आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About PM Narendra Modi Lahore Visit And Terror Attack, Divya Marathi

अपेक्षित हल्ला, अनपेक्षित सतर्कता (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरमध्ये जाऊन भेट घेतली होती. त्या वेळी असे वातावरण तयार झाले की, भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा सुरळीत होऊन पाकिस्तानही सुसंवाद साधण्यास उत्सुक आहे. मोदींची लाहोरला भेट हा जसा कूटनीतीचा भाग होता तसेच शरीफ यांनी मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहून व पुढे आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांमध्ये मोदींशी चर्चा करून उभय देशांचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पावले टाकणे ही त्यांची कूटनीती होती. शेजारील राष्ट्रांशी तणावाची परिस्थिती असेल तर तणाव निवळण्यासाठी मैत्रीचे संकेत उभय राष्ट्रे दाखवत असतात व ते अत्यावश्यक असते. पण हा झाला राजकीय पातळीवरील शिष्टाचाराचा भाग. गेल्या २५ वर्षांत भारत-पाक संबंधांमध्ये केवळ दोन्ही देशांचे पंतप्रधान किंवा लष्करे महत्त्वाची भूमिका बजावत नाहीत तर त्यामध्ये पाकस्थित दहशतवादी गट, त्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या धार्मिक संघटना व काही पाश्चिमात्य राष्ट्रे दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे शरीफ-मोदी यांनी कितीही मैत्रीपूर्ण हस्तांदोलन केले तरी दहशतवादी हल्ले करण्याचे थांबतील अशा भ्रमात कोणी राहण्याचे कारण नाही. दहशतवादी हल्ल्यांचे स्वरूप बदलू शकते व त्याची ठिकाणे, लक्ष्ये बदलू शकतात. दहशतवादी हल्ल्यांची मॉडेल बदलू शकतात. रविवारी पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर केलेला दहशतवादी हल्ला हा नि:संशय भारत-पाक संबंधांमध्ये पुन्हा मोठी दरी व संशय निर्माण करण्याचा प्रयत्न होता. या दहशतवादी हल्ल्यात भारताचे सात जवान शहीद व २० जवान गंभीर जखमी झाले आहेत. असा हल्ला होणार याची पूर्वकल्पना असल्याने जवान सतर्क झाले होते. त्यांनी प्राणाची बाजी लावल्याने मोठा अनर्थ टळला आहे. जवानांचे शहीद होणे ही देशाच्या दृष्टीने सर्वात मोठी हानी असते. अशा घटनेमुळे लष्कराच्या मनोधैर्यावर परिणामही होत असतो.

आजपर्यंत पाकस्थित दहशतवादी गटांनी भारताच्या लष्करी तळांवर अशा प्रकारचे हल्ले केले नव्हते. पाकिस्तानमधील रावळपिंडी किंवा कराची येथील लष्करी तळांवर तालिबानी दहशतवाद्यांकडून असे हल्ले याअगोदर झाले होते. तशीच मोडस ऑपरेंडी या हल्ल्याची होती. एकुणात पठाणकोटमधील हल्ला हा सुनियोजित राजकीय कट होता. या हल्ल्यानंतर उभय देशांमध्ये टोकाच्या प्रतिक्रिया याव्यात अशीही रचना होती. या हल्ल्यामुळे एक बाब स्पष्ट दिसली की, दहशतवादी गटांनी पंजाबला पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ८० च्या दशकात पाकिस्तानने स्वतंत्र खलिस्तान चळवळीच्या निमित्ताने खलिस्तान संघटनांना लष्करी प्रशिक्षण देण्यापर्यंत मदत केली होती. त्यामुळे पंजाब अशांत झाला होता, पण नंतर पंजाबमधील खलिस्तान चळवळ नेस्तनाबूत केल्यानंतर दहशतवादी गटांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सरकारविरोधात "प्रॉक्सी वॉर' सुरू केले होते. ते आजतागायत सुरू आहे. या गेल्या २५ वर्षांत पंजाब हा शांत होताच; पण गेल्या दहा वर्षांत अमली पदार्थांच्या मोठ्या प्रमाणातील तस्करीने पंजाबचे सामाजिक व आर्थिक जीवन पुरते पोखरले गेले आहे. बेरोजगारी व स्थलांतर या समस्यांनी त्यात भर घातली आहे. शिवाय पाकिस्तान सीमेलगत असलेली पंजाबची सीमा ही विस्तीर्ण आहे. त्यात नद्या व शेतीमुळे पठाणकोट-गुरुदासपूर सीमाप्रदेश दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी उपयुक्त ठरत आहेत, तर सुरक्षा दलांना सुरक्षेच्या दृष्टीने कठीण ठरत आहेत. पंजाबमधील अमली पदार्थांच्या तस्करीत काही दहशतवादी गटही उतरल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. पंजाबला लागलेली ही जखम पाहून दहशतवादी या राज्यातून घुसू लागले आहेत. गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये अशीच घुसखोरी केली होती. त्या वेळी निष्पाप नागरिकांचे हत्याकांड व रेल्वे उडवण्याचे त्यांचे मनसुबे होते. आता भारताच्या लष्करी तळावर हल्ले करत लष्करी विमाने, हेलिकॉप्टर व अन्य यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न होता. मात्र अत्याधुनिक टेहळणी करणाऱ्या साधनांमुळे व दहशतवाद्यांच्या हल्ल्याची पूर्वसूचना भारतीय सुरक्षा दलाला मिळाल्याने पठाणकोट हवाई तळाची मोठी हानी झाली नाही. ती झाली असती तर सरकारचे जगात नाक कापले गेले असते, विरोधकांचे शाब्दिक हल्ले सरकारला सहन करावे लागले असते, संतापग्रस्त जनमताला कसे तोंड द्यायचे याची विवंचना सरकारला करावी लागली असती. त्यात नुकत्याच सुरुवात झालेल्या मैत्री डिप्लोमसीला पुन्हा गटांगळ्या खाव्या लागल्या असत्या. एकंदरीत केवळ लष्कर नव्हे, तर निमलष्करी दलांवरही देशांच्या सीमांचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी पडली आहे. सरकारला या हल्ल्यातून बरेच शिकावे लागेल.