक्याबाहेरचे आहे. नेतेच स्वत:चा गड सांभाळण्यासाठी बंडखोरीचे झेंडे उभे करत असतील तर त्यात तत्त्वज्ञानाचा बळी जातो हा इतिहास आहे. खुद्द मुलायमसिंह यांनी आपला पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करताना लोहियांचा साधेपणा गुंडाळून सरंजामशाही-श्रीमंत घराणेशाहीची झलक उत्तर प्रदेशाच्या जनतेला दाखवली होती. सत्ता घराणेशाही यांच्यातील नाते मुलायमसिंह यांनी घट्ट केल्याने समाजवादी पक्षात घमासान निर्माण झाले आहे. लोहियावाद पुन्हा पराभूत झालेला आहे.
बातम्या आणखी आहेत...