आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Share Market Sensex New Highs , Divya Marathi

भारतासाठी शुभसंकेत (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय शेअर बाजाराने सोमवारी पुन्हा नवा उच्चांक (२८१७७.८८) केला. एरवी परकीय गुंतवणूकदारांनी पैसा ओतला की बाजार वर जातो, मात्र सोमवारचे कारण वेगळे आहे.

आयात-निर्यात व्यापारात निर्यातीच्या तुटीची आपल्याला सवय झाली आहे. मात्र, ताज्या म्हणजे ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार ती १४.२५ अब्ज डॉलरवरून १३.३६ डॉलर इतकी कमी झाली आहे; आणि तेच या तेजीचे कारण आहे. तेलासाठी त्यापूर्वीच्या महिन्यात देशाला १४.५
अब्ज डॉलर मोजावे लागले होते, ते आता १२.३६ अब्ज डॉलर इतके कमी झाले आहे. या शुभवर्तमानाचे श्रेय आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी होण्याला आहे.

गेल्या जून महिन्यापासून तेलाच्या किमती घसरत आहेत. कच्चे तेल पिंपाला ८० डॉलरच्या खाली गेले असून ते अजून खाली जाईल. जूनमध्ये एका पिंपाची किंमत ११६ डॉलर होती, ती ८० डॉलर खाली आली. म्हणजे तब्बल ३६ डॉलरने (किमान २२०० रुपये) हे दर पडले आहेत.

भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर तेलाच्या जागतिक किमतीशी २०१० मध्येच जोडले गेले असून सुरुवातीच्या काळात त्याची भारतीयांना झळ सोसावी लागली. मात्र, आता दर आठवड्याला व पुढे किमान वर्षभर दर कमी होत जाण्याची शक्यता आहे. २०१५ च्या पहिल्या तीन महिन्यांत हे दर ८५ डॉलर उतरतील असा अंदाज आहे. इंधनाचा प्रचंड वापर असलेल्या भारताला ही घसरण उपयोगी आहे, तर तेल उत्पादनावरच अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या आखाती आणि आफ्रिकन देशांना या घसरणीचा फटका बसणार आहे.

शंभर डॉलरमधील ३० डॉलर भारताला इंधनाच्या आयातीवर खर्च करावे लागतात, त्यामुळे तेलाच्या किमती आपल्या देशाच्या दृष्टीने संवेदनशील विषय आहे. चलन छापण्यासाठी तेवढ्या किमतीचे सोने प्रत्येक देशाने आपल्या रिझर्व्ह बँकेत ठेवण्याचा गोल्ड स्टँडर्ड जगाने काढून टाकला आणि सर्व देश डॉलरच्या साठ्याशी जोडले गेले. डॉलरची किंमत आणि इंधनाचे दर यावर सध्या जगाचे आर्थिक व्यवहार हिंदोळे घेत आहेत. जपानसारख्या देशात आलेली मंदी आणि इंधनाच्या दरातील ही घसरण जगाला कोठे घेऊन जाते, हे आता पाहायचे.

इंधनाचे दर कमी होण्याचे एक कारण जगाचे सुस्तावलेले अर्थचक्र हे तर आहेच; पण ताजे कारण अमेरिकेशी संबंधित आहे. इंधनाचा वारेमाप वापर करणाऱ्या या आर्थिक महासत्तेने देशांतर्गत उत्पादन वाढवले आहे. अमेरिका दर दिवसाला ९० लाख पिंपांचे उत्पादन करते आहे आणि हा गेल्या २९ वर्षांतील उच्चांक आहे. त्यामुळे तेल उत्पादक ओपेक देशांकडे असणारी अमेरिकेची तेलाची मागणी कमी झाली आहे. तेलाच्या उत्पादनात जगात आघाडीवर असलेल्या सौदी अरेबियाचे तेल उत्पादन दर दिवशी ९६ लाख पिंप आहे, यावरून अमेरिकेने उत्पादन किती वाढवले आहे, हे स्पष्ट व्हावे. आता अमेरिकेने फ्रँकिंग नावाचे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केल्याने हे उत्पादन वाढले आहे. ते यापुढेही वाढतच जाणार असून हिवाळा संपला की म्हणजे साधारण मार्चमध्ये मागणी कमी होत असल्याने तेलाचे दर पुन्हा एकदा पडू शकतात. किमती पडू लागतात तेव्हा त्या आणखी पडण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो असे म्हटले जाते, तसेच काहीसे तेलाच्या दराचे होऊ घातले आहे. अर्थात, ओपेकमधील १२ देशांची येत्या २७ नोव्हेंबर रोजी बैठक होत असून तीत त्यांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तर मात्र हे दर परतीच्या मार्गाला लागू शकतात.

दर १०० डॉलरच्या खाली गेले की ओपेकने हस्तक्षेप करण्याचा संकेत आहे. त्या निर्णयाला सर्व सदस्य देश बांधील राहिले तरच असे होऊ शकते. दर उतरल्याची चिंता कुवेतसारख्या ओपेक देशांना नसल्याने आणि त्यातील व्हेनेझुएलासारखे काही देश कर्जफेडीसाठी इंधनाचा वापर करत असल्याने त्यांना दम निघतो का, यावरच त्या बैठकीचा निर्णय अवलंबून आहे. इक्वेडोरची ५० टक्के निर्यात एकट्या इंधनाची असल्याने दर कमी होणे म्हणजे देशाचे अर्थकारण खराब होणे आहे. तेलाचा वाढलेला वापर, त्याच्या दरातील चढउतार आणि पेट्रो डॉलरवर झालेली जगाची वाटचाल, असे जगाचे अर्थचक्र तेलाने बांधून टाकले आहे. मोटारी आणि ऊर्जेची गरज वेगाने वाढत चाललेला भारत हा आज त्याच अर्थचक्राचा भाग झाला आहे. त्यामुळे दर घसरल्याचा दिलासा हा तात्पुरता असून आयात केल्या जाणाऱ्या तेलावरील अवलंबित्व तो कसा कमी करतो आणि इतर ऊर्जास्रोतांना किती गती देतो, यावरच त्याचे अच्छे दिन की बुरे दिन हे अवलंबून आहे.