आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलिच्छ राजकारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे जाहीर झाल्यानंतर जे राजकारण झाले त्याचे दोन शब्दांत "गलिच्छ राजकारण' असे वर्णन करता येईल. बाबासाहेब पुरंदरे गेली ५० हून अधिक वर्षे महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्दगायन करीत आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात घरोघरी शिवाजीराजे पोहोचले. त्यांच्यामुळेच शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, सिंहगड, तोरणा, माहुलीगड, सिंधुदुर्ग अशा असंख्य किल्ल्यांची माहिती झाली.
त्यांच्यामुळेच महाराजांचे सहकारी महाराष्ट्राला समजले. या सहकाऱ्यांत कोण नव्हते? शिवा काशीद होता, जिवा महाले होता, संभाजी काकडे होता, कानोजी जेधे होते, नेताजी पालकर होते, तानाजी मालुसरे होते, मोरोपंत पिंगळे होते, सोनोपंत डबीर होते, बल्लाळ होते, मदारी मेहतर होता, दर्याखान होते म्हणजे छत्रपतींचे राज्य खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे राज्य होते. जो महाराष्ट्राचा तो मराठा, या अर्थाने मराठ्यांचे राज्य होते. तीन पिढ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी घडवल्या. केवढे अद्भुत कार्य आहे. त्याला लवून किती कुर्निसात करावेत, तेवढे थोडेच आहे.
अशा बाबासाहेब पुरंदरे यांची जात काढून महाराष्ट्रातील वावदूक पुरोगाम्यांनी जो धुमाकूळ घातला तो छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्याची धूळधाण करणारा आहे. छत्रपतींनी कधी कोणाची जात पाहिली नाही आणि राजर्षी शाहू महाराजांच्या जेव्हा लक्षात आले की, जातीमुळे बहुजन समाज त्याच्या जन्मसिद्ध हक्कांपासून वंचित केला जात आहे, तेव्हा त्यांनी छत्रपतींची परंपरा चालवून ते हक्क त्यांना मिळवून दिले. आणि जेव्हा महात्मा फुलेंच्या लक्षात आले की, एका अविद्येने अनेक अनर्थ केलेले आहेत आणि ते दूर करायचे असतील तर सर्व जाती निवडून। घ्याव्या संख्या प्रमाण। द्यावी कामे नेमून। होईल सुख समाधान।' म्हणजे प्रशासनात सर्व जातींचा समावेश केला पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालविताना म्हटले, "भारतात जाती आहेत, जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत, कारण त्या जातीजातींमध्ये मत्सर आणि तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवाचे राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केली पाहिजे.'
हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, असे एका बाजूला म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत घाणेरडे आणि सांप्रदायिक राजकारण करायचे. त्या राजकारणाला "पुरोगामी' राजकारण म्हणायचे! ही नुसतीच ढोंगबाजी नसून वरील सर्व महापुरुषांचा त्यांच्या शत्रूंनीदेखील केला नसेल इतका भयानक अपमान आहे. एका राजकीय पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी सर्व महाराष्ट्र नासवून टाकण्याचे राजकारण गेली अनेक वर्षे चालविलेले आहे. महाराष्ट्रातील कोणता घोटाळा असा नाही की ज्यात या सांजारू पार्टीतील लोक गुंतले नाहीत? मुद्रांक घोटाळा, सिंचन घोटाळा, जमीन घोटाळा, सार्वजनिक बांधकाम घोटाळा, यातून जी अफाट माया जमवली जाते तिचा उपयोग लोककल्याणासाठी करण्याऐवजी जातीयवाद्यांचे विष निर्माण करणाऱ्या फलटणी पोसण्यासाठी केला जातो. त्यांच्या समाजघातक उपद्व्यापांना संरक्षण दिले जाते. आणि त्यांची सर्व प्रकारची सोय पाहिली जाते. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी जी गत रांझाच्या पाटलाची केली, तीच गत समाजात विद्वेष निर्माण करणाऱ्या लोकांची केली असती.
थोरल्या महाराजांनी ब्राह्मण आहे म्हणून त्याला डोक्यावर बसविले नाही आणि तो ब्राह्मण आहे म्हणून त्याला पायदळी तुडविला नाही. हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुल्यांना बरोबर समजले. त्यांनी त्यांना कुळवाडी भूषण असा किताब दिला आणि त्यांचा वसा पुढे चालविला. ब्राह्मणांच्या ब्राह्मण्याविरुद्ध आणि त्यांच्या जातिश्रेष्ठत्वाच्या अहंकाराविरुद्ध संघर्ष केला. आणि त्याच वेळी असंख्य ब्राह्मण मित्र जोडले. मग ते चिपळूणकर असतील की भिडे असतील. या भिडे यांनीच आपला वाडा मुलींच्या पहिल्या शाळेसाठी दिला. बाबासाहेबांनी हाच वसा पुढे नेला आणि सहस्रबुद्धे, पालये शास्त्री, गजेंद्रगडकर अशी असंख्य ब्राह्मण मंडळी आपल्या कार्यात जोडून घेतली. जेधे-जवळकरांनी त्यांना महाडच्या सत्याग्रहातून ब्राह्मणांना वगळण्याची सूचना केली असता, बाबासाहेबांनी ठणठणीत उत्तर दिले, माझा लढा ब्राह्मण जातीविरुद्ध नसून ब्राह्मण्यग्रस्त मानसिकतेविरुद्ध आहे.
या राक्षसी कामाविरुद्ध बाबासाहेबांनी जातिभेद निर्मूलन या भाषणात घणाघाती प्रहार केलेले आहेत. ते सांगून गेले, "हिंदू समाज अनेक शत्रू गटांचा समूह आहे... ब्राह्मणांनी शिवाजीचा जो अपमान केला त्याबद्दल आजचे ब्राह्मणेतर, आजच्या ब्राह्मण वंशजांना क्षमा करण्यास तयार नाहीत... जात्याभिमान पूर्वी जाती- जातीत झालेला कलह आजपर्यंत ताजातवाना राखून एकसंधतेला बांध घालतो.' हा जातीय संघर्ष मिटविण्याचा धाडसी प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी केला. राजर्षी शाहू महाराज म्हणत, "जातिभेद हा हिंदुस्थानास मोठा रोग आहे... जातिभेद मोडण्याचे माझे प्रयत्न सतत चालू आहेत... काही पर्यायांपर्यंत जातिभेद व जात्याभिमान सुटत नाही... पण त्या समाजाच्या बाहेरही फारच मोठा समाज आहे, त्याची पण आपण सेवा केली पाहिजे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.’
महाराष्ट्रात यंदा पाऊसपाणी कमी आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. आपला शेतकरी बांधव चिंतेच्या वणव्यात सापडलेला आहे. त्याला जातीयतेच्या वणव्यात आणणे यासारखे पाप नाही. पदव्यांचे भेंडोळे खाकेत गुंडाळून नोकरीसाठी वणवण फिरणारे युवक खेडोपाडी आणि तालुक्याच्या ठिकाणी दिसतात. त्यांच्या हाताला काम पाहिजे, मेंदूला काम पाहिजे. ते देण्याऐवजी त्यांच्या मेंदूत जातीयतेचे विष कोंबणे आणि हातात दगड देणे हे अघोरातील अघोर पाप आहे. लोकशाही म्हणजे, लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालविलेले राज्य. राज्य सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसणाऱ्या सर्वांनी मिळून चालवायचे आहे. राज्य ही खुर्चीवर बसलेल्या लोकांची वडिलोपार्जित मालमत्ता नाही. म्हणून राज्य चालविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असली पाहिजे. याचे भान सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसलेल्या दोघांनाही सारखेच असले पाहिजे. आणि म्हणून सर्वांनी मिळून शिवरायांच्या स्वप्नातील सुखी, समृद्ध, आनंदवनभुवन निर्माण करण्याच्या कामाला लागले पाहिजे.
ramesh.patange@gmail.com