आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About PM Narendra Modi Government And RSS India, Divya Marathi

सरकारसाठी संघ! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा बातमीचा विषय आहे. देशातील प्रत्येक वादग्रस्त घटनेमागे संघाचा हात असतो हा अंधविश्वास बाळगणारे बरेच आहेत. निवडणुकीतून जनसामान्यांवर पकड बसवण्याची क्षमता या संघविरोधकांमध्ये नाही. प्रसिद्धी-अप्रसिद्धीची अजिबात पर्वा न करता चिकाटीने काम करीत राहण्याची त्यांना सवयही नाही. संघावर टीकेचे प्रहार करीत राहिल्यास व भारत हा हिंदू फॅसिस्टांचा देेश आहे, अशी वारेमाप ओरड करीत राहिल्यास पुढील निवडणुकीत, निदान आपल्याला नाही, तरी काँग्रेसला नक्की यश मिळेल या आशेने काही गट कसून काम करीत आहेत. संघासाठी हे सरकार आहे असा प्रचार सुरू असतो. अर्थात सरकारला धारेवर धरणारे गट लोकशाहीत हवेत, मग ते सत्तेवर येवोत वा न येवोत. अशा गटांकडून होणारी टीका एकांगी असली तरी उपयुक्त असते. कारण त्यामुळे सरकार वचकून राहते. आपल्यावर अविश्वास दाखवणारा व त्या अविश्वासाला लेखन व भाषणांच्या जोरावर जनतेपर्यंत नेणारा दबावगट लोकशाहीत आवश्यक असतो. अशा दबावगटांचा द्वेष न करता वा त्यांना पोलिसी खाक्या न दाखवता त्यांचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्यात सरकारचे यश असते. काँग्रेसच्या नेत्यांकडे हे कौशल्य अमाप होते. लोकसभेत उत्तम बहुमत मिळाले असले तरी लहानशी टीकाही भाजपला सहन होत नाही. टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी वा आपली बाजू मांडण्यासाठी भाजप नेते आक्रमक होतात आणि त्यातून पुन्हा त्यांच्या विरोधकांना खाद्य मिळते. टीकेचे व्यवस्थापन कसे करावे याचे कौशल्य नसल्यामुळे दोन वर्षांच्या कारभारानंतर प्रसारमाध्यमांमध्ये मोदी सरकार पिछाडीवर आहे.

यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीत उत्साह आहे. माध्यमांतील प्रसिद्धी पुढील निवडणुकीत मोदीविरोधी लाट आणील अशा अपेक्षेने नितीशकुमारांपासून अनेक जण आत्तापासून तयारीला लागले. तथापि, मोदींकडे जे कमी आहे, ते भरून काढण्यासाठी संघासारखी यंत्रणा आहे, याकडे मोदी विरोधकांचे दुर्लक्ष होते. मोदी सरकार हे संघाने उघडपणे आपले मानले आहे. वाजपेयींच्या वेळी अशी स्थिती नव्हती. सरकार आपले म्हटल्यामुळे ते टिकवण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी संघाने आत्तापासून सुरू केली असावी. अलीकडील दोन घटना याचे संकेत देतात. मंदिरासह अन्य संस्थांनी ख्रिश्चनांच्या मिशनरी वृत्तीने काम करावे, असे मा. गो. वैद्य यांनी म्हटले. संघ हा ख्रिश्चनांच्या धर्मप्रसाराच्या विरोधात असला तरी संघटनेची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी चर्चच्या मिशनरी वृत्तीने काम करावे लागते हे संघाने फार पूर्वी ओळखले. संघाचे काम मिशनरी पद्धतीनेच होते आणि त्यामुळे शंभराहून अधिक संस्थांचे जाळे आज संघाकडे आहे. हे जाळे सरकारी मदतीपासून स्वतंत्र, म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वयंभू आहे हे टीकाकारांनी लक्षात घ्यावे. हे जाळे आता सरकारचे काम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरण्याची संघाची योजना असावी, असे संकेत दुसऱ्या घटनेतून मिळतात. ही घटना औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीची आहे. दुष्काळाकडे संधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन संघाच्या या बैठकीत घेतला गेला. दुष्काळात मराठवाड्यामध्ये संघाकडूनही बरेच काम पूर्वीच सुरू आहे. त्याचा फायदा पुढील काळात भाजपला होईल असे संघाला वाटते. तसेच काम पक्ष कार्यकर्त्यांनी करण्याचा संघाचा आग्रह आहे. तथापि, भाजपचे सध्याचे नेते व कार्यकर्ते यांच्या हे कितपत अंगवळणी पडेल याची शंका आहे. संघ ज्या पद्धतीचे मिशनरी काम धार्मिक संस्था व सरकार यांच्याकडून करून घेऊ इच्छितो, तसे काम करण्याची ऊर्मी या संस्था व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये फारशी नाही. कार्यकर्त्यांना सत्तेची भूक आहे आणि मोदी सरकार हे आपल्यामुळेच सत्तेवर आले अशा भ्रमात धार्मिक संघटना आहेत. दुष्काळासाठी काही करावे असे शंकराचार्यांना कधी वाटले नाही. तसे काही वाटावे इतकी संवेदनशीलता त्यांच्याकडे नाही. भाजपचे कार्यकर्तेही आम्हाला काय मिळणार याच काँग्रेसी पद्धतीने विचार करीत आहेत. मात्र तरीही सरकारची प्रतिमा प्रत्यक्ष कामातून बदलण्याच्या संघाच्या नव्या पवित्र्याकडे मोदी विरोधकांनी दुर्लक्ष करू नये. संघावर टीका करताना (आम्ही तशी खूप टीका केलीही आहे) संघाच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. संघासाठी हे सरकार आहे असे म्हटले जात असले तरी सरकारसाठी संघ अशी उलट मांडणी आता सुरू झाली आहे. संघ सरकारबरोबर खरोखरच हातात हात घालून काम करू लागला व त्यातून लोकांची कामे होऊ लागली तर ‘संघवाद, मनुवाद, ब्राह्मणवाद’ या टीका जनता मान्य करणार नाही अाणि मूठभरांचे आत्मसमाधान यापलीकडे त्यांना अर्थही राहणार नाही. तेव्हा या भाषणबाजांनी संघाच्या उलट मांडणीकडे लक्ष द्यावे हे उत्तम.