आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Sahitya Sammelan In Dainik Divya Marathi

सबनीसांचे संवादपर्व (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या साहित्यबाह्य वक्तव्यांनी उडालेला धुरळासंमेलनापूर्वी खाली बसला. पहिल्या दिवशीचे संमेलनाध्यक्षांचे भाषण महाराष्ट्राला दिशादर्शन करणारे ठरले. संमेलनापूर्वीच ओढवून घेतलेल्या अनाठायी वादाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सबनीसांनी ही संधी साधण्यात बऱ्यापैकी यश मिळवल्याचे दिसते. शाहू-फुले-आंबेडकर या जयघोषात पुरोगामित्वाची झूल पांघरून बसलेल्या महाराष्ट्राचे अंतरंग किती भेसूर आहे, याचा स्पष्ट लेखाजोखा सबनीसांनी मांडला. जात, धर्म, आर्थिक विषमता आणि बेरोजगारीच्या घावांमुळे "मऱ्हाटी संस्कृती'च्या चिरफळ्या उडत असल्याची वस्तुस्थिती खरे तर प्रत्येक जण जाणून आहे. परंतु त्याचा उघडपणे उच्चार करण्याचे धाडस क्वचित दाखवले जाते. प्रतिमा जपण्याच्या अट्टहासातून किंवा राजकीय बनचुकेपणातून सावरत बोलण्याची सावध सवय बोटचेप्या बुद्धिजीवींना आणि स्वतःपुरते सुख शोधणाऱ्या समाजाला लागलेली आहे.

अकबर-बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे आपली रेष मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेष लहान करून उपयोग होत नसतो. तरीही अनेकदा घडते ते हेच. इतिहासातले संदर्भ विद्वेष पसरवण्यासाठी वापरले जातात. मानदंडाचे राजकारण करून महापुरुषांची आणि संतांची वाटणी करण्याचे धंदे राजरोसपणे सुरू असतात. अस्मितांचे रूपांतर केव्हाच अहंकाराच्या ठसठसत्या गळूत झाले आहे. अशा वेळी संवादी सुरांची मैफल जमवणाऱ्या विवेकाचे दर्शन समाजाला करून देण्याची जबाबदारी कोण पेलणार? अर्थातच साहित्यिक. संकुचितपणाच्या डबक्यात विभागला जाणारा महाराष्ट्र एकत्र येणार का, याची चिंता संमेलनाच्या व्यासपीठावरून सामूहिकपणे व्यक्त झाली, हा योगायोग नव्हता. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, सबनीस आणि डॉ. सदानंद मोरे या सर्वांना ग्यानबा-तुकोबाचे दाखले द्यावेसे वाटले कारण वेगवेगळ्या कारणांवरून ठसठसणारा विद्वेष हे होय. स्थिती हाताबाहेर गेली नसली तरी काळजी करण्यासारखी नक्कीच आहे. अशा वेळीच अंजन घालणे आवश्यक असते. संमेलनाच्या व्यासपीठावरून सबनीसांनी ते केले. मराठी संस्कृतीच्या मानदंडांच्या स्वतंत्र अस्मिता अधोरेखित करण्याऐवजी मानवी जीवनासंदर्भातील भौतिक आव्हाने पेलण्यासाठी काही निकष ठरवून हा प्रश्न विवेकाने सोडवता येईल का, अशी विचारणा सबनीसांनी केली. सगळे महापुरुष एकत्र केल्यानंतरही मानवी जीवनातील दुःख कायमच असते. हे सत्य असेल तर मग गांधी-आंबेडकर, टिळक-शाहू, ज्ञानेश्वर-तुकाराम, सावरकर-आगरकर अशा वेगवेगळ्या काळातील, भिन्न परिस्थितीत सिद्ध झालेल्या महापुरुषांच्या कर्तृत्वाची संवादी बेरीज करायची की त्यांना वादाचे आणि विद्वेषाचे हत्यार म्हणून वापरायचे, याचा विचार महाराष्ट्र करणार की नाही, हा सबनीसांचा रोकडा सवाल आहे. जातीय-धार्मिक दोष आणि द्वेष कुरवाळण्याचे धंदे बंद करण्यासाठी विवेकी राष्ट्रवाद हवा असतो. एकमेकांच्या विरोधात उभ्या वैचारिक प्रवाहांमधल्या समानतेच्या जागा शोधून संवादपर्व सुरू करावे लागते. सबनीसांनी यावरच भर दिला.

संमेलनात तरुणाई बहुसंख्येने होती. दोन वर्षांपूर्वीच्या केंद्रातल्या एेतिहासिक सत्तांतरामागेही हीच तरुणाई होती. या तरुणाईला विकासाभिमुख, उदार, सर्वसमावेशक जीवनशैलीचे आकर्षण आहे. इंग्रजी शिक्षण घेणारी ही तरुणाई मायमराठीच्या उत्सवाला आवर्जून येते, तेव्हा या त्यांना हे संवादपर्वच अपेक्षित असते. जागतिकीकरणाच्या रेट्याची चर्चा संमेलनात झाली. परंतु याच जागतिकीकरणाने कुठल्या तरी खुर्द-बुद्रूकमधल्या मुलामुलींना न्यूयॉर्क-टोकियोची जीवनशैली मिळवून दिली आहे. या सर्वाचे भान मराठी साहित्य विश्वाला हव्या ती गतीने आलेले नाही. भेदाचे, द्वेषाचे पारंपरिक अभिनिवेश गळून पडत असताना मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांमधून मात्र तीच ती बुरसटलेली प्रतीके, त्याच त्या विद्वेषाच्या जागा, तुलनांच्या जीर्ण उपमा उमटणार असतील तर त्याच्याशी आजची तरुणाई "कनेक्ट' होऊ शकणार नाही. सोशल मीडियावरून जगाचा धांडोळा घेणाऱ्या तरुणाईला मराठी साहित्याकडून संवादपर्वाचीच अपेक्षा असावी. सबनीसांच्या भाषणाला तरुणाईकडून उत्स्फूर्त टाळ्या मिळाल्या त्या बहुधा याचमुळे. "कोण सबनीस' येथपासूनचा प्रवास "वा...सबनीस' येथे येऊन थांबला. सबनीसांची प्रतिमा आणि व्यक्तिमत्त्वातल्या मर्यादा पाहता हा परिणाम दीर्घकाळ टिकण्याची शक्यता कमी आहे. मात्र यामुळे त्यांनी धाडसाने मांडलेल्या मुद्द्यांचे महत्त्व कमी होत नाही. एक जातीयवाद दुसऱ्या जातीयवादाला निर्दोष ठरवू शकत नाही. पुरोगामी-प्रतिगामी या दोन्ही परंपरांमध्ये सत्याचा अपलाप आहे, याचा विचार महाराष्ट्राला करावा लागेल.