आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या राजकारणातील सरळ माणूस... (विशेष संपादकीय)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक काळ असा होता की तळागाळात रुजलेल्या काँग्रेसच्या तत्त्वज्ञानातून हजारो कार्यकर्त्यांसह समाजाला विकासाच्या प्रकाशाकडे नेणारे नेतृत्वही जन्मास येत असे. काही नेतृत्व असे आकारास यायचे की, ते पक्षश्रेष्ठींच्या मर्जीपेक्षा सामाजिक अभिसरणातून, लोकदबावातून पुढे यायचे. आर. आर. उर्फ आबा पाटील हे लोकदबावातून राज्याच्या राजकारणात पुढे आलेले नेतृत्व होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असले तरी त्यांचा मूळचा पिंड काँग्रेसी होता. जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्रिपद असा त्यांचा राजकीय प्रवास इतका खाचखळग्याचा होता की, एखादा नेता विरोधकांशी लढता लढता मध्येच गळून पडला असता. पण आबा या संघर्षात टिकून राहिले. ते मुळात चिवट होते. राजकारण्याच्या अंगात असणारी संघर्ष वृत्ती, संयमी वृत्ती त्यांच्यात होती.
त्यांना बदलत्या समाजाचे भान होते. सामाजिक प्रश्नांशी भिडण्याची त्यांची तयारी होती. एकदा समाजाने नेतृत्वाची दोरी हातात दिल्यास कुणाला पटो ना पटो, नेत्याला व्यवस्थेला न जुमानता निर्णय घ्यावे लागतात. आबा यांचे स्वच्छता अभियान, तंटामुक्ती गाव, नक्षलवाद, डान्सबार बंदीबाबत घेतलेले निर्णय प्रस्थापितांना धक्का देणारे होते, पण ते लोकप्रियही होते. ही लोकप्रियता त्यांनी आपल्या साधेपणा, प्रामाणिक वर्तनातून, सचोटीतून मिळवली होती. लोकांना ते आपलेसे वाटायचे. हीच आपुलकी किंवा विश्वास त्यांनी ग्रामविकासासारख्या आव्हानात्मक कार्यक्रमात कामी आणला. जाती व्यवस्थेत विखुरलेल्या समाजाच्या धारणा बदलणे शत्रुत्व स्वीकारण्यासारखे असते. पण आबांनी हे शत्रुत्व स्वीकारून नेटाने स्वच्छता कार्यक्रम राज्यात राबवला. समाज उन्नतीचा मार्ग चारित्र्यसंपन्न नागरिक घडवण्याअगोदर सार्वजनिक स्वच्छतेतून जातो हे गाडगेबाबांचे तत्वज्ञान महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्यांना कळले नाही पण ते आबांनी प्रत्यक्ष राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा डान्सबार बंदीचा निर्णय मानवाधिकारांच्या चौकटीत वादग्रस्तच असला तरी संपूर्ण विधानसभेला आपल्या निर्णयाकडे वळवण्याची त्यांची किमया वादातीत होती. राज्याच्या गृहमंत्रीपदी असताना २६/११ घटनेवरून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया जरी चुकीची असली व त्याचे प्रायश्चित त्यांना घ्यावे लागले असले तरी पोलिसांच्या प्रश्नांविषयी संवेदना ठेवणारा हा नेता होता. नक्षलवाद, सावकारी प्रथा या प्रश्नांना भिडणारे ते एकमेव नेते होते. त्यांचा निधनाने महाराष्ट्राने सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता गमावला आहे. दिव्य मराठी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…