आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्यांच्या प्रयत्नांचे अंजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो तेथे एकाच दिवशी तीन जणांनी वेगवेगळ्याकारणांसाठी आत्महत्येचा प्रयत्न करावा ही बाब ‘अच्छे दिन’चे नारे देऊन सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांसाठी खचितच शोभनीय नाही. किंबहुना राज्यातील सर्वसामान्य जनतेत सरकारी यंत्रणेविरोधात किती असंतोष खदखदत आहे आणि आपल्याला कुणीच वाली नसल्याच्या भावनेतून नैराश्याची कशी परिसीमा गाठली गेली आहे त्याचेच हे निदर्शक म्हणावे लागेल. कारण जेव्हा लहानसहान स्वरूपाची कामेसुद्धा स्थानिक पातळीवर होत नाहीत आणि त्याबाबत तक्रारी करून त्याची कुठेच दखल घेतली जात नाही तेव्हा लोकांना मंत्रालय गाठण्याशिवाय पर्याय राहत नाही. या पातळीवरदेखील आपले ऐकून घेतले जात नाही म्हटल्यावर जी उद्विग्नता येते त्यातून थेट आत्महत्येस प्रवृत्त होण्यापर्यंतची मानसिकता बनत जाते. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीच्या दिवशीच घडलेल्या या तीनही घटना जाणून घेतल्यास त्यामध्येही असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसते. पैठण तालुक्यातील दिलीप मोरे या शेतकऱ्याने खरीप बियाणे खरेदीसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून थेट मुख्यमंत्री कार्यालय गाठले. तसेच त्यांच्या भावाचा खून होऊनही पोलिसांनी आत्महत्येची नोंद केल्याचेही मोरे यांचे म्हणणे आहे. या सगळ्यासाठी आपण अगोदर प्रशासकीय यंत्रणेकडे वेळोवेळी प्रयत्न केले. तथापि ते निष्फळ ठरल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसऱ्या घटनेत जळगाव येथील हिरालाल ढाकणे या तरुणाने शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत म्हणून, तर पाठोपाठ मुंबईच्या दिलीप पडाया यांनी कौटुंबिक समस्यांमध्ये साहाय्य मिळत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराने यंत्रणा हादरून गेली आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तातडीने घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. चौकशी गरजेची आहेच, पण त्याहूनही अधिक आवश्यकता आहे ती मुळात इथपर्यंत वेळ का येऊन ठेपली ते जाणून घेण्याची. त्याचा मागोवा घेतला तर हे सरकार म्हणजे ‘आपले सरकार’ नाही, असा एक सार्वत्रिक समज तळागाळातील जनतेमध्ये झपाट्याने पसरत चालल्याचे सहजपणे दृष्टीस पडते.
वास्तवात सरकार अनेक बाबतीत चांगली पावले टाकत आहे आणि व्यवस्थेतील त्रुटी वा दोष मुळापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, प्रत्यक्षात लोकभावना तशी नाही. शेतकरी, कामगार, नोकरदार एवढेच काय, अगदी व्यापारी आणि उद्योजक अशा कोणत्याही घटकात सरकारबाबतची भावना वर म्हटल्याप्रमाणे हे आपले सरकार नाही अशीच काहीशी बनत चालल्याचे जमिनीवरचे वास्तव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तीनही जणांकडे पाहिल्यास हेच दिसून येते. त्यातील एक शेतकरी, दुसरा विद्यार्थी, तर तिसरा मुंबईसारख्या महानगरातला आहे. त्यांच्या समस्या आणि अपेक्षादेखील अगदी प्राथमिक स्वरूपाच्या म्हणाव्यात अशा आहेत. याचा अर्थ दैनंदिन समस्यांविषयीच जर लोकांमध्ये एवढी खदखद असेल तर मेक इन महाराष्ट्र, हजारो कोटींचे परकीय गुंतवणुकीचे करार अशा गोडगुलाबी चित्राला काहीही अर्थ राहत नाही. हे लक्षात घेऊन दैनंदिन समस्यांवर उतारा शोधण्यावर प्रथमत: लक्ष केंद्रित करायला हवे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत ममता बॅनर्जी आणि जयललिता यांना मिळालेले यश हे त्यांनी अशा प्राथमिक समस्यांवर दिलेल्या उताऱ्यातच आहे. ममतांनी पशुधन गरजूंच्या घराघरापर्यंत पोहोचेल यावर कटाक्ष राखला तर रुपया-दोन रुपयांत पोटभर भोजन पुरवणारे अम्मा कँटीन जयललितांना तारून गेले. विशेष म्हणजे सरकारच्या या योजना तेथील पक्ष कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत तर पोहोचवल्याच, पण ते करताना त्याचा डंका पिटून राजकीय लाभही पुरेपूर उठवला. महाराष्ट्र सरकारनेसुद्धा दुष्काळाचा प्रश्न कुशलतेने हाताळताना दुष्काळग्रस्तांना कधी नव्हे एवढे लाभ दिले, पण भाजप कार्यकर्ते लोकांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचवण्यात कमी पडले. याचे कारण सत्तेचे जे लाभ अपेक्षित असतात ते मुळात कार्यकर्त्यांपर्यंतच पोहोचत नसतील आणि त्यांच्याच अपेक्षांची पूर्ती होत नसेल तर कार्यकर्त्यांत औदासीन्य येणारच. प्रशासनाचेही काहीसे असेच आहे. फडणवीस सरकारची प्रशासनावर अद्याप म्हणावी तशी मांड बसलेली नाही. लोकांपर्यंत योजना थेट पोहोचवण्यासाठी हे दोन्ही घटक अत्यंत कळीचे असून तेथेच अंतर पडत असल्याने कामकाजाविषयी नेमके आकलन होऊन सरकारबाबत नैराश्याचे वातावरण पसरते. तीन आत्महत्यांच्या प्रयत्नांतून समाजातील हा हताशपणाच ठळकपणे समोर आला आहे. त्यातून शासनकर्त्यांनी वेळीच सावध होत कार्यपद्धतीत तातडीने बदल करायला हवा. अन्यथा मंत्रालयाच्या हस्तिदंती मनोऱ्यातून निवडणुकीच्या रणात उतरल्यावर कपाळमोक्ष होण्याचाच संभव अधिक दिसतो.
बातम्या आणखी आहेत...