आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Prime Minister Narendra Modis Tour

अमेरिकेतील अदाकारी! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार' हे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुधा मनात कोरून ठेवले असावे! पंतप्रधान म्हणून त्यांच्या कारकीर्दीला दीड वर्षही पूर्ण झालेले नाही; पण त्या काळात मोदींनी केलेल्या विदेश दौऱ्यांची संख्या जरा जास्तच डोळ्यात भरण्यासारखी आहे. या विदेश दौऱ्यांतून देशाला काय मिळाले हे लगेच कसे कळणार, त्यासाठी काही काळ तर वाट पाहावी लागेलच, असा युक्तिवाद मोदी समर्थक करीत असतात. त्यात काही तथ्यांश असला तरी या विदेश दौऱ्यांचा उपयोग नरेंद्र मोदी यांनी स्वप्रतिमेचे संवर्धन करण्यासाठी चातुर्याने केला आहे. विदेशाटनाने अंगी चातुर्य येते ते नेमके हेच. स्वप्रतिमेचे सारे लोळ-कल्लोळ सोबत घेऊन नरेंद्र मोदी आयर्लंड व अमेरिका या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. यातील आयर्लंड या देशाला १९५६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भेट दिली होती. त्यानंतर त्या देशात जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत हेही आवर्जून सांगितले जात आहे! आयर्लंडमध्ये भारतीयांचा व्यापारक्षेत्रात वाढता प्रभाव आहे. त्याचबरोबर राजनैतिक दृष्टिकोनातून जे देश आजवर महत्त्वाचे मानले गेले नव्हते त्यांना जवळ करणे हा मोदींच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग असून युरोपातील आयर्लंड या छोट्याशा देशातील दौऱ्याकडे त्याच दृष्टीने पाहिले जायला हवे, असे केंद्र सरकारचे मत आहे. मुळात आयर्लंड देशाशी असलेल्या व नसलेल्या संबंधांमुळे भारताला नफा झाला हा संशोधनाचाच विषय आहे. तो देश इतका महत्त्वाचा आहे याचा शोध मोदींव्यतिरिक्त त्यांच्या आधीच्या पंतप्रधानांना (नेहरू यांचा अपवाद) का लागला नाही, हादेखील एक गहन प्रश्न आहे. त्याचे उत्तर मोदींनी आयर्लंडला दिलेल्या भेटीतून मिळेलच.
आयर्लंडनंतर नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट देणार असून तो त्यांच्या या दौऱ्याचा सर्वात मोठा उत्सुकताबिंदू असणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त भरणाऱ्या अामसभेसाठी मोदी अमेरिकेला जाणार आहेत व त्यानंतर त्यांचे अमेरिकेत काही ठिकाणी भेटीगाठीचे औपचारिक कार्यक्रम आहेत. नेमके याच दिवसांत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेच्या दौऱ्यावर येत आहेत. जिनपिंग यांना राजशिष्टाचार म्हणून अमेरिकेकडून २१ तोफांची सलामीही दिली जाईल. त्यामुळे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या दोन्ही देशांचे प्रमुख एकाच वेळी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत या गोष्टीकडे कौतुकाने पाहताना उपरोक्त गोष्टींचे भान ठेवायला पाहिजे. शी जिनपिंग या आठवड्याअखेर आपल्या दौऱ्यामध्ये सिएटलला भेट देतील, तर नरेंद्र मोदी हे सिलिकॉन व्हॅलीला भेट देणार आहेत. अमेरिकेच्या प्रगतीमध्ये तिथे स्थायिक झालेल्या कुशाग्र भारतीय, चिनी अशा अनेक देशांतील नागरिकांचाही सहभाग आहे. आपापल्या देशांतून अमेरिकेत आलेल्या नागरिकांना साद घालण्याचा प्रयत्न शी जिनपिंग व नरेंद्र मोदी आपापल्या भेटींतून करतीलच; परंतु अमेरिकेतही जंगी सभा करण्याचा नरेंद्र मोदींचा उत्साह शी जिनपिंग यांच्यापेक्षा जरा अधिकच आहे! संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहाण्याबरोबरच नरेंद्र मोदी व जिनपिंग या दोघांचा स्वतंत्रपणे अमेरिकेच्या पश्चिम भागात भेटी देण्यावर भर आहे. कारण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर राज्य करणाऱ्या मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन व फेसबुकसारख्या प्रमुख कंपन्यांची मुख्यालये अमेरिकेतल्या याच भागात अाहेत. माहिती तंत्रज्ञानसह अनेक क्षेत्रांमध्ये अमेरिकेकडून भारत व चीन या दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य अपेक्षित आहे. त्यादृष्टीनेच चिनी अध्यक्ष व भारताच्या पंतप्रधानांनी आपल्या दौऱ्यांची आखणी केली आहे. अमेरिका हा एक व्यापारी व भांडवलशाहीप्रधान देश आहे. त्याच्यासाठी ज्या देशाची बाजारपेठ अधिक लाभदायक त्याच्याकडे त्याचे माप अधिक झुकणार. पण त्याचबरोबर आपण समतोल आहोत हे दाखवण्यासाठी अमेरिका दुसऱ्या देशांनाही नेहमी चुचकारते. मोदी यांना अमेरिकेच्या या नीतीची सतत आठवण ठेवावी लागणार आहे. व्यापार, संरक्षण या क्षेत्रामध्ये अमेरिकेची चीनशी जास्त देवाणघेवाण आहे. चीनच्या बाजारपेठेत अमेरिकन कंपन्यांचा माल अधिक खपावा, त्याचप्रमाणे चीनमध्येच आपली औद्योगिक उत्पादने बनवण्यासाठी जास्तीत जास्त सवलती पदरात पाडून घ्याव्यात, असा पवित्रा बराक ओबामा हे शी जिनपिंग यांच्याशी बोलणी करताना घेणार आहेत. चीनला अमेरिकेचे तंत्रज्ञानविषयक सहकार्य पदरात पाडून घेऊन वेगाने प्रगती करायची आहे आणि दस्तुरखुद्द अमेरिकेला मागे टाकायचे आहे. इतकी घाई काही भारताला झालेली नाही! फेसबुकचा संचालक मार्क झुकेरबर्गला नरेंद्र मोदी जेव्हा त्याच्या मुख्यालयात भेटायला जातील तेव्हा ही जाणीवच ते सोबत घेऊन जातील. याच सर्व गोष्टींच्या परिप्रेक्ष्यातून नरेंद्र मोदी यांच्या आयर्लंड-अमेरिका दौऱ्याकडे पाहायला हवे. त्यातील मोदींच्या स्वप्रतिमा संवर्धनाच्या हौसेसकट!