आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबनीसांची माघार आणि...(अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यायमूर्ती रानडे यांनी पुढाकार घेत ग्रंथकारांना एकत्र करायला सुरुवात केली, या घटनेस आता १३८ वर्षे उलटून गेली. मराठी साहित्यिकांच्या या वार्षिक मेळाव्यास ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' असे भारदस्त नामाभिधान कालौघात प्राप्त झाले. यंदाच्या मकरसंक्रांतीला ८९ व्या संमेलनास प्रारंभ झालेला असेल. भाषेच्या निमित्ताने दीर्घकाळ जपली गेलेली अशी परंपरा भारतात विरळ आहे. साहजिकच मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्यांना या संमेलनाचे कुतूहल असते. तीन-चार दिवसांच्या संमेलनासाठी लाखो मराठीप्रेमी जमतात. मराठी साहित्य ऐकतात, चर्चा करतात. लाखो रुपयांची उलाढाल होते. वाचकांना भेटण्याची संधी मिळत असल्याने लेखक वर्गही खुश असतो. संवाद होतो. भेटीगाठी घडतात. संमेलनाचे एकूण स्वरूप उत्सवी थाटाचे असते. सुगी झाल्यानंतर गावोगाव यात्रा-जत्रा आणि उरुसांना बहर येतो. तशी मराठी भाषेची यात्रा-जत्रा म्हणजे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. तिथे हौशे, नवशे आणि गवशांची गर्दी होते. या ठिकाणी फार काही दिव्य, क्रांतिकारक घडण्याची अपेक्षाच फोल असते. तरीही संमेलनाचे पडघम वाजू लागले की चर्चा-वाद यांना ऊत येतो. ‘संमेलनाध्यक्ष' निवडण्याच्या प्रक्रियेपासून याची सुरुवात होते. मराठीचा उत्सव मानल्या गेलेल्या संमेलनाच्या अध्यक्षाची निवड जेमतेम मंडळी करतात. मुळात निवडणूक का व्हावी हा प्रश्न जसा अनेक वर्षे अनुत्तरित आहे तसाच निवडणुकीला कोणी उभारावे याचेही काही ताळतंत्र नाही. ही वस्तुस्थिती माहिती असूनही संमेलननामक चार दिवसीय सोहळा आणि औपचारिक प्रमुख म्हणून निवडून येणारा ‘संमेलनाध्यक्ष' यांना अवास्तव महत्त्व प्राप्त होते. आपण फारच विद्वान विचारवंत, प्रतिभावंत वगैरे असल्याने काळानेच आपल्यावर ‘संमेलनाध्यक्ष' ही जबाबदारी सोपविली असल्याचा साक्षात्कार नियोजित अध्यक्षांना होऊ लागतो. बापुड्या मराठीजनांना शहाणे करून सोडण्याच्या उदात्त हेतूने मग ते मंगळावरील संभाव्य मानवी वस्तीपासून ते तंबाखूची शेती कशी करावी येथपर्यंत आणि देशाच्या परराष्ट्र धोरणापासून जिलेबीसाठी एकतारी पाक कसा तयार करावा येथपर्यंतच्या कोणत्याही विषयावर मार्गदर्शन करू लागतात. समस्त मराठीजनांना दीपवून टाकण्याची ऊर्मी अध्यक्ष महोदयांना गप्प बसवत नाही. नेमक्या याच धांदलीत ते असे काही बोलून जातात की त्यांची पुरती शोभा होते.

सांप्रतकाळचे नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे असेच काहीसे झाले आहे. प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची शीर्षके यावरूनच जर थोरपण सिद्ध झाले असते तर मग कदाचित सबनीसांना आतापर्यंत चार-दोन अध्यक्षपदे मिळून गेली असती. मात्र, संमेलनाध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कोण बुवा हे सबनीस, हा प्रश्न बहुतांश मराठीजनांना पडला. अर्थात यापूर्वीच्या अनेक अध्यक्षांच्या बाबतीतही हेच घडले आहे. अशा वेळी आपला वकूब ओळखण्याचा सूज्ञपणा सबनीस दाखवू शकले असते. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रत्येकवेळी व्यासंगी सारस्वत मिळू शकत नाही, हे वास्तव मराठीप्रेमींनीही मान्य केलेले आहे. अध्यक्षांना ऐकण्यासाठी-भेटण्यासाठी संमेलनांना गर्दी होत नसते. सबनीसांना याचा विसर पडला आणि प्राध्यापकी आवेशात त्यांनी जाईल तिथे श्रोत्यांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली. त्यात ते देशाच्या पंतप्रधानांवर घसरले. पंतप्रधानांच्या लाहोर भेटीनंतर झालेल्या पठाणकोट हल्ल्यामुळे सबनीसांनी पंतप्रधानांबद्दल व्यक्त केलेली भीती योग्यच ठरली. पण मुद्दा होता तो कोणी, कुठे, कशाकरिता आणि कोणते शब्द वापरावेत याचा. मोदींचा एकेरी उल्लेख करून सबनीसांनी केलेल्या औचित्यभंगानंतर ग्रंथप्रेमी म्हणवून माध्यमांनी जो थिल्लरपणा दाखवला तो माध्यमांची इयत्ता दाखवणारा होता. काही वृत्तपत्रांचे रकाने आणि काही ‘चॅनेलां'च्या पडद्यांनी या क्षुल्लक औचित्यभंगालासाहित्यिक वादाचे स्वरुप दिले. त्यानंतर ‘पक्षश्रेष्ठीं'च्या नजरेत येण्यासाठी भाजप खासदारांनी दाखवलेली निर्बुद्धता तितकीच थिल्लर होती. स्वागताध्यक्षांनी कान टोचल्यावर सबनीसांनी एक पाऊल मागे हटत दिलगिरी व्यक्त केलीे. ‘वाद घालणे' हे अस्सल मऱ्हाटमोळे लक्षण आहे, परंतु या वादातून विचारांचे नवनीत बाहेर पडणार असेल तर त्याला अर्थ आहे.क्षुल्लक टिपण्यांवर वाद रंगू लागले तर त्यातून एकूण मराठी साहित्यविश्वाची कच्ची गुणवत्ता सिद्ध होते. याचे भान ना संमेलनाध्यक्षांना राहिले, ना त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना. आता तरी शहाणपणा दाखवून सबनीसांनी त्यांच्याकडील वैचारिक साहित्यिक ठेवा (?) संमेलनात उच्चारला तर महाराष्ट्र त्याचे स्वागतच करील. दिवाळीला सण म्हणतात तसाच शिमगा हाही सणच असतो. फरक इतकाच की दिवाळीच्या पणत्या घराघरात तेवतात. शिमग्याची बोंबाबोंब रस्त्यावर होते. संमेलनात साहित्याच्या पणत्या लागाव्यात. बोंबाबोंब होऊ नये. संमेलने करमणूकप्रधान झालीच आहेत, तेथे शिमग्याचे वातावरण नसावे. विचार एकवेळ नसले तरी चालतील, विवेकाला सोडचिठ्ठी नसावी. इतकीच अपेक्षा.
बातम्या आणखी आहेत...