आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळस राजन (संपादकीय)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खडे बोल बहुतेकांना सहन होत नाहीत. भारत तर याबाबत फारच हळवा आहे. अलीकडे हे हळवेपण सर्वच थरांवर अती झाले आहे. मोदी सरकार तर फारच हळवे झालेले दिसते. बहुमतातून येणारा आत्मविश्वास भाजप व संघ परिवारामध्ये अजून आलेला नाही. लहानसहान गोष्टी मनाला फारच लावून घेऊन त्यावर प्रतिक्रिया देत सुटायचे, असा क्रम गेले काही महिने सुरू आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या एका वक्तव्यावरून हाच प्रत्यय आला. भारताच्या विकासदराचे जगात सध्या कौतुक आहे. त्यावर सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. मात्र, जगात सर्वत्र असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर हे कौतुक होत आहे, हे वास्तव सांगितले जात नाही. हे वास्तव सांगण्यासाठी राजन यांनी ‘अंधो में काणा राजा’ ही म्हण वापरली. आता या म्हणीमध्ये अपंगांबद्दल हेटाळणीच्या सूर आहे हे खरे. तथापि अनेक म्हणींमध्ये असा सूर सापडतो. तो दूर केला पाहिजे. मात्र, त्यासाठी नव्या म्हणी बनवाव्या लागतील. ते होईपर्यंत कुणी प्रचलित म्हण वापरत असेल तर त्यावरून रान उठविण्याची गरज नाही. मात्र, जेएनयूमध्ये शिकलेल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना राजन यांचे बोल फारच लागले व त्यांना जरा चांगले शब्द वापरायचा सल्ला दिला. हा सल्ला मैत्री भावनेतून नव्हता, तर खोचक होता. खडे बोल सरकारला अस्वस्थ करतात हे यातून कळते. भारताची प्रगती ठीक होत असली तरी त्यामुळे हुरळून जाऊ नका, कारण जगातील अनेक देश मंदीच्या तडाख्यात सापडल्यामुळे भारताची प्रगती डोळ्यात भरते, हे राजन यांना सांगायचे होते. इतके साधे बोलही सरकारला सहन झाले नाहीत. सीतारामन यांच्याप्रमाणेच अरुण जेटली यांनीही राजन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. याचे कारण स्वत:च निर्माण केलेल्या भ्रमजालात राहण्याचा रोग भारतीय समाजाला लागलेला आहे व सरकार हे जनतेतूनच आलेले असल्यामुळे मंत्र्यांमध्ये त्या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसतो.
अमेरिकेतील आपल्या वक्तव्याचा अधिक खुलासा राजन यांनी पुण्यात केला. प्रगतीने हुरळून जाण्याची अवस्था अद्याप का आलेली नाही, हे त्यांनी तपशीलवार सांगितले. राजन यांचे भाषण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. आपला विकासदर सात साडेसात टक्क्यांपर्यंत गेला असला तरी तो सर्व थरांवर पाझरलेला नाही हे यातील मुख्य वास्तव आहे. विकासदर जोपर्यंत सर्व थरांवर पाझरत नाही तोपर्यंत तो शाश्वत मानता येत नाही. तो टिकाऊ असत नाही. भारताची अर्थव्यवस्था आज जगातील पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आहे हे खरे. पण प्रचंड लोकसंख्येने त्याला भागले की भारताचे सकल घरेलू उत्पन्न फारच तोकडे ठरते. जीडीपीमध्ये आपण फार मागे आहोत. जोपर्यंत जास्तीत जास्त नागरिक संपन्न होत नाहीत तोपर्यंत भारताचा विकास दर स्थिर झाला आहे, असे म्हणता येणार नाही. राजन यांनी चीनचे उदाहरण दिले. तेथील नागरिक आपल्यापेक्षा चौपट श्रीमंत आहे. प्रचंड लोकसंख्या असूनही चीनने औद्योगिक प्रगतीमध्ये मोठी झेप घेतली. त्यामुळे संपत्ती झपाट्याने वाढली. भारतात तसे अद्याप झालेले नाही. चीनप्रमाणे प्रगती होण्यासाठी आजच्याच गतीने सतत वीस वर्षे काम करावे लागेल, असे राजन यांनी सांगितले. बँकर म्हणून मला वास्तववादी राहावे लागते, मी उन्मादी होऊ शकत नाही, असे राजन म्हणाले. सरकारच्या कामावर राजन यांनी टीका केलेली नाही. केंद्र व राज्य सरकार चांगली पायाभरणी करत आहेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी अपेक्षा केली आहे ती सातत्याने काम करत राहण्याची व काम करताना वास्तववादी दृष्टिकोन ठेवण्याची. तथापि, वास्तववादी नसणे हेच तर भारताचे मूळ दुखणे आहे. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भारताकडून भगवान बुद्धांचीही हीच अपेक्षा होती आणि स्वातंत्र्य मिळत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही भ्रमापासून दूर राहण्याचा सल्ला पंडित नेहरू व घटना समितीच्या सदस्यांना दिला होता. भ्रम फक्त विकासाचा होतो असे नव्हे, तर हक्क, स्वातंत्र्य, देशप्रेम, समता, अशा अनेक मूल्यांचाही होतो. विशिष्ट विचारधारेचा भ्रम तर भल्याभल्यांना गुंग करून टाकतो. इतिहासातील अनेक उलथापालथी अशा वेगवेगळ्या भ्रमातून झालेल्या दिसतात. सर्वोच्च आदर्श नेहमीच समोर असावा, पण या मूल्यांबाबत वास्तववादी दृष्टी राहिली नाही तर माणसाचे व समाजाचे नुकसान होते. १९६० पर्यंत आपण चीनच्या पुढे होतो, असे राजन यांनी सांगितले. आता चीनने चौपट उडी घेतली ती कशामुळे? याची कारणे राजन यांनी सांगितली नाहीत. वैचारिक जोखडातून स्वत:ला मोकळे करून वास्तववादी दृष्टी स्वीकारल्यामुळे चीनची भौतिक प्रगती झाली हे मुख्य कारण त्यामागे आहे. वास्तव पाहिल्याने चीन डोळस बनला. तो डोळसपणा राजन यांच्याकडे आहे.