आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी सोडले मौन (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सबका साथ-सबका विकास’ असा नारा देत पूर्ण बहुमत घेऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले तेव्हा म्हणजे आठ महिन्यांपूर्वी देशवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि अजूनही भारतीय जनता त्यांच्यावर आशा ठेवून आहे. नरेंद्र मोदी नावाच्या नायकाचा जन्म तर या निवडणुकीतून झालाच; पण त्यांनी सत्तेवर येताच एका सकारात्मक लाटेने देशाला आकर्षित करून घेतले. संसद भवनात प्रवेश करताना त्यांनी तिच्या पायरीचे दर्शन घेतले आणि लोकशाहीप्रति आपल्या मनात असलेला आदर व्यक्त केला. पुढील काही दिवसांतच त्यांनी देशाला अनेक भावनिक आवाहने करून आपण या देशाला वेगळी दिशा देणार आहोत, असे आश्वस्त केले. मोदी तेथेच थांबले नाहीत, तर ज्या अर्थव्यवस्थेवर सर्व काही अवलंबून आहे, त्याविषयी ते सतत बोलत राहिले. एक अर्थतज्ज्ञ असलेले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग बोलतच नव्हते, त्या पार्श्वभूमीवर मोदी इतके चांगले बोलतात, की काही ठोस होताना दिसत नसतानाही शेअर बाजाराचा निर्देशांक चढू लागला आणि एफडीआयमध्येही चैतन्य संचारले. ‘जन-धन’, ‘मेक इन इंडिया’, स्वच्छता मोहीम, कायदे कमी करण्याची गरज व्यक्त करणारी भाषणे, शेजारी देश आणि महासत्तांशी हस्तांदोलन, म्हटले तर नरेंद्र मोदी यांचा पहिल्या आठ महिन्यांत कामाचा प्रचंड झपाटा दिसला. देशात किती आणि काय काय चांगले होऊ शकते, याची मोठी चर्चा दीर्घकाळानंतर सुरू झाली. सारी नकारात्मकता झटकून भारतीय नागरिक विचार करू लागले. पण कोठे माशी शिंकली, माहीत नाही. ज्या धार्मिक सहिष्णुतेसाठी हा देश जगात ओळखला जातो, तीच धोक्यात सापडावी, असे वातावरण देशात तयार झाले. एक प्रकारे ‘सबका साथ- सबका विकास’ या तत्त्वाला धक्का बसतो की काय, असे वाटू लागले. भाजपच्या वर्तुळातील संस्था-संघटनांमधील स्वयंघोषित नेत्यांची मुक्ताफळे सुरू झाली. फुकाची बडबड म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावी, अशीच ही विधाने आहेत; पण भाजप सत्तेवर असल्याने त्याचे संदर्भ बदलले. त्यातून वातावरण दूषित झाले. खरे म्हणजे अशा प्रत्येक विधानावर देशाच्या पंतप्रधानांनीच प्रतिक्रिया दिली पाहिजे, असे नाही. मात्र त्याचे परिणाम लक्षात घेता मोदींनी आपले मौन लगेच सोडण्याची गरज निर्माण झाली. मग पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर मंगळवारी अखेर मोदी बोलले आणि धार्मिक हिंसा सरकार अजिबात सहन करणार नाही, त्यांचा आपण निषेध करतो,धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, सर्व धर्मांचा सारखाच आदर केला जाईल, असे त्यांनी राजधानीत स्पष्ट केले. निवडणूक सभेत बोलताना विकासापुरते बोलून मोदी यांनी बाजी मारली होती, मात्र पंतप्रधान या नात्याने एवढ्या मोठ्या मुद्द्यावर मौन बाळगणे, ही चूकच होती. ती त्यांनी दुरुस्त केली, हे चांगले झाले.

मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केवळ 10 दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारताच्या अर्थकारणाला आकार देणारा असा तो असेल, अशा आशा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सारा देश त्याची आतुरतेने वाट पाहतो आहे. मात्र गेल्या काही महिन्यांतील धार्मिक द्वेष वाढवणाऱ्या विधानांनी देशाचे लक्ष विचलित केले आहे. मोदी यांच्या मौनाने त्यात तेल ओतले गेले आणि ते अधिकच बिघडत गेले. भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपासून सर्वांनाच मग धार्मिक असहिष्णुतेविषयी बोलण्याची संधी मिळाली. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय झाला आणि सर्वात गंभीर म्हणजे देशात घडणाऱ्या सर्वच घटना त्याच्याशी जोडल्या जाऊ लागल्या. देशातील जनतेचा मूड ओळखणाऱ्या नरेंद्र मोदी यांना हे आकलन इतके उशिरा का झाले, हे कळायला मार्ग नाही. ज्या हिंदुत्ववादी संघटनांच्या पाठिंब्यावर ते निवडून आले, त्यांचा त्यावर दबाव असेल किंवा त्यांना ही विधाने तेवढी महत्त्वाची वाटली नसतील. काय झाले असेल, हे कोण सांगणार? मात्र देशाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याची संधी मोदी गमावतात काय, असेच वातावरण गेले काही दिवस तयार झाले होते. त्यामुळे मोदींनी स्वत:साठी, त्यांच्या पक्षासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या देशाच्या एकात्मतेसाठी हे लांबलेले मौन सोडण्याची गरज होती. त्यांनी ते सोडले आणि आपला विकासाचा इरादा पुन्हा स्पष्ट केला, हे फार चांगले झाले.आता असे खोडसाळ नेते आणि समाजविघातक संघटनांवर सरकार कारवाई करून आपण खरोखरच ‘सबका साथ – सबका विकास’ तत्त्वावर ठाम आहोत, हे मोदींनी दाखवून द्यावे.