आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडफोडीच्या मर्यादा (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीचे शेक्सपिअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी यांचा पुतळा नदीपात्रात भिरकावून देण्याचा उद्योग उपद््व्यापी लोकांनी पुण्यात केला. आपला संभाजी ब्रिगेडशी संबंध नसल्याचा खुलासा पुतळा भिरकावून देणाऱ्यांनी केला असला तरी त्यांच्या कृतीचे समर्थन संभाजी ब्रिगेडने केले आहे. गडकरींच्या ‘राजसंन्यास’ नाटकातील संभाजी महाराजांच्या चरितलेखनावरून हे तरुण संतप्त झाले. पुतळा हटवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने अशी आततायी कृती करावी लागली, असे ब्रिगेड म्हणते. हे समर्थन पटण्याजोगे नाही. महाराष्ट्रात जी संस्कृती काही पक्षांकडून गेली काही वर्षे रुजविली जात आहे, त्याचा हा परिणाम आहे. भांडारकर संस्थेवरील हल्ला हे त्याचे ठळक उदाहरण. अशा कृत्यांचे उघड समर्थन करणारेही भरपूर होते. याचे राजकीय संदर्भ लक्षात घेतले तर ही घटना आत्ताच का घडली हेही वाचकांच्या लक्षात येईल.

तोडफोडीवरच विश्वास ठेवणाऱ्यांना, राम गणेशांच्या साहित्याची थोरवी सांगून उपयोग नाही. साहित्यकृतीचा संपूर्ण आशय ध्यानी घेऊन आस्वाद घ्यायचा असतो. संवादातील एखाद-दुसरी वाक्ये पाहून प्रतिक्रिया द्यायची नसते. ‘राजसंन्यास’ हे गडकऱ्यांचे अर्धवट लिहिलेले नाटक. त्यातील काही संवाद सुटे वाचले तर खटकल्याशिवाय राहत नाहीत. मात्र अर्धवट स्थितीतील नाटकही पूर्ण वाचले तर संभाजी महाराजांचे भव्य व्यक्तिमत्त्व समोर उभे राहते. अजरामर शोकांतिका लिहिण्यासाठी चरितनायकाचे व्यक्तिमत्त्वही तितकेच भव्य असावे लागते. किरकोळ व्यक्तींच्या आयुष्यातील ताणेबाणे वा दु:खातून शोकांतिका निर्माण होत नाहीत. शिवाजी महाराजांचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेऊ शकलो नाही, तितक्या क्षमता अंगी असूनही स्वभावदौर्बल्यामुळे चुका झाल्या या जाणिवेतून संभाजी महाराजांना झालेला शोक, हा ‘राजसंन्यास’चा गाभा आहे. यात संभाजी महाराजांची थोरवी आहे, म्हणूनच त्यांचे अपयश मनाला चटका लावते. राम गणेश हे इतिहासकार नव्हते. इतिहासातील एखादी घटना त्यांच्या मनाची पकड घेई. त्यांची प्रतिभा इतकी अनावर होती की घटनेच्या तपशिलात न जाता त्या घटनेवर त्यांची प्रतिभा स्वार होऊन नाट्य आकार घेऊ लागे.

प्रतिभावान साहित्यिकाकडून असे नेहमी होते. शेक्सपिअरचे अनेक तपशील चुकलेले आहेत. शेक्सपिअरने निर्माण केलेल्या शायलॉक या पात्राने सर्व ज्यूंना बदनाम करून टाकले. आज जगावर ज्यू जमातीची अप्रत्यक्ष सत्ता आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था, तेथील विश्वविद्यालये, अक्षरश: ज्यूंच्या हाती आहेत. मात्र तरीही शेक्सपिअरचे पुतळे फोडण्याचे वा शेक्सपिअरच्या वाङ््मयातून ज्यूंची बदनामी हटवण्याचे उद्योग, हाती प्रचंड पैसा व सत्ता असूनही, ज्यू नेत्यांनी कधीही केले नाहीत. याचे कारण साहित्याकडे कसे पाहावे हे ज्यू जमातीला कळले आहे. तसे शिक्षण येथे कधीच दिले गेले नाही. उलट जात, धर्म, पंथ यांचे चश्मे लावून साहित्याची विचारपूस करण्याची परंपरा काही गटांनी जोपासली. आजचे तरुण त्याला बळी पडले तर त्यांना दोष देता येणार नाही.

तेव्हा साहित्यिक अंगाने प्रबोधन वा वैचारिक वादविवाद या मार्गाने तोडफोडीच्या संस्कृतीला बदलता येणार नाही. राजकारण साधणे हा तोडफोड संस्कृतीचा उद्देश आहे. तोडफोडीच्या मार्गातून हे राजकारण साधण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत हे त्यांनी समजून घेतले तर कदाचित ते बदलतील. अस्मितेच्या नावाखाली इतिहास उकरून, जातीपातींना एकमेकांविरुद्ध उभे करून मतांची बेगमी करण्याचे दिवस आता संपले. आजच्या समाजाच्या आशाआकांक्षा वेगळ्या आहेत. जगातील स्पर्धा समाजाने ओळखली आहे. शिक्षण व तंत्रज्ञान ही यशस्वी होण्याची हत्यारे आहेत हे समाजाच्या लक्षात आले आहे. मराठा मोर्चातील तरुणांची मुख्य मागणी शिक्षणातील आरक्षणाची होती, नोकरीतील नव्हे. मागचे हिशेब चुकवण्यात वेळ दवडण्यापेक्षा उद्याच्या स्पर्धेसाठी स्वत:ला तयार करण्याकडे आजच्या पिढीचा कल आहे. जे नेते आजच्या काळाची, विकासाची भाषा बोलतात, त्यांना लोक साथ देत आहेत.

तोडफोडीला लोकांनी कधीही साथ दिली नाही. अन्यथा बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपला  सहज सत्ता मिळाली असती. तसे झाले नाही. वाजपेयी व मोदींनी, बाबरीची नव्हे, तर विकासाची भाषा करून सत्ता मिळवली. दंगलीपेक्षाही कार्यक्षम कारभाराचा अधिक फायदा मोदींना झाला. देवेंंद्र फडणवीसांच्या विरोधात जातीचे राजकारण चालवण्याची बरीच चाचपणी सुरू होती. पण ते राजकारण लोकांनी नाकारले व पालिका निवडणुकीत फडणवीसांना सर्वाधिक जागा मिळाल्या. कदाचित यामुळेच, अन्य सर्व बुद्धिवंत गप्प बसले असताना, पुण्यातील घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेसने त्वरित केला व राम गणेशांचा पुतळा पुन्हा उभारण्याचा ठरावही महापालिकेत एकमताने मंजूर केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे शहाणपण संभाजी ब्रिगेडने शिकून घ्यावे. त्यात त्यांचे राजकीय हित आहे.
बातम्या आणखी आहेत...