आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंचा दांडपट्टा (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावसाहेब दानवे हे त्यांच्या अघळपघळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मराठवाडी बोलीभाषेतल्या बेफिकीर वक्तृत्वाने आपण हास्याची कारंजी उडवतो याचेच बहुधा त्यांना फार कौतुक. अलीकडेच त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून बेताल वक्तव्य केले व आता तुरीवरून त्यांच्याच नकळत पुन्हा कैचीत सापडले. पक्षाध्यक्ष असल्यामुळे दानवे स्वत:बरोबर पक्षालाही पेचात टाकतात. असल्या वक्तव्यांमुळे राज्य आणि देशाची सत्ता असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही दानवेंना राजकीयदृष्ट्या कोणी गांभीर्याने घेत नाही. पक्षाची सूत्रे दानवेंकडे असताना त्यांच्या पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धमाकेदार यश मिळवले आहे. पण त्याचे श्रेय मिळाले मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली मेहनत लोकांच्या लक्षात येत होती. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याने विश्वासार्हता कमावली आहे. निवडणुकीत मिळालेल्या या यशाची बेगमी करून ते टोलेजंग करण्याची जबाबदारी पक्षाध्यक्षांवर येते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला वैतागून जवळ आलेला शेतकरी आपलासा करण्याचे काम पक्षाध्यक्षांचे. कारण ते ग्रामीण भागातून आलेले. पण दानवे इथेच कमी पडले. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नको ते बोलून गेले. 

दानवेंकडून शब्द निसटला, सोशल मीडियाने तो पकडला आणि चित्रवाहिन्यांनी ठिणगीचा वणवा केला. दानवेंचे भाषण शांतपणे ऐकले तर त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून शेरेबाजी केलेली नाही हे लक्षात येईल. ‘रडे’ हा शब्द त्यांनी वापरला आहे तो कार्यकर्त्यांना उद्देशून. तुरीबाबतची सर्व आश्वासने राज्य सरकारने पुरी केली असताना रडत न बसता सरकारची कामे पोहोचवा, असे दानवेंंना म्हणायचे होते. ही त्यांची भावना बरोबर असली तरी मुळात जाहीर समारंभात प्रत्येक शब्द मोजून मापून वापरणे आवश्यक असते. अर्थात शब्दाबाबतच्या या जबाबदारीची जाणीव सरसंघचालकांनाच नसेल तर दानवेंकडून तरी काय अपेक्षा करणार? आरक्षणावर कसे व कधी बोलायचे याचे भान सरसंघचालकांना राहात नसेल तर पक्षाध्यक्षांना फार दोष देता येणार नाही. दानवे यांनी याबाबत अमित  शहा यांची शिकवणी जरूर घ्यावी. यशस्वी पक्षाध्यक्ष असूनही त्यांच्या तोंडून कधी वाकडा शब्द बाहेर पडत नाही वा त्यांची कार्यकर्त्यांशी होत असलेली संभाषणे व्हायरल होत नाहीत. 

‘दक्ष’ हा संघाचा आवडता शब्द; पण शब्दांची दक्षता मोजकेच नेते घेतात व बाकीचे अर्थाचा अनर्थ करून टाकतात. दानवेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या, पण आता शेतकऱ्यांकडे बोट दाखविणाऱ्या वक्तव्याचे विरोधकांकडून राजकीय भांडवल होणे साहजिकच आहे. शेटजी-भटजींचा पक्ष शेतकऱ्यांची मते मिळवू लागल्याने मागील सत्ताधाऱ्यांत व त्यांच्या भाटांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून बाहेर पडायला अशी वक्तव्ये उपयोगी पडतात. अर्थात खुद्द रावसाहेबांनीच आता माफी मागितल्यामुळे ते शेतकऱ्यांना उद्देशून बोलले का हा काथ्याकूट करण्यात अर्थ नाही. दानवेंना कैचीत पकडण्यात प्रथम माध्यमे व पाठोपाठ विरोधक यशस्वी ठरले आहेत व त्याला दानवेच जबाबदार आहेत.

राज्यात आजपर्यंत झाले नव्हते इतके अफाट तूर उत्पादन झाले. त्यानंतर राज्य सरकारने तितकीच अभूतपूर्व तूर खरेदी केली. दानवेंचा हा दावा रास्त होता; पण कार्यकर्त्यांची समजूत अधिक चांगल्या शब्दांनी घालता आली असती. केंद्राचे निकष बदलून घेण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाल्याने अखेरचा दाणा शिल्लक असेपर्यंत तूर खरेदी होणार असल्याचे दानवे सांगू शकले असते. व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या संभाव्य घोटाळ्यावर कार्यकर्त्यांनी नजर ठेवण्याची सूचना ते कार्यकर्त्यांना करू शकले असते. बारदाना, गोदामांच्या कमतरतेमुळे येत्या पावसाळ्यात तूर भिजण्याचा धोका आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे तुरीला पाय फुटू शकतात. यासंदर्भात कार्यकर्त्यांना संघीय पद्धतीने ते मार्गदर्शन करू शकले असते. 

कृषिमंत्री, पणनमंत्री आणि प्रशासन यांच्या गैरव्यवस्थापनामुळे तूरकोंडी झाली. यातून मार्ग काढण्यात मुख्यमंत्री जरा कुठे यशस्वी होत असतानाच दानवेंनी ते यश मातीमोल केले. विरोधकांची विश्वासार्हता धुळीस मिळाल्यामुळे शेतकरी भाजपकडे वळला आहे. तो भाजपचा हक्काचा मतदार झालेला नाही. त्याआधीच दानवेंनी ‘शेतकरीविरोधी सरकार’ हा रोष वाढवण्याची आयती संधी विरोधकांना मिळवून दिली. 

शब्दांच्या जखमा किती खोलवर रुततात आणि महाराष्ट्रातला शेतकरी लक्षात ठेवून कसे रडवतो,याचा धडा दानवेंनी अजित पवारांकडून घेतलेला दिसत नाही. दानवेंच्या दिलगिरीवर समाधानी न होता भाजप नेतृत्त्वाने त्यांना योग्य समज द्यायला हवी. शहरी तोंडावळ्याचा भाजप आता कुठे ग्रामीण भागात, शेतकऱ्यांमध्ये रुजू लागला असताना त्यावर दानवेंनी नांगर फिरवला. या नांगरटीचे व्रण पुसण्यासाठी भाजपला कसोशीने प्रयत्न करावे लागतील. 
बातम्या आणखी आहेत...