आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा ‘कर’नामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण दाखवलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न पूर्ण करावयाचे असेल तर आज असलेला१७ लाख कोटी रुपयांचा महसूल पुरेसा नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगले माहीत आहे. महसूल म्हणजे करांच्या माध्यमातून सरकारला मिळणारे उत्पन्न. कर किती चांगल्या पद्धतीने घेतले जातात आणि त्याचा विनियोग किती चांगल्या पद्धतीने केला जातो यावर सरकारची कार्यक्षमता मोजली जाते. त्यामुळे स्वीडनसारख्या आणि इतर युरोपीय देशांत करांचे प्रमाण जीडीपीच्या ४० ते ५० टक्के इतके असूनही तेथे लोक आनंदाने कर देतात. भारतासारख्या विकसनशील देशांत हेच प्रमाण १५ टक्क्यांच्या घरात असूनही कर जनतेला जाचक वाटतात हेही पंतप्रधानांना चांगले माहीत आहे. त्यामुळेच करपद्धती सुलभ करण्याचे आश्वासन त्यांनी निवडणुकीत दिले आहे. पण गेली दोन वर्षे त्या दिशेने फार काही झालेले नाही. सरकारी पातळीवर त्याची चर्चा चालू असल्याचे संकेत येतात खरे; पण व्यवहारात त्यातले काही अजून उतरलेले दिसत नाही. कर प्रशासनातील सर्व उच्च अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या राजस्वज्ञान संगमचे उद््घाटन करताना मोदी यांनी भारताच्या या दुखण्यावर बोट ठेवले. त्याचे कारण हे सर्व व्यवहारात उतरण्याची गरज निर्माण झाली हे आहे. भारतीय नागरिक कर भरण्यास तयार आहे, मात्र त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे आणि कर अधिकाऱ्याने त्याचे सल्लागार बनले पाहिजे हे मोदी यांचे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. पण एकीकडे करवसुलीचे उद्दिष्ट वाढवण्याची गरज, दुसरीकडे विविध नावे बदलून घेतले जाणारे किमान ३२ प्रकारचे कर, तिसरीकडे चलनवाढीने परेशान झालेले करदाते, चौथीकडे करांच्या किचकटपणामुळे वाढलेला जाच अशा स्थितीत कर देणारे आणि कर घेणारे यांच्या नात्यात विश्वास कसा निर्माण होणार? हे कमी आहे म्हणून की काय, पण प्रत्यक्ष करांची वसुली होत नाही म्हणून अप्रत्यक्ष करांचे प्रमाण अधिक असलेला आपला देश. यातून मार्ग कसा काढायचा, याच्या अर्ध्या उत्तराचे सूतोवाचही मोदींनी केले. सध्या १३१ कोटींच्या लोकसंख्येत प्रत्यक्ष कर देणारे फक्त ५.४ कोटी नागरिक आहेत. त्यांची संख्या १० कोटी म्हणजे दुप्पट झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. करदाते वाढले पाहिजेत, असे थोडक्यात त्यांना म्हणायचे आहे. पण त्यात नवीन काही नाही. ते कसे वाढतील हे त्यांनी सांगायला हवे होते.
करवसुली हे आपल्या देशात किती मोठे दुखणे आहे हे आता वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. औरंगाबादसारख्या महापालिकेत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आता पोलिसांची मदत घ्यावी लागते आहे आणि केवळ जकात वसुलीसाठी करण्यात आलेल्या छोट्या महापालिकांवर कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी कर्ज काढण्याची नामुष्की आली आहे. देशातील श्रीमंतीचे आकडे एकीकडे फुगत चालले असताना गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा कारभार वर्षानुवर्षे कर्ज काढून चालला आहे. केंद्राकडे येणाऱ्या एक रुपयातील १९ पैसे परकीय कर्ज फेडण्यात जातात. राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची तीच अवस्था आहे. त्यामुळेच कर कोणी आणि किती घ्यायचा याविषयीचे वाद विकोपाला चालले आहेत. प्रचंड गाजावाजा करून येत असलेल्या जीएसटीचे गाडे त्यावरूनच अडले आहे. विशिष्ट कर वसूल केल्याशिवाय सरकारे चालू शकत नसल्याने सर्व खात्यांना उद्दिष्टे दिली जातात आणि त्यानुसार करवसुली केल्याने ‘करांचा दहशतवाद’ तयार झाला आहे, हे विरोधी पक्ष म्हणून भाजपचे म्हणणे होते आणि ते बरोबरच आहे. पण ते बदलण्यासाठी आज तुम्ही काय करत आहात, हा प्रश्न तर विचारला जाणारच. मोदी म्हणतात तसे भारतीय माणूस मुळात खूप चांगला आहे हे तर खरेच आहे. व्यवस्थेने त्याला गांजले आहे. त्यामुळे व्यवस्था चांगली करणे ही आजची खरी गरज आहे. कररचनेच्या बाबतीत व्यवस्था कशी चांगली होईल हे ‘RAPID’ च्या माध्यमातून त्यांनी सांगितले. याचा अर्थ Accountability, Probity, Information and Digitization हे करप्रशासनाचा पाया झाला पाहिजे. प्रत्यक्ष करांत ९२ टक्के हे आगाऊ म्हणजे आपोआप तिजोरीत येऊन पडतात, मग प्राप्तिकर विभागाचे ४२ हwजार अधिकारी-कर्मचारी नेमके काय करतात, असा मार्मिक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भारतात करवसुलीसाठी होणारा अमाप खर्च हा वादाचा विषय आहे. ते होऊन तिजोरी भरली असती तर ते समजण्यासारखे आहे. पण तेही होत नाही. कारण कर भरण्यापेक्षा तो कसा वाचवता येईल याचा विचार भारतीय नागरिक जास्त करताना दिसतात. मोदींनी त्यासाठी गुगलचा आधार का घेतला हे कळण्यास मार्ग नाही. पण सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय ते भेदभावमुक्त, कार्यक्षम आणि प्रभावापासून दूर असे प्रशासन देऊ शकत नाही, यासाठी आता पुराव्यांची गरज राहिलेली नाही.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)