आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला नव्हे, युद्ध (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री एकाच वेळी सात ठिकाणी हल्ले करून ‘इसिस’ म्हणजे इस्लामिक स्टेटने आपली राक्षसी ताकद जगाला दाखवली आहे. इसिसची ताकद आता कमी होते आहे, रशियाच्या हवाई हल्ल्यांनी त्यांना जेरीस आणले आहे, रशियाचे विमान पडले की पाडले गेले, अशी चर्चा गेली महिनाभर सुरू असतानाच हा हल्ला झाला आहे. विशेषतः हवाई हल्ल्यात अधिक सक्रिय होण्याची तयारी फ्रान्स करतो आहे, अशी विधाने फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी अलीकडेच केली होती. त्याला उत्तर म्हणून तीन आत्मघातकी पथकांनी हे कृत्य अतिशय नियोजनपूर्वक घडवून आणले आहे, अशी माहिती पुढे येऊ लागली आहे.
२००८ मध्ये २६ नोव्हेंबर रोजी भारताची आर्थिक राजधानी मुंबईत १२ ठिकाणी लष्कर-ए -तोयबाने हल्ले करून १६४ निरपराध भारतीयांना ठार, तर ३०८ जणांना जखमी केले होते. त्या वेळी जगाने या प्रश्नावर एक व्हावे, अशी हाक भारताने दिली होती. मात्र. तो भारतावरील म्हणजे एका विकसनशील देशावरील हल्ला असल्याने त्याला प्रगत देशांनी पाहिजे तेवढे महत्त्व दिले नव्हते. ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला आणि संयुक्त राष्ट्रसंघाला त्याची लगेच आठवण करून दिली आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या
तत्त्वांची देणगी ज्या फ्रान्सने जगाला दिली, तो देश आता दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य होतो आहे, याचा अर्थ काहीतरी चुकते आहे, हे तर मान्यच करावे लागेल. गेल्या वर्षी ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकाच्या कार्यालयावरील दहशतवादी हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर फ्रान्सने असे हल्ले रोखण्यासाठी बराच बंदोबस्त केला होता. पण हल्ले थांबले नाहीत. शुक्रवारी एका रॉक कॉन्सर्टवर तसेच नॅशनल स्टेडियमसह सात ठिकाणी हल्ले करून १२८ निरपराध नागरिकांना ठार, तर २०० लोकांना जखमी केले गेले. स्टेडियमवर फ्रान्सचे अध्यक्ष असताना हा हल्ला झाला! असाच हल्ला भारतीय संसदेवर झाला होता आणि त्या वेळी तसेच मुंबई हल्ल्याच्या वेळी भारतातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हे लावण्यात आली होती. पण अगदी त्याच धर्तीवर त्यानंतर सात वर्षांनी फ्रान्ससारख्या विकसित देशात होणारे हे हल्ले जगाची काळजी वाढवणारे आणि दहशतवादाला एकत्रित कसे सामोरे जायचे याचा गंभीरपणे विचार करायला लावणारे आहेत.
स्पेनच्या माद्रिद येथे २००४ मध्ये झालेल्या रेल्वेमधील बॉम्बस्फोटानंतर युरोपमध्ये झालेला हा सर्वात रक्तरंजित दहशतवादी हल्ला असल्याने या हल्ल्याचे व्यापक परिणाम होणार हे तर उघडच आहे. या हल्ल्याचे गांभीर्य फ्रान्सला सर्वाधिक असणार. त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समध्ये अशी आणीबाणीची स्थिती पाहायला मिळते आहे. फ्रान्सच्या नागरिकांनी या हल्ल्याला किती धैर्याने तोंड दिले, माध्यमांनी कसा संयम राखला आणि सरकारने कशी स्थिती आटोक्यात आणली याची चर्चा तर पुढील काळात होत राहीलच; पण इसिसने ज्या पद्धतीने हे हल्ले घडवून आणले आहेत, ते नियोजन फ्रान्सच्या सुरक्षा व्यवस्थेवर मात करणारे ठरले आहे, हेही लक्षात ठेवावे लागेल. हल्ला करणारे एकूण आठ अतिरेकी होते आणि त्यातील सात जणांनी स्वत:ला संपवले, तर केवळ एक अतिरेकी सुरक्षा रक्षकांनी ठार केला. याचा अर्थ मरणाला कवटाळून हे हल्लेखोर आले होते. अशा या हल्लेखोरांना जगातला असा कोणता विचार मृत्यूच्या भीतीतून मुक्त करून दुसऱ्यांना निर्दयतेने ठार मारण्यास सांगतो, त्याचाही विचार जगाला करावा लागणार आहे. स्वत: मरण्यास तयार झालेल्यास कोणतीही व्यवस्था रोखू शकत नाही असे म्हणतात. याचा अर्थ अशा हल्ल्यांचा शोध घेताना तो परतावून कसा लावायचा याची साधने विकसित करण्यापेक्षा असे अतिरेकी घडवणाऱ्या जहाल विचारापर्यंत पोहोचावे लागेल. हा विचार घेऊन फिरणारे तरुण केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया, इराक आणि अशा काही देशांतच असते तर तो त्या त्या देशाचा प्रश्न आहे असे म्हणता आले असते. पण ज्या देशांत हे हल्ले होत आहेत त्या अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि भारत अशा देशांतही ते आहेत.
अगदी फ्रान्सचेच उदाहरण घ्यायचे तर या देशांतील ५०० जण सिरिया आणि इराकच्या संघर्षात सक्रिय आहेत असा फ्रान्स सरकारचाच अहवाल सांगतो. त्यामुळेच दहशतवादी हल्ले जेथे होतात तेथील काही नागरिक त्यांना मदत करत असल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. याचा अर्थ या प्रश्नाचा आवाका आज जग विचार करते त्यापेक्षा अधिक आहे हे मान्य करावे लागेल. दुसऱ्या महायुद्धानंतर थेट युद्ध जगात झालेले नाही, पण अशी छुपी युद्धांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याचे वर्णन फ्रान्समध्ये ‘युद्ध’ असे केले जाते आहे. त्यामुळे अशा युद्धाच्या मालिकेतून जगाची सुटका करण्याचा निर्धार करण्याची गरज निर्माण झाली
आहे.