आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Shiv Sena MP Rajan Vichare Issue In Maharashtra Sadan, Delhi

अविचारी उद्योगाचे परिणाम (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानाखाली आवाज या पलीकडे बुद्धीची मजल जाऊ न शकणार्‍यांना निवडून दिले की काय होते हे ठाण्यातील जनतेला कळले असेल. राजन विचारे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात केलेला प्रकार शिवसेनेच्या धटिंगणशाहीला शोभेसा आहे. त्याला जाणीवपूर्वक देण्यात येणारा धार्मिक रंग उद्वेगजनक असला तरी काय लायकीच्या व्यक्ती दिल्लीत पाठविल्या आहेत याचे प्रदर्शन आणि निलाजरे समर्थन शिवसेनेने केले. सर्वसामान्य पण चळवळ्या तरुणांमधून बाळासाहेब ठाकरे यांनी सेना उभी केली. त्यावेळचे सेना नेते रांगडे होते, फटकळ होते, पण आततायी नव्हते. आवाज काढण्याची भाषा तेव्हाही होती, पण कुठे, केव्हा व कशा पद्धतीने आवाज काढायचा याचे भान होते. ते भान पुढे सुटू लागले व त्याला बाळासाहेबांची कार्यपद्धतीही कारणीभूत ठरली. शिवसेना जेव्हा फक्त संघटना होती तेव्हा आक्रमकता शोभत होती, पण संघटनेचा जेव्हा पक्ष होतो तेव्हा रस्त्यावरील आक्रमकतेला संसदीय कामकाजातील आक्रमकतेचे स्वरूप द्यावे लागते. प्रतिपक्षाला संसदेत कैचीत पकडून हवे ते घडवून आणणे हा लोकशाहीतील सनदशीर मार्ग आहे. मात्र त्यासाठी वेगळ्या पद्धतीने स्वत:ची बौद्धिक घडण करून घ्यावी लागते. व्यक्तिगत पातळीवर स्वत:ची अशी घडण करून सर्व पक्षांवर ठसा उमटवणारे खासदार शिवसेनेतही होते व आहेत. सुरेश प्रभू, मनोहर जोशी किंवा विद्याधर गोखले ही या पंक्तीतील काही नावे. विद्याधर गोखले यांना जाऊन अनेक वर्षे झाली तरी त्यांची आठवण काढणारे नेते आहेत. सोमनाथ चॅटर्जी शिवसेनेचा द्वेष करीत. तरीही मनोहर जोशींच्या सभापती म्हणून केलेल्या कामाबद्दल त्यांनी गौरवोद््गार काढले आहेत. सुरेश प्रभू यांच्याबद्दल तर काँग्रेसमध्येही आदराने बोलले जाते. तथापि, ही नामावळी वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला नाही. संसदीय कामातून छाप पाडण्यापेक्षा मस्तवालपणा करून लक्ष वेधून घेणार्‍यांचेच पक्षात कौतुक झाले. त्याचे परिणाम राजन विचारे यांच्या रूपाने दिसत आहेत.
विजय मिळवण्यापेक्षा तो पचवण्यासाठी अधिक डोके लागते. एनडीएचे नेते तेथे डोके लावताना दिसत नाहीत. मोदींचे सरकार हे हिंदुत्ववादी असेल, असा धाक प्रचारातच अनेकांनी घातला होता. मोदींनी विकासावर भर देऊन तो कमी केला. त्यानंतर संसदेला त्यांनी घातलेले दंडवत, तसेच लोकसभेतील भाषणातून सर्वसमावेशक वृत्ती दाखवली. यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या. एनडीएवर त्यांची पकड असेल असे त्यांच्या आविर्भावावरून वाटत होते. तथापि, बोलण्यापेक्षा कृतीला अधिक महत्त्व असते. मोदींच्या विकासाच्या गप्पांना जनता भुलली नव्हती. त्यांनी विकास प्रत्यक्ष दाखवला म्हणून त्या भाषणांना वजन आले. त्याचप्रमाणे सर्वांना समान वागणूक देण्याची भाषा करून भागत नाही. तशी कृती असावी लागते. कोणी आततायी वर्तन करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली गेली तरच लोकांचा विश्वास बसतो. हिंदुत्वाचा शिक्का अधिक गडद होईल, असे वर्तन होणार नाही याची दक्षता मोदी घेऊ शकतात, पण मित्र पक्ष किंवा परिवारातील संघटना यांच्याकडून हे भान ठेवले जाईल याची शाश्वती नाही. मात्र असे भान कुणी सोडले तर त्याला वठणीवर आणण्याची हिंमत नरेंद्र मोदी यांनी दाखवली तरच संसदेसमोर घातलेल्या दंडवतावर जनतेचा विश्वास बसेल. एनडीएवरील हिंदुत्वाचा शिक्का ठळक करण्याची धडपड विरोधी पक्ष व मीडियातूनही होणार हे भाजपच्याही खासदारांच्या लक्षात आलेले नाही हे लोकसभेत या नेत्यांच्या बडबडीवरुन दिसून येते. शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. अशावेळी सावधगिरीची अपेक्षा आहे. काँग्रेसप्रमाणे अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्याची धडपड मोदी सरकारने करावी, अशी कोणाचीही अपेक्षा नाही, पण धर्मांधता, जात्यंधता अशा विकासाच्या आड येणार्‍या मुद्द्यांभोवती देशाचे राजकारण फिरणार नाही याची काळजीही घ्यावी लागेल. देशाचे अर्थकारण सुधारण्यास मोदींना प्राधान्य द्यायचे आहे. देशातील कोट्यवधी तरुण व मध्यमवयीन मतदारांनी त्यासाठीच त्यांना मते दिली आहेत. त्यांच्या दुर्दैवाने अर्थकारणाला प्राधान्य देण्याची मानसिकता ना भारतातील राजकीय पक्षांत आहे, ना मीडियामध्ये. उलट भडक गोष्टींमध्ये त्यांना अधिक रस आहे. हे वास्तव लक्षात घेऊन संघ परिवार आणि शिवसेनेसारखे मित्रपक्ष यांना वाटचाल करावी लागेल.

अल्पसंख्याकांच्या आहारी जाणे जसे योग्य नाही तसेच अल्पसंख्याकांमध्ये अविश्वासाची, भयाची वा तीव्र चीड आणणारी भावना निर्माण होईल, अशी कृत्ये करीत राहणेही योग्य नाही. तसे कृत्य कोणी करीत असेल तर त्याला वेळीच खडसावले पाहिजे. विचारे यांना तसेच सानियाला विरोध करणार्‍यांना कायदेशीररित्या खडसावण्याची हीच वेळ आहे. अन्यथा अविश्वासाच्या अंधकारात विकासाची वाट हरवून जाईल.