आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवादाचा बिग बाजार ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगप्रसिद्ध आधुनिकतावादी विदुषी व्हर्जिनिया वुल्फने 20 व्या शतकाच्या सुरुवातीस मालक-नोकर, नवरा-बायको, पालक-मुले यांच्यातील मानवी संबंध हे वेगाने बदलत जातील व त्यामुळे जगभरात एक मोठे मन्वंतर होईल, अशी भविष्यवाणी केली होती. तिच्या मते, हे मन्वंतर इतके व्यापक असेल की, धर्मापासून राजकारणापर्यंत मानवी जीवनाला स्पर्श करणारा सर्व प्रकारचा जीवनव्यवहार, तत्त्वज्ञान, मानवी प्रेरणा यांच्यामध्ये क्रांतिकारक बदल व मानवी जीवनात घुसळण होईल. वुल्फ स्वत:ची भविष्यवाणी अनुभवायला हयात नाही, पण आपण आज मानवी व्यवहार कसे झपाट्याने बदलत चालले आहेत, ते अनुभवत आहोत. दहा वर्षांपूर्वी फेसबुकची सुरुवात झाली तेव्हा त्याचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला जगाच्या कानाकोपर्‍यातील प्रत्येक व्यक्ती, समाज, वंश, धर्र्म, भाषा असा संवादाचा पूल बांधायचा होता. हा पूल अर्थातच एका व्यक्तीचा-समूहाचा दुसर्‍याला जाणून घेण्यासाठी होता. त्यामध्ये ज्ञानाची देवाण-घेवाण होती. वादविवादाचे मुक्तपीठ होते. झुकेरबर्गला मानवी संवादाची एक ग्लोबल डेमॉक्रसी स्थापन करायची होती. झुकेरबर्गचा सोशल मीडिया हा व्यवस्था परिवर्तनाचा एक भाग असला तरी त्याने सायबरविश्वात एका भांडवली स्पर्धेला जन्म दिला होता. या बाजारपेठेत कंपन्यांचे टेकओव्हर होते, चढाओढ होती, संघर्ष होता. गेल्या चार-पाच वर्षांत फेसबुकला टक्कर देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, टेलिग्राम, व्हायबर, स्नॅपचॅट, वुई चॅट, गुगल हँग आउट, गुगल सर्कल यांसारख्या कंपन्या आक्रमक झाल्या. या कंपन्यांनी सोशल मीडियातील भांडवली स्पर्धा इतकी चिघळून टाकली की फेसबुक या एका कंपनीची मक्तेदारी मोडण्यासाठी त्यांनी जिवाचे रान करण्यास सुरुवात केली. पण भांडवलशाहीत मोठा मासा छोट्या माशाला सहजपणे गिळून टाकत असतो. तसेच बुधवारी झाले. झुकेरबर्गने 45 कोटी ग्राहकांची व्हॉट्सअ‍ॅप कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. हा सौदा सुमारे 1.2 लाख कोटी रुपयांचा झाला. एवढा मोठा आर्थिक व्यवहार हा सायबर विश्वातील सर्वात मोठा सौदा म्हणावा लागेल. पण फेसबुकपुढे व्हॉट्सअ‍ॅपचे आव्हान कसे निर्माण झाले, हा इतिहास पाहिला पाहिजे. 2009 मध्ये ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने फेसबुकपुढे स्वत:चे आव्हान उभे करताना केवळ जलदगतीने संदेश सेवा देणे, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. सोशल मीडियात हा मार्केटिंग फंडा इतका लोकप्रिय झाला की, सोय म्हणून ग्राहक फेसबुकऐवजी व्हॉट्सअ‍ॅपकडे वळले आणि फेसबुकचा वापर करणार्‍यांची संख्या कमी होत गेली. (तरीही जगभरात रोज फेसबुकची हजारो अकाउंट उघडली जात असतात.)‘व्हॉट्सअ‍ॅप’ संदेश सेवा ही फेसबुकच्या मेसेंजर सेवेपेक्षा अधिक उपयुक्त होती. केवळ मोबाइल क्रमांक असलेल्या कोणालाही व्हॉट्सअ‍ॅपचा लाभ मिळू शकत होता. त्यामध्ये संदेशाशिवाय फोटो, व्हिडिओ-डिओ फाइल्स पाठवता येत होत्या. शिवाय स्मार्ट फोनचे किमान ज्ञान असलेल्या ग्राहकालाही ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वापरणे सोयीचे होते. भारतामध्ये ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हे कमालीचे लोकप्रिय ठरले. भारतात मोबाइल वापरणार्‍यांची 90 कोटी ग्राहकांची बाजारपेठ हे त्याचे मुख्य कारण होते.आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हॉट्सअ‍ॅपने मेक्सिको, जर्मनी या देशांचीही बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे संदेश सेवेची ही बाजारपेठ फेसबुकच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यांची मेसेंजर सेवा बदललेल्या संवादमाध्यमांमध्ये फारच तकलादू होती. त्यामुळे झुकेरबर्गला भांडवली बाजारपेठेत स्वत:चे स्थान अबाधित राखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला विकत घ्यावे लागले. झुकेरबर्गच्या या निर्णयामुळे फेसबुकला व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात सुमारे 45 कोटी ग्राहक मिळाले आहेत. हे ग्राहक मुख्यत: पश्चिम युरोप, मेक्सिको, भारत, अमेरिका, ब्राझील या देशांमधील आहेत. शिवाय या देशांतील सुमारे 55 टक्के ग्राहक या कंपनीचे आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, दररोज जगभरातून सुमारे 10 लाख नवे ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपशी जोडले जातात. ही आकडेवारी पाहता 2015 मध्ये व्हॉट्सअ‍ॅप ही फेसबुकनंतरची सर्वात मोठी ग्राहक संख्या असलेली सोशल मीडिया कंपनी असेल. फेसबुकचे या घडीला जगभरात सुमारे एक अब्ज 20 कोटी, म्हणजेच भारताच्या एकूण लोकसंख्येइतके ग्राहक आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप ताब्यात घेतल्याने फेसबुकला व्हॉट्सअ‍ॅपच्या संरचनेत बदल करावे लागणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जाहिरात, गेम्स व इतर गिमिक्स नाहीत. कारण या कंपनीचे तसे धोरण होते. जाहिराती आणि गेममुळे संदेश सेवांमध्ये अडथळे येतात, अशी या कंपनीची धारणा होती. आता मालकी हक्क फेसबुककडे गेल्याने त्यांना स्वत:चा छाप प्रस्थापित करण्यासाठी वेगळे काहीतरी करून दाखवावे लागणार आहे. या सौदेबाजीचे इतर परिणामही टेलिकॉम कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारावर पडू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप विकत घेतल्यामुळे एटी अँड टी, डॉइश टेलिकॉम, व्होडाफोन या बड्या टेलिकॉम कंपन्यांना आपल्या टेक्स्ट सर्व्हिसचा (संदेश सेवा) नव्याने विचार करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत जगभरातल्या सर्वच मोबाइल कंपन्यांनी संदेश सेवा महाग केल्या आहेत. कारण संदेश सेवेतून बराचसा महसूल मिळत होता. पण टेलिकॉम कंपन्यांच्या या सेवेवर बर्‍याचशा मर्यादा असल्याने ग्राहकांना स्वस्त सेवेचा पर्याय हवा होता. त्याच वेळी व्हॉट्सअ‍ॅपमुळे मोबाइल कंपन्यांच्या संदेश सेवेची बाजारपेठ खिळखिळी होऊ लागली होती. अतिशय स्वस्तात व मोफत संदेश, फोटो, डिओ-व्हिडिओ फाइल पाठवता येत असल्याने ग्राहकांनी जवळपास मोबाइल कंपन्यांच्या संदेश सेवेकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे जगभरातील टेलिकॉम कंपन्यांच्या संदेश सेवेला इतर सोशल मीडियातील कंपन्यांनी आव्हान दिल्यामुळे सुमारे 32 अब्ज डॉलरच्या महसुलास मुकावे लागले होते. हा तोटा निश्चितच टेलिकॉम कंपन्यांच्या छातीत धडकी भरवणारा आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना नव्या कल्पना प्रत्यक्षात आणाव्या लागतील. मध्यंतरी युरोपमध्ये व्होडाफोन, ऑरेंज या टेलिकॉम कंपन्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी आणून स्वस्त दरात संदेश सेवा देण्यास सुरुवात केली होती; पण त्याला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. अशा वेळी फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅप ही कंपनी ताब्यात घेणे, ही घटना मानवी संवादाचे बाजारीकरण करणारी आहे, असेही म्हणण्यास हरकत नाही.