आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About PM Narendra Modi, India , Divya Marathi

उन्मादाचे गर्वहरण (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अच्छे दिन आने वाले हैं' या घोषणेवर विश्वास ठेवत देशातील जनतेने तीनच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएला दणदणीत विजय मिळवून दिला व नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. मोदी सरकारच्या गेल्या शंभर दिवसांच्या कारकीर्दीत जनतेला जे अपेक्षित होते, ते चांगले दिवस येण्याची चाहूलही अद्याप लागलेली नाही. आर्थिक घोटाळे घडणे हे यूपीए सरकारचे व्यवच्छेदक लक्षण झाले होते. मोदी सरकारमधील मंत्र्यांपैकी कोणी काही घोटाळा केला आहे का, हे अद्याप तरी उजेडात आलेले नाही. हा एक मुद्दा सोडला तर वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंची होणारी टंचाई, त्यात भरीला विविध राज्यांत झालेल्या जातीय दंगली या घटना यूपीएच्या कारकीर्दीप्रमाणे नरेंद्र मोदी सरकारच्या कालावधीतही घडत आहेत. त्यामुळे यूपीए व एनडीए सरकारमध्ये खरेच काही फरक आहे का, असा प्रश्न जनतेच्या मनात उभा राहिला आहे. लोकसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेमुळे एनडीएला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपला विजयाचा उन्माद चढला होता. या अवस्थेतून भाजपला जमिनीवर आणण्याचे काम बिहार, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांत पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालांनी केले आहे. या राज्यांपैकी बिहारमध्ये विधानसभेच्या दहा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांत लालूप्रसाद यादव यांचा राजद, माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड), काँग्रेस या पक्षांनी स्थापन केलेल्या सेक्युलर आघाडीने सहा जागांवर तर भाजपने चार जागांवर विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान जनतेची जी मानसिकता होती त्याच्या अगदी उलट जनभावना या पोटनिवडणुकांतील निकालांतून दिसली. गेल्या महिन्यात उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुका काँग्रेसनेच जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकांत स्थानिक उमेदवार व स्थानिक प्रश्न हेच अधिक प्रभावी ठरतात, हेही या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालेे. लोकसभा निवडणुकांत बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाले होते. त्या वेळी सपाटून मार खाल्लेल्या व एरवी विळ्याभोपळ्याचे सख्य असलेल्या राजद, जनता दल (युनायटेड), काँग्रेस या पक्षांनी बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकांत मात्र राजकीय शहाणपणा दाखवला. भाजपशी पूर्वी राजकीय हातमिळवणी करणारे बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीशकुमार यांना कालांतराने धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्याची उबळ येऊन ते भाजपपासून लांब गेले होते. दुसऱ्या बाजूस लालूप्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून राजकीय अपयशाच्या गर्तेत सापडले होते. त्यामुळे या दोघांनाही बिहारमध्ये आपले अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी परस्परांशी या पोटनिवडणुकांत आघाडी करावी लागली. लालू, नितीश यांच्याबरोबर जाण्याशिवाय काँग्रेससमोरही अन्य पर्याय नव्हता. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये २८ जागांपैकी फक्त आठच जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील बेल्लारी येथील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने मिळवलेला विजय त्या पक्षासाठी आश्वासक म्हटला पाहिजे. बेल्लारी विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. तेथील वादग्रस्त आमदार बी. एस. श्रीरामुलू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता व लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडूनही आले होते. त्यामुळे रिकाम्या झालेल्या बेल्लारी विधानसभा जागेवर भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असे सगळेच जण गृहीत धरून चालले होते. पण तेथे काँग्रेसने विजय मिळवून भाजपला धक्का दिला आहे. कर्नाटकातील तीन विधानसभा जागांपैकी दोन काँग्रेसने जिंकल्या, तर बी. एस. येदियुरप्पा यांचे पुत्र व भाजपचे उमेदवार राघवेंद्र यांनी शिकारपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून या पक्षाची लाज राखली आहे. कर्नाटकमध्ये पूर्वी भाजपचे राज्य सरकार अस्तित्वात आल्यानंतर या पक्षाने दक्षिण दिग्विजय झाल्याचे ढोल पिटले. पण पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे हा ढोल फाटण्याच्या बेतात आहे का, हे आता तपासायला हवे. पंजाबमधील विधानसभा पोटनिवडणुकांत काँग्रेस व अकाली दलाने एक-एक जागा जिंकली आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कारभारामुळे भाजपची विजयमालिका कायम राहिली होती. तिला या वेळी थोडा तडा गेला आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या तीन जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकांत दोन जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. हे सारे पाहता महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, जम्मू-काश्मीर या चार राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही मोदी लाटेमुळे आपलाच विजय होणार असल्याच्या भ्रमात भाजप व त्यांचे मित्रपक्ष राहिले तर तोंडावर आपटण्याची पाळी त्यांच्यावर येऊ शकते.