आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या कसाबचा इशारा (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईवरील हल्ल्यानंतर, म्हणजे जवळपास सात वर्षांनी आणखी एक पाकिस्तानी अतिरेकी भारताच्या ताब्यात आला. पाकिस्तानला खिंडीत पकडण्यास आणखी एक सज्जड पुरावा हाती आला, अशी समजूत होऊ शकते. पाकिस्तान लष्कर, विशेषत: आयएसआय, सातत्याने भारताविरुद्ध कारवाया करीत असते हे आपल्याला माहीत असले तरी पुरावा हाती नसतो. मुंबईवरील हल्ल्यात कसाब हाती लागला व प्रथमच पुरावा हाती आला. अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या साह्यामुळे आणखी काही पुरावा देता आला. अमेरिकी नागरिकही या हल्ल्यात अडकल्यामुळे अमेरिकेला ही उपरती झाली; अन्यथा मदत मिळाली नसती. तथापि, त्या पुराव्याची पाकिस्तान कशी वासलात लावीत आहे हे आपण पाहत आहोत. उधमपूरजवळ पकडलेला नावेद हा अतिरेकी तर केवळ नशिबानेच हाती आला आहे. त्याच्या एकंदर वर्तणुकीसह तो देत असलेल्या माहितीबद्दल संशय घेण्यास जागा आहे. कडवा अतिरेकी म्हणून त्याची जडणघडण झाली आहे, असे वाटत नाही. कसाब व त्याच्या सहकाऱ्यांच्या हालचालींवरून, भरपूर प्रशिक्षण घेऊन तयार झालेले हे अतिरेकी आहेत, असे सहज लक्षात येत होते. त्यांनी दिलेली कडवी झुंज सर्वांच्या लक्षात आहे. या तुलनेत काल पकडलेला नावेद नवशिका व बावळट अतिरेकी वाटतो. एके-४७ हातात असणाऱ्या अतिरेक्याला जेवण मिळू नये व दोन नि:शस्त्र व सर्वसाधारण चणीच्या गावकऱ्यांनी जेरबंद करावे हे आश्चर्यकारक आहे. नावेद प्रशिक्षित नसावा, असा एक अर्थ यातून निघतो.

दुसरा अर्थ अधिक गंभीर आहे. माजी संरक्षण सल्लागार नारायणन यांनी तो लक्षात आणून दिला आहे. त्यांच्या मते नावेदचे एकूण वर्तन व त्याची शरणागती हे नाटक आहे. आयएसआय हे जाणीवपूर्वक करीत आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला भारताला इशारा द्यायचा आहे. ‘मी हिंदूंना मारायला आलो व मारण्यात मला मजा वाटते,’ असे नावेद म्हणाला. पाकचा भारताला हाच इशारा आहे. शरीफ व मोदी यांच्यात वाटाघाटी होत असल्या व दोन्ही देशांचे अधिकारी भेटणार असले तरी भारताला रक्तबंबाळ करीत राहण्याची योजना पाकने सोडून दिलेली नाही. ती अधिक जोरकसपणे सुरू राहणार आहे व कदाचित पुढील काळात काश्मीरबरोबर त्याला खलिस्तानची जोड मिळेल हे पाकिस्तानच्या लष्कराला सूचित करायचे आहे. कसाबप्रमाणे नावेद हा गरीब कुटुंबातील नाही. त्याचे कुटुंबीय उच्च मध्यमवर्गातील आहेत. त्याचे वागणे-बोलणे ठरवून दिल्याप्रमाणे वाटते. त्याची शरणागती हा भारतासाठी संदेश आहे व हा संदेश धोकादायक आहे.

सध्याच्या जागतिक घडामोडी पाहता या संदेशाला अधिक महत्त्व येते. पाकिस्तानला सरळ करण्याची भाषा आपल्याकडे अनेकदा होते व पाक कसा अडचणीत सापडला आहे याची चर्चा होते. वस्तुस्थिती तशी नाही. जगाच्या व्यासपीठावर पाकिस्तानने आपला जम पुन्हा बसवला आहे. चीनची भक्कम साथ मिळाल्यामुळे पाकची अर्थव्यवस्था सुधारत चालली आहे. अमेरिका पूर्वीइतकी विरोधी नाही. अफगाणिस्तानमधील सत्ताधारी पाकबरोबर जुळवून घेत आहेत. सौदी अरेबियाही पाकच्या पाठीशी आहे. रशिया विरोधात जाण्यास तयार नाही. भारताला छळणारे दहशतवादी पाक पोशीत असेल तर त्याबद्दल ही राष्ट्रे तक्रार करणार नाहीत. उद्या ‘इसिस’ला रोखण्यासाठी पाकची मदत होत असेल तर सर्व जग पाकिस्तानच्या मागे उभे राहील व भारताला कुणी विचारणार नाही. चीनची पाकमध्ये होणारी प्रचंड गुंतवणूक ही भारतासाठी मोठी डोकेदुखी आहे. भारताची कोंडी करण्यासाठी पाकसारखा उत्तम मित्र चीनला सापडला आहे व अमेरिका तिकडे कानाडोळा करीत आहे.

अशा परिस्थितीत भारताच्या राजनैतिक डावपेचांची कसोटी लागते. विविध देशांत भाषणांचे फड गाजवून उपयोग नाही. ठोस डावपेच टाकले पाहिजेत वा आखले पाहिजेत. पाकविरुद्ध अनेक देशांची फळी उभारावी लागेल. आक्रमक भाषा वा म्यानमारप्रमाणे लष्करी डावपेच फार उपयोगी पडणार नाहीत. उलट आपली संरक्षणसिद्धता पराकोटीला न्यावी लागेल. बलवान व अभेद्य बचाव यंत्रणा उभारून अतिरेक्यांचा नि:पात करीत राहणे हे पाकला हताश करण्याचे एक अस्त्र आहे. मात्र, त्यासाठी शस्त्रसंपन्न सुरक्षा यंत्रणांबरोबरच इस्रायलप्रमाणे जनतेची मानसिक घडण करावी लागेल. दुसरा उपाय म्हणजे संरक्षणसिद्धतेमध्ये खूप गुंतवणूक करणे. नौदल, वायुदल व लष्कर यामध्ये अफाट गुंतवणूक केली तर अनेक दोश भारताकडे आकर्षित होतीलच; पण तशीच गुंतवणूक पाकलाही करावी लागल्यामुळे त्या देशाची आर्थिक घडी विस्कटेल. अमेरिकेने शीतयुद्धात रशियाबाबत जे केले तेच भारताला पाकबाबत करावे लागेल. युद्ध नव्हे, तर सुदृढ, अद्ययावत बचाव हे मुख्य तंत्र हवे. त्यासाठी विकासाचे अग्रक्रम बदलावे लागतील आणि जनमत तयार करावे लागेल. मोदींनी आपले वक्तृत्वकौशल्य त्यासाठी वापरावे; अन्यथा अनेक कसाब रक्तबंबाळ करीत राहतील.
बातम्या आणखी आहेत...