बॅडमिंटनमधील विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या सायना नेहवालचे विजेतेपद थोडक्यात हुकले. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनने हा किताब पटकावला.
काही दिवसांपूर्वी सायनाचे ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्नही मरिनने यंदा साकारू दिले नव्हते. आता बॅडमिंटनच्या विश्वविजेतेपदाचा सरताज डोक्यावर मिरवण्याचे सायनाचे मनसुबेही कॅरोलिनाने उधळून लावले. गेल्या दोन महत्त्वाच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत कॅरोलिनाने सायनाला हरवले. मात्र या पराभवानंतरही सायनाच्या कर्तृत्वाची उंची कमी होत नाही. ती विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला आहे हे विसरता कामा नये. १९७७ पासून जागतिक बॅडमिंटन स्पर्धा सुरू झाली होती व आजतागायत एकाही भारतीय खेळाडूने अंतिम फेरीपर्यंत धडक मारलेली नव्हती. प्रकाश पदुकोण यांनी १९८३ मध्ये कांस्यपदक मिळवले होते. त्यानंतर २०११ मध्ये ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा या जोडगोळीने कांस्य व नंतर पी. व्ही. सिंधू हिने गेली दोन वर्षे सलग कांस्यपदक मिळवले होते. पण एकेरीतील सायनाची अंतिम फेरीपर्यंतची झेप विलक्षण होती. खेळातील सातत्य व आत्मविश्वास हे सायनाच्या खेळाचे अंगभूत लक्षण आहे ते या स्पर्धेत दिसून आले. खरे तर कॅरोलिनाला प्रदीर्घ रॅलीज करून सायनाने थकवले होते.
कॅरोलिना सतत धापा टाकताना दिसत होती. स्वत:च्या रॅकेटवर ती राग व्यक्त करीत होती. पण दुसऱ्या गेममध्ये ५ गुणांची आघाडी सायनाला विजयात परावर्तित करता आली नाही. तिने त्या आघाडीनंतर पाच ‘निगेटिव्ह’ गुण दिले आणि तिसऱ्या गेममध्ये थकलेल्या कॅरोलिनाला खेचण्याची संधी गमावली. कॅरोलिनाला सायनाच्या दीर्घकाळ चाललेल्या रॅलीज खेळताना त्रास होत होता. पण नंतर उंच असलेल्या कॅरोलिनाने सायनाच्या अंगावर ‘शटल कॉक’ सतत मारण्याचे तंत्र अवलंबले. अंगावरचे फटके सायनाला परतवताना त्रास होत होता. खरे तर कॅरोलिनाला आधीच्या फेरीत हरवण्याची नामी संधी पी. व्ही. सिंधूने गमावली. नाही तर अंतिम फेरीत यंदा दोन्ही भारतीय महिला खेळताना पाहावयास मिळाल्या असत्या व एक नवा इतिहास लिहिला गेला असता. या स्पर्धेच्या निमित्ताने एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की, बलाढ्य अशा चिनी बॅडमिंटनपटूंना पराभूत करता येते हे सायनाने दाखवून दिले. तिच्या या विजयामुळे आता इतर देशांनाही चीनच्या खेळाडूंना हरवण्याचे बळ मिळाले आहे. सायनाने विश्व अजिंक्यपद स्पर्धेतही चीनच्या खेळाडूंना नमवले होते. सायनाच्या पराक्रमामुळे विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील भारताच्या पदकांची संख्या पाच झाली आहे. या स्पर्धेमुळे जागतिक बॅडमिंटनमध्ये चीन, मलेशिया, कोरिया, जपान आणि युरोप यांच्या बरोबरीने भारतदेखील एक जबरदस्त आव्हान म्हणून पुढे येत आहे हे दिसून आले. सायना नेहवालने महिला बॅडमिंटनची पताका फडकावण्याचे काम सुरू केले तेव्हा तिच्या या मोहिमेत आता पी. व्ही. सिंधूदेखील सामील झाली आहे. ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांची दुहेरीची जोडी जगातील कोणत्याही स्पर्धकांसाठी आव्हान आहे.
भारतात बॅडमिंटनला मिळणारी प्रसिद्धी व या खेळाचा प्रसार तसा मर्यादित आहे. पण गेल्या काही वर्षांत देशात, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू तयार झाले आहेत हे मानायला पाहिजे. फक्त महिला विभागातच नव्हे, तर पुरुषांमध्येही भारतीय खेळाडू एक ‘फोर्स’ म्हणून उदयाला येत आहेत. श्रीकांत, कश्यप, साईप्रणीत ही नावे जगातील बॅडमिंटन खेळाडूंना धडकी भरवत आहेत. विश्व अजिंक्यपद पटकावणाऱ्या पुरुष गटाच्या विजेत्या चेन लाँगला भारताच्या कश्यपने दोन महिन्यांपूर्वीच मलेशियात झालेल्या स्पर्धेत हरवले होते. भारतीय बॅडमिंटन संघ अशा जागतिक दर्जाच्या खेळाडूंनी समृद्ध होत असताना दुसरी फळीही तयार होत आहे. तन्वी लाडसारखी महाराष्ट्राची खेळाडू जोमात पुढे येत आहे. भारतीय बॅडमिंटन संघटना आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आपापल्या परीने खेळाडूंना स्पर्धेच्या व सरावाच्या अनेक संधी उपलब्ध करून देत आहेत. यंदापासून महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने प्रत्येक आठवड्याअखेरीस ‘वीक एंड’ स्पर्धा ज्युनियर व नवोदितांसाठी सुरू केली आहे. या स्पर्धेमुळे अनेक होतकरू खेळाडूंना सरावाची व आपले कौशल्य आजमावण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पुरस्कर्त्यांच्या आडमुठेपणामुळे जगातील बॅडमिंटन खेळाडूंना आकर्षित केलेली इंडियन बॅडमिंटन लीग थांबली असली तरी यंदापासून कोणत्याही आयोजकाला ही स्पर्धा न देता स्वत:च आयोजित करण्याची योजना भारतीय बॅडमिंटन संघटनेने आखली आहे. क्रिकेट, कबड्डी, हॉकी, फुटबॉलप्रमाणे बॅडमिंटन या खेळालाही परदेशातील दर्जेदार खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या स्पर्धा, लीग यांचा फायदा होणार आहे. सायनाने भारतीय बॅडमिंटनला जागतिक स्तरावरील यशाचे पहिले पाऊल टाकून दिले आहे. ही तर सुरुवात आहे. सायनाच्या पावलावर पाऊल टाकून अनेक खेळाडू वेगाने पुढे वाटचाल करीत आहेत. जागतिक बॅडमिंटन क्षितिजावर भारतीय बॅडमिंटन सितारे उदयाला आले आहेत.