आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस रक्षणाय… (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विघ्नहर्त्या गणरायाचे आज मोठ्या उत्साहात आगमन होत असताना यंदा पाऊसपाणीहीचांगले असल्याने उत्सवाचा आनंद द्विगुणित व्हायला हवा. मात्र, त्याच वेळी सण-उत्सवांच्या काळात ज्यांच्यावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक भार पडत असतो त्या पोलिस यंत्रणेचे मनोधैर्य खच्ची व्हावे अशा अप्रिय घटना सातत्याने घडत असल्याने सर्वांसाठीच ती चिंतेची बाब ठरत आहे. तेव्हा गृह खाते आपल्याच अधिपत्याखाली ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता कोट्यवधी लोकांची सुरक्षितता ज्यांच्या हाती आहे त्या पोलिसांचे मनोबल वाढावे यासाठी सरसावून पुढे यायला हवे.
महाराष्ट्राच्या पोलिस दलाचा एकेकाळी चांगलाच दरारा होता. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेची तुलना तर थेट जगात सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी होत असे. मात्र गेल्या काही वर्षांत हा दबदबा कमी होत असून अलीकडे तर क्षुल्लक कारणांवरून पोलिसांवरच हल्ले होऊ लागले आहेत. आठवडाभरापूर्वी मुंबईत कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी विलास शिंदे यांनी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला अडवून वाहन परवान्याची मागणी केली असता त्याने आपल्या भावासह शिंदे यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. त्यात शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना शहिदाचा दर्जा देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. हा निर्णय शिंदे यांच्या कामगिरीचा गौरव असला तरी येथे मुद्दा संपूर्ण यंत्रणेच्या मनोबलाचा आहे. शिंदे यांच्यानंतर धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सहायक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केला. संगमनेर येथे वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकातील पोलिसांवर गुंडांनी केवळ हल्लाच चढवला असे नाही तर वाळूचा ट्रॅक्टर पकडणाऱ्या पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न केला. पाठोपाठ ठाणे येथे मद्यधुंद अवस्थेत चुकीच्या मार्गाने भरधाव वाहन चालवणाऱ्यास नरसिंग महापुरे या वाहतूक पोलिसाने अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याला जुमानता वाहनचालकाने महापुरे यांनाच जवळपास अर्धा किलोमीटर फरपटत नेले. एकामागोमाग एक घडलेल्या या घटनांमुळे गुंड-पुंड किती शिरजोर झाले आहेत खाकी वर्दीचीही तमा बाळगण्याची बेमुर्वतखोरी त्यांच्यात कशी बळावत चालली आहे तेच स्पष्ट होते. काही मंडळी या वाढत्या हल्ल्यांमागे पोलिसांची बदलती कार्यशैली, हप्तेखोरीचे वाढते प्रमाण, चिरीमिरीची सवय अशी कारणे असल्याचा आक्षेप घेतात. काही अंशी त्यात तथ्य असले तरी उपरोक्त प्रकरणांमध्ये पोलिसांकडे बोट दाखवण्यास वाव नाही. ज्या पोलिसांवर हल्ले झाले आहेत त्यांनी कुणाला मुद्दाम छळण्याचा वा त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असावा, असेही सकृतदर्शनी दिसत नाही. उलट आपली नियमित कामे करणाऱ्या पोलिसांनाच या मस्तवाल मंडळींनी लक्ष्य केले आहे. असेच सुरू राहिले तर पोलिसांना कर्तव्य बजावणेसुद्धा मुश्किल होईल. त्यातून त्यांची मानसिकता खच्ची झाली तर उद्या कुणाच्याच आणि कशाच्याच सुरक्षिततेचा भरवसा राहणार नाही. दुसरीकडे गेल्या वर्षभरातील गुन्हेगारी घटनांची आकडेवारीदेखील महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि मुख्यमंत्र्यांचे नागपूर ही महानगरे देशात पहिल्या दहामध्ये असल्याचे दर्शविते. औरंगाबाद, नाशिक, वसई-विरार यांचाही क्रमांक विशिष्ट स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वरचा आहे. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते असल्याने राज्यातील वाढत्या गुन्हेगारीची आठवण वारंवार करून देऊन विरोधक त्यांना कात्रीत पकडत असतात. त्यामुळे सरकारने विशेषत: मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करायला हव्यात. पंतप्रधान मोदींच्या विकासाचीच री ओढत मुख्यमंत्री त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातली गुंतवणूक वाढावी, उद्योगवृद्धी व्हावी, वाहतूक आणि दळणवळणाचा वेग वाढावा, नवतंत्रज्ञानाला वाव मिळावा यासारख्या विषयांना फडणवीसांचा प्राधान्यक्रम आहे. बदलता काळ आणि नव्या पिढीच्या आकांक्षा पाहता ते योग्यही आहे. पण हे करताना दुसरीकडे जर सुरक्षितता संकटात येत असेल तर सगळेच मुसळ केरात जाईल. जीवित मालमत्तेच्या रक्षणाला राज्यघटनेत प्राधान्यक्रम देण्यामागचा मूळ हेतू लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सध्या हाताबाहेर जाऊ लागलेल्या या मुद्द्याला अग्रक्रम द्यायला हवा. ढासळत्या मानसिकतेमुळे पोलिसच सैरभैर झाले तर भररस्त्यात कायद्याचे धिंडवडे असेच निघत राहतील आणि येत्या सण-उत्सवाच्या पर्वावर आनंदाऐवजी काळजीची काजळी दाटत जाईल. हे टाळायचे असेल तर पोलिसांचे मनोधैर्य उंचावून प्रसंगी त्यांना अधिक मोकळीकही देण्यासारखी पावले मुख्यमंत्र्यांना तातडीने उचलावी लागतील.
बातम्या आणखी आहेत...