आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे सात स-गुण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'केवळ घोषणाबाजीने लोकांचे समाधान होत नाही' हे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान झालेल्यानरेंद्र मोदींना एव्हाना चांगलेच लक्षात आलेले दिसते. त्यामुळेच सोमवारी अलाहाबादमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करताना त्यांनी हीच जाणीव कार्यकारिणीच्या सदस्यांनाही करून दिली. या कार्यकारिणीने मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराचे भरभरून कौतुक करणारे ठराव एकमताने संमत केले असले तरी स्वत: मोदींना दोन वर्षे सरकार चालवताना झालेली ही जाणीव अधिक लक्षवेधी आणि तितकीच महत्त्वाची आहे. कार्यकारिणीत हे भाषण देण्यापूर्वी त्यांनी दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाचे झालेले पानिपत आणि आसाम निवडणुकीत मिळालेला लक्षवेधी विजय यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले असावे, असे गृहीत धरायला हरकत नाही. मोदींनी कार्यकारिणीच्या सदस्यांना दिलेला हा सल्ला स्वत:ही आचरणात आणायचे ठरवले तर त्यांच्या पक्षाबरोबरच देशाचेही भले झाल्याशिवाय राहणार नाही.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप पक्षातील वडीलधाऱ्या नेत्याच्या भाषणाने होत असतो. ती जागा लालकृष्ण अडवाणींकडे असली तरी ते सध्या गप्प राहणेच पसंंत करीत आहेत. स्वाभाविकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ती जबाबदारी आली आणि वडीलकीची भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे निभावली. अर्थात, कार्यकारिणीच्या सदस्यांना त्यांनी भरभरून सल्ले दिले. सत्तेचा उपयोग समाजाच्या फायद्यासाठी करा, हे सांगतानाच त्यांनी "स' हे अाद्याक्षर असलेले सात मंत्रच पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकारिणी सदस्यांना दिले. सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मकता, सद््भावना आणि संवाद यांचा त्यात समावेश आहे. इतके "स'द््गुण अंगी बाळगले तर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे संतांचा मेळाच नाही का बनणार? पण राजकारणात आणि सत्तेत राहूनच हा सर्वगुणसंपन्न व्हायचा सल्ला मोदी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देत आहेत. त्यामुळे तो सल्ला किती कठीण आहे, हे वेगळे सांगायला नको. अर्थात, मोदी यांनाही त्याची कल्पना असणारच. पण काही तरी वेगळे (डिफरंट) सांगितल्याशिवाय "पार्टी विथ डिफरन्स' हे बिरूद कसे वापरायचे, असा प्रश्न भाजपच्या अन्य नेत्यांप्रमाणेच मोदींनाही असावा आणि म्हणून त्यांनी या स-गुणांचा गुणाकार करण्याचे अवघड काम कार्यकारिणीसमोर ठेवले असावे.

देशसेवेच्या भावनेने आपण आपले घर आणि संसार कसा सोडला, याचा संदर्भ देत मोदी याच भाषणात भावुक झाले होते. म्हणजे सातपैकी पहिला स-गुण त्यांनी स्वत:च्याच उदाहरणातून स्पष्ट करून दाखवला, असे म्हणायला हरकत नाही. संपूर्ण भाषणात कोणत्याही वादग्रस्त मुद्द्याचा उल्लेख करून आपला संयमही त्यांनी दाखवून दिला, असेही म्हणता येईल. असे संदर्भच शोधायचे झाले तर या सातही स-गुणांचे संदर्भ त्यांच्या वागण्यातून शोधून काढताही येतील; पण त्या गुणांशी विसंगत ते वागतच नाहीत, असा दावा ते स्वत: तरी करतील का? सकारात्मकतेचा सल्ला देणाऱ्या मोदींना संसदेत निकोप लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेता असला पाहिजे, एवढाही सकारात्मक विचार का करता आला नाही? जुन्या सरकारच्या चांगल्या योजना त्याच नावाने पुढे सुरू ठेवण्याचा संयम का दाखवता आला नाही? हे दोन्ही विषय राजकीय आहेत असे एकवेळ म्हणता येईल; पण आपल्याच सरकारमधील मंत्र्यांकडून उधळली जाणारी मुक्ताफळे थोपवण्याकडे झालेले दुर्लक्ष हे वाचा आणि कृती यात समन्वय नसल्याचे उदाहरण नाही का? पाकिस्तानसह जगभरातील नेत्यांशी आणि तिथल्या नागरिकांशी सातत्याने "संवाद' साधणाऱ्या याच मोदींनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी एकदाही दिलासा देणारा संवाद साधला नाही, ही टीका करण्याची संधी विरोधकांना दिलीच. अशी आणखीही उदाहरणे देता येतील. ज्या उत्तर प्रदेशात ही बैठक झाली तिथे वर्षभरात निवडणूक होणार आहे. त्यासाठीच्या प्रचाराची सुरुवातही मोदींनी या बैठकीनंतर लगेच केली. त्यात भाऊबंदकी, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि जंगलराज संपवण्याचे आश्वासन त्यांनी तिथल्या जनतेला दिले. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची उदाहरणेही दिली. ती देताना त्या राज्यांत गाजलेल्या अनेक घोटाळ्यांसंदर्भात कारवाई करण्यात तिथली भाजपची सरकारे कसा "संयम' बाळगत आहेत, हे सांगण्याचे "संतुलन'ही त्यांनी ठेवले. मोदींची आपल्या सरकारांबाबतची ही "सकारात्मकता'च म्हटली पाहिजे. या सर्वाचा अर्थ एवढाच की, मोदींनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीला जो सल्ला दिला तो चर्चा करण्यापुरता आणि बातमीपुरताच राहण्याची शक्यता जास्त आहे.