आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्टिरियस हकालपट्टी (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धक्कातंत्र हा टाटांचा स्वभाव नाही. गजगतीने काम करणे हे टाटांचे वैशिष्ट्य. सोमवारी मात्र अघटीत घडले. गजगतीच्या टाटांनी कॉर्पोरेट विश्वात सर्जिकल स्ट्राईकचा नमुना ठरावा असा निर्णय घेतला आणि समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना डच्चू दिला.

टाटा समूहाने नेमलेल्या विशेष समितीने दोन वर्षे शोध घेऊन, मोठ्या काळजीकाट्याने व्यवस्थापनातील शास्त्रशुद्ध मार्गाने केलेली निवड अवघ्या चार वर्षांत कवडीमोलाची निघावी याचे नवल वाटते. अध्यक्षपदासाठी झालेला पाच वर्षांचा करारही मिस्त्री यांना पुरा करू देण्यात आला नाही. संयम, सबुरी ही टाटांची वैशिष्ट्ये. ती बाजूला ठेऊन झटपट निर्णय घेतला गेला. संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी रतन टाटा मिस्त्री यांची वेगळी बैठक झाली. मिस्त्री यांनी राजीनामा द्यावा असा प्रस्ताव त्यामध्ये रतन टाटांनी दिला असे म्हणतात. मात्र मिस्त्रींनी तो नाकारला संचालक मंडळापुढे जाण्याचे ठरविले. तेथे मिस्त्रींच्या हकालपट्टीला सहा संचालकांनी पाठिंबा दिला एकही संचालक मिस्त्रींच्या बाजूने उभा राहिला नाही. अध्यक्षांना बदलण्याबद्दल मोहन परशरामन पी चिदम्बरम अशासारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील बड्या वकिलांचा सल्लाही घेण्यात आला होता. याचा अर्थ सर्व काही आखीव-रेखीव पद्धतीने झाले. सायरस मिस्त्रींच्या हाती टाटा समूह सुरक्षित नाही अशी रतन टाटा अन्य संचालकांची खात्री कशामुळे पटली, ही ‘मिस्टरी’ आहे. हे गूढ उकलण्याचा बराच प्रयत्न सुरू असला तरी निश्चित म्हणावी अशी माहिती बड्या माध्यमांनाही मिळविता आलेली नाही. टाटा मिस्त्री हे काही बोलत नसल्याने या निर्णयाबाबत काही अंदाज बांधावे लागतात. रतन टाटा यांचे मिस्त्री यांचे जमत नाही असे गेले वर्षभर बोलले जात होते. हे मतभेद कशावरून होते, व्यावसायिक व्यूहरचनेवरून की टाटांनी जपलेल्या व्यावसायिक संस्कृती मूल्यांवरून याबाबत टाटांकडून स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. असे स्पष्टीकरण समभागधारकांसह नागरिकांसाठीही गरजेचे आहे. कारण टाटा हा केवळ उत्पादने करणारा ब्रॅन्ड नव्हे तर व्यावसायिक नीतीमत्तेचा आदर्श मानला जातो. व्यवसाय करावा तर टाटांसारखा असे प्रत्येक भारतीय नागरिक मानतो. अन्य उद्योगसमूहांना ही श्रीमंती मिळविता आलेली नाही. टाटा समूहाला ही नैतिक श्रीमंती मिळवून दिली ती मुख्यत: जेआरडींनी. व्यक्तिगत नफा दूरची गोष्ट राहिली, कंपनीच्या नफ्यापेक्षाही देशाच्या हिताला प्राधान्य देऊन व्यवसाय चालविण्याची दृष्टी जेआरडींकडे होती. जे देशाच्या हिताचे तेच टाटांच्या हिताचे, या साध्या सूत्रानुसार त्यांनी कित्येक वर्षे कारभार केला. या नैतिक श्रीमंतीमध्ये रतन टाटांनी भर घातली. व्यवसायाचे गणितही पक्के बसविले टाटा समूह कित्येक पटींनी मोठा केला. जागतिक बाजारपेठेत पाऊल टाकण्याचे धाडस केले. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीस तोड असे करार करून भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली.

जेआरडी हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते, रतन टाटाही भव्य व्यक्तिमत्व आहे. या दोन मोठ्या व्यक्तिमत्वांचा भार सहन करीत सायरस मिस्त्री यांना काम सुरू करावे लागले. जेआरडींची व्यवस्थापनाची शैली रतन टाटांना पसंत नव्हती. जेआरडींच्या जवळच्या व्यवस्थापकांना बदलत त्यांनी नवा मार्ग धरला. जेआरडींनी त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. मिस्त्री यांना मात्र तशी संधी रतन टाटांनी दिली नाही. टाटा समूहाचा नफा वाढावा याकडे मिस्त्रींचे अधिक लक्ष होते. बाजारपेठेतील आकडे मिस्त्रींची उत्तम कामगिरी दाखवितात. शेअर बाजारही त्यावर खुष होता. टाटा समूहाच्या मार्केट कॅपिटलाझेशनमध्ये मिस्त्री यांनी अवघ्या चार वर्षांत ७५ टक्के वाढ केली. रिलायन्सची वाढ फक्त २८ टक्के आहे. मिस्त्रींच्या योग्य कारभाराचे हे दाखले आहेत. मात्र मिस्त्रींचा रोख लोककल्याणापेक्षा व्यावसायिक नफ्याकडे अधिक होता. ही वाट टाटा संस्कृतीपेक्षा वेगळी होती त्यामुळे बिनसले असे म्हटले जाते. तथापि, रतन टाटांनीही नफ्याला महत्व दिले होतेच. रतन टाटा जोपर्यंत टाटा ट्रस्टवर आहेत, तोपर्यंत सायरस मिस्त्री यांना स्वत:चा मार्ग काढता येणार नाही, हा ‘इकॉनॉमिस्ट’ साप्ताहिकाचा अंदाज महिनाभरातच खरा ठरला. हा वाद अाता न्यायालयात गेला अाहे. हा वाद न्यायालयात लगाेलग जाणे हे ही टाटा संस्कृतीला धरून नाही. मिस्त्रींच्या अाधी टाटांनी न्यायालयात धाव घेतली ही बाब महत्वाची. टाटा मिस्त्री यांचे शापुरजी पालनजी या दाेन्ही घराण्यांची सुसंस्कृत वर्तणुकीबध्दल ख्याती असल्याने परस्परात ताेडगा निघेल असे वाटत हाेते. तथापि, अाता न्यायालयात धाव घेतल्याने प्रकरण विकाेपाला गेले अाहे, हे नाकारता येत नाही. तेथे कायद्याचा किस पाडला जाईल. टाटा संस्कृतीला छेद मिळेल असे मिस्त्रींनी काय केले हे न्यायालयात तरी कळावे. हा प्रश्न केवळ टाटांसाठी नव्हे, तर देशासाठी महत्वाचा अाहे. कारण टाटा हा देशाचा मानबिंदू अाहे.
बातम्या आणखी आहेत...