आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमदानाची ‘आमिरी’! (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधी महाराष्ट्राची ओळख ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ अशी करून द्यायचे. समाजाच्या हितासाठी झोकून देणाऱ्या निरलस कार्यकर्त्यांनी देशातल्या कित्येक चळवळी उभारल्या, टिकवल्या. अलीकडच्या काही दशकांत या नावलौकिकाला ओहोटी लागली की काय अशी भीती जाणवते. चळवळींची व्याप्ती, प्राधान्यक्रम, सातत्य आणि लोकसहभाग यांचा टक्का सतत घसरताना दिसतो. म्हणूनच शतकानुशतके वेदना देणाऱ्या दुष्काळाला हटवण्याची मोहीम अजून गती घेऊ शकलेली नाही. कुठेतरी एखादे विलास साळुंखे उभे राहतात आणि ‘पाणी पंचायती’चा लढा सुरू करतात. 

मोहन धारियांची ‘वनराई’, डॉ. मुकुंद घारेंची ‘अफार्म’ किंवा सुरेश खानापूरकरांचा ‘शिरपूर पॅटर्न’ असे पाण्याची यशस्वी शेती करणारे अनोखे प्रयोग मर्यादितच राहतात. तहान भागलेल्या गावांची उदाहरणे द्यायला जावे तर अण्णा हजारेंचे ‘राळेगणसिद्धी’, पोपटराव पवारांचे ‘हिवरेबाजार’ अशी तीच ती नावे पुन्हा पुन्हा घ्यावी लागतात. पाणलोट विकासाच्या, जलसंधारणाच्या, भूजल पुनर्भरणाच्या कित्येक सरकारी योजना येतात अन् जातात; पण दुष्काळ जिथेच्या तिथे राहतो. जलयुक्त शिवारची भाषा कोणी बोलू लागले की त्याकडे राजकीय चष्म्यातूनच पाहिले जाते. खरे म्हणजे महाराष्ट्राचे शिवार पाणीदार करणे हे या राज्यापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. पावसाचा प्रत्येक थेंब मुरवणे ही राज्याची सर्वात महत्त्वाची गरज आहे  हे समजून घेणे गरजेचे आहे. कोणाच्या का आरवण्याने असेना, पण लख्ख उजाडते आहे हे सुचिन्ह मानले पाहिजे. म्हणूनच चंदेरी दुनियेतला तारा आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या ‘पाणी फाउंडेशन’च्या कर्तृत्वाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. 

दुष्काळाला कायमची मात देण्याचे स्वप्न घेऊन ही संस्था गावकऱ्यांपुढे जाते. ‘आम्ही तुम्हाला दमडीही देणार नाही, पण पुढे जाण्याची वाट नक्की दाखवू. त्यासाठी प्रशिक्षण देऊ. तुमचे गाव, तुमचे श्रम, तुमचे यश. बघा, गाळणार का घाम?’ असा सवाल करते. आमिरच्या लोकप्रियतेची जादू असेल किंवा त्या संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाचा प्रामाणिकपणा. लोक पुढे येतात. पहिल्या वर्षी फक्त तीन आणि पुढच्या वर्षी थेट ३० तालुके असा प्रसार होतो. ऐन उन्हाळ्यात तन-मन-धनाने हजारो लोक घराबाहेर पडतात. कशासाठी तर श्रमदानासाठी. या सामाजिक क्रांतीची थोरवी कदाचित आज समजणार नाही, परंतु शिवार पाणीदार करणारी पिढी होऊन गेली म्हणून आम्ही उभे आहोत, अशी कृतज्ञता भविष्यातल्या पिढ्या व्यक्त करतील तेव्हा त्याचे मोल इतिहासाला समजेल. 

यात एकाही शब्दाची अतिशयोक्ती नाही. म्हणूनच आमिर खान आणि त्याच्या पाणी फाउंडेशनचे काम क्रांतिकारी आहे. श्रमदानाची हरवत चाललेली महाराष्ट्राची परंपरा पुनरुज्जीवित केल्याबद्दल या मंडळींना धन्यवाद द्यायला हवेत. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये १३५० गावांतून आलेल्या गावकऱ्यांचे आशेने फुललेले चेहरे, त्यांची एकजूट आणि त्यांचा जल्लोष ज्यांनी पाहिला त्यांना या परंपरेतली ताकद अनुभवता आली. ‘गाव करी ते राव काय करी,’ असा चमत्कार या क्रांतिकारकांनी करून दाखवला. सव्वाआठ हजार कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता फक्त आणि फक्त श्रमदानातून महाराष्ट्रात निर्माण झाली. तीही फक्त ४५ दिवसांत. आमिर खानने या गावकऱ्यांना प्रेरणा दिली. एकत्र आणले. 

लक्ष्य गाठण्यासाठीचे तंत्र-मंत्र उपलब्ध करून दिले. प्रामाणिक हेतूने काम करणाऱ्यांना मदतीचे हजारो हात मिळत जातात. उद्योजकांनी खिसा हलका केला. सरकारी यंत्रणा हलली. भारतीय जैन संघटनेसारखी सामाजिक संघटना पुढे आली. आमिर खानच्या संकल्पनेचे रूपांतर लोकचळवळीत झाले. आधी प्रामाणिकपणे घाम गाळून काम करून दाखवल्यानंतर कोट्यवधी रुपयांची ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ची शाबासकी मिळाली. अर्थातच ही केवळ सुरुवात आहे. दोन वर्षांत राज्यातले ३३ तालुके दुष्काळाशी लढण्यासाठी पुढे आले. पुढच्या वर्षी १०० तालुक्यांमधले गावकरी दुष्काळ हटवण्यासाठी घाम गाळणार आहेत. महाराष्ट्राचे शिवार पाणीदार करण्याची ही लोकचळवळ निरंतर ठेवावी लागणार आहे. त्यातले सातत्य अखंडित राखावे लागेल. समाजातल्या प्रत्येक घटकाचा सहभाग यासाठी महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्यलढ्यानंतरचे तितकेच मोठे युद्ध दुष्काळमुक्तीसाठी लढावे लागणार आहे. कारण शेवटी ‘जल है तो कल है!’ त्यासाठी गावाची एकजूट आणि शास्त्रोक्त श्रमदान याला पर्याय नाही. लोकांचा सहभाग असेल तरच यश मिळते. सरकारी योजना निव्वळ बोजवारा उडण्यासाठीच असतात हे विसरता कामा नये.
बातम्या आणखी आहेत...