अमेरिकेतील क्लबवर झालेल्या हल्ल्याचे वर्णन विद्वेषातून झालेला हल्ला असेओबामा यांनी केले आहे. तो दहशतवादी हल्ला असू शकतो, असेही ते म्हणाले. ओबामा यांचे वर्णन वस्तुस्थितीला धरून आहे.
गेली काही वर्षे जगभर जो हिंसाचार उसळतो आहे तो मुख्यत: परस्परांविषयीच्या द्वेषभावनेतून उसळतो आहे. ही द्वेषभावना बऱ्याच वेळा शाब्दिक स्तरावर व्यक्त होते. ती जहाल असली तरी तेथे शब्दांची मारझोड असल्याने हिंसक वाटत नाही. मात्र काही जणांना शाब्दिक वाद-प्रतिवाद मान्य नसतात. त्यांना फक्त शस्त्राची भाषा कळते. वेगळा विचार, वेगळे राहणीमान, वेगळी जीवनशैली समोर आली की त्याचा नायनाट करायचा अशी मनोभूमिका असणारे कोट्यवधी लोक सध्या जगात नांदत आहेत. सोशल मीडियामुळे त्यामध्ये रोज हजारोंची भर पडत आहे. वेगळ्या व्यक्तीचा उच्छेद करावा ही या व्यक्तींसाठी फक्त भावना नसते तर हा उच्छेद घडवून आणण्याची जबर इच्छाशक्ती त्यामागे असते. शस्त्रे सहज मिळणाऱ्या समाजात या इच्छाशक्तीला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळते. अमेरिकेत तेच घडले आहे. अमेरिकी समाज, त्यामधील वागण्याबोलण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य याचा विद्वेष करणारे नागरिक तेथे वाढत आहेत. त्यांची मानसिक मूल्ये ही प्रचलित समाजाच्या विरोधातील आहेत. अमेरिकेत शस्त्रांची विपुलता असल्याने या विद्वेषाला बंदुकीच्या नळीतून वाट मिळते आणि ५० हून अधिक माणसांचे हकनाक बळी जातात. बळी गेल्याबद्दल मारणाऱ्याला अजिबात खंत नसते. कारण समलिंगी संबंध ठेवणारे हे जगायला लायक नसतात अशी त्याची खात्री पटलेली असते.
ओमर मतीन हा अशी खात्री पटलेल्यांतील होता. ओमर मतीनने ओरलँडोच्या क्लबमध्ये केलेल्या भीषण कृत्याबद्दल इस्लामला जबाबदार धरू नये, असे जगात सर्वत्र म्हटले जात आहे. ते सभ्यतेला धरून आहे. इस्लामवर टीका केल्याने त्याविरोधात आक्रस्ताळा प्रचार सुरू केल्याने असे हल्ले थांबणार नाहीत हेही खरे आहे. ओमर हा मनोरुग्ण होता अमेरिकेतील ख्रिश्चन नागरिकही असे हल्ले करतात. अलीकडे तर एका भारतीयाने दोघांना ठार केले आहे, असाही युक्तिवाद होईल. वरकरणी हा युक्तिवाद सरळ दिसतो, पण तसा तो नाही. अमेरिकेतील अन्य हल्ले किंवा भारतीयाने केलेला हल्ला मतीनचा हल्ला यामध्ये मूलभूत फरक आहे. इसिस या राक्षसी संघटनेच्या प्रचाराने मतीन भारावलेला होता त्या विचारसरणीतून तो असा हल्ला करण्यास प्रवृत्त झाला हा महत्त्वाचा फरक आहे. व्यक्तिगत नैराश्यातून झालेले हल्ले विचारसरणीच्या प्रभावातून होणारे हल्ले यामध्ये फरक केला पाहिजे. हा फरक लक्षात घेतला तर इसिसच्या भुताकडे अमेरिकेने किती गंभीरपणे पाहिले पाहिजे हे लक्षात येते. उदारमतवादी ओबामा यांच्या कारकीर्दीत आखाती देशांतून अमेरिकेने पाय काढून घेतले. आखाती देशात आधी रशियाने त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने दहशतवादाचा भस्मासुर पोसला सर्व व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली. पाय काढून घेताना तेथे स्थिर सरकार येईल, सांस्कृतिक सभ्यता टिकून राहील याची कोणतीही दक्षता ओबामा महाशयांनी घेतली नाही. अमेरिकेचा प्रभाव कमी होत गेल्याने झालेल्या पोकळीत अनेक दहशतवादी गट फोफावले. इसिस हा त्यातील सर्वात मोठा संबंध. या संबंधाच्या प्रभावाने भारून जाणारे लक्षावधी लोक जगातील सर्व देशात आहेत. वेगळ्या आचारविचारांच्या व्यक्तींचा बळी घेणे हे त्यांना कर्तव्य वाटते. ही कर्तव्याची भावना त्यांच्यात आक्रमक प्रेरणा आणते. ही प्रेरणा तामसी असल्याने त्यातून जगाचा नाश होतो.
इसिसच्या वैचारिक मूल्यांचा हा परिणाम आहे हे नाकारता येणार नाही. मतीन हा अमेरिकेत लहानाचा मोठा झाला. अमेरिकेने इस्लामवर केलेल्या तथाकथित अन्यायाविरोधात वा अमेरिकेतील स्वैर आचारविचारांना प्रतिबंध करण्यासाठी त्याला तेथे अनेक अन्य मार्ग उपलब्ध होते. तो सभा घेऊ शकत होता, जनमत जागृत करू शकत होता, ल्यूथर किंगप्रमाणे आंदोलने करू शकत होता, रीतसर निवडणुकीला उभा राहून सिनेटमध्ये जाऊ शकत होता, पुस्तके लिहून जनमत बदलू शकत होता. असे अनेक अहिंसक मार्ग उपलब्ध असताना हाती बंदूक घेऊन विच्छेद करण्याचा एकमेव मार्गच त्याला वा त्याच्यासारख्या युरोपातील अनेक इसिस समर्थकांना का सुचतो याचे उत्तर कोणी देत नाही देऊ इच्छित नाही. सर्व प्रकारची आर्थिक सुबत्ता स्वातंत्र्य असतानाही हिंसा हाच एकमेव मार्ग दिसणाऱ्यांना अडवायचे कसे हा प्रश्न युरोप-अमेरिकेला भेडसावत आहे. तोच पुढे भारतालाही भेडसावणार आहे. कारण विद्वेषाच्या कलहात हात धुऊन घेणारे भारतातील सर्व राजकीय पक्षांत आहेत.